बोगस डॉक्टरांच्या नावांचे ग्रामपंचायती मध्ये वाचन व्हावे, यासाठी परिपत्रक काढू ! – अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – ग्रामीण भागांतील बोगस डॉक्टरांच्या नावांची सूची ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात येईल, तसेच ग्रामपंचायतीमध्ये तिचे वाचन केले जाईल. यासाठी परिपत्रक काढण्यात येईल, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी १० मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढती संख्येविषयी शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर अमित देशमुख यांनी वरील वक्तव्य केले.

या वेळी अमित देशमुख म्हणाले, ‘‘बोगस डॉक्टरांची शोध घेणार्‍या भरारी पथकामध्ये अधिकार्‍यांची वाढ करता येईल का ? हे मी पहातो. या प्रकरणांत जामीन त्वरित मिळतो. त्यामुळे कायदा अधिक कडक करण्याची आवश्यकता आहे.’’ शिवसेनेच्या आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे यांनी बोगस डॉक्टरांची नावे प्रसिद्ध करण्याची सूचना केली, तर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी याविषयीचे खटले जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली. या दोन्ही मागण्यांना अमित देशमुख यांनी त्यानुसार करण्याची ग्वाही दिली.