मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना तातडीने पत्र पाठवण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही !

कोल्हापूर, ९ मार्च (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि सर्किट बेंच कोल्हापूर येथे व्हावे, यासाठी विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समवेत विधानभवन येथे बैठक झाली. त्या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी मुख्य न्यायमूर्तींना तातडीने पत्र पाठवण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली, अशी माहिती ‘खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन’चे अध्यक्ष अधिवक्ता गिरीश खडके यांनी ९ मार्च या दिवशी दिली.

अधिवक्ता खडके पुढे म्हणाले की, या बैठकीत सभापती निंबाळकर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ६ जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात सर्किट बेंच का महत्त्वाचे आहे ? गेली ३५ वर्षे हा लढा चालू आहे, ६ जिल्ह्यांतील सर्वपक्षीय नेत्यांनी याला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती दिली. या बैठकीस परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांसह अन्य उपस्थित होते.