मुंबई, ९ मार्च (वार्ता.) – देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर ९ मार्च या दिवशी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले. या वेळी भाजपच्या आमदारांनी ‘नवाब मलिक यांना पाठीशी घालणार्या सरकारचा धिक्कार असो’, महाराष्ट्राचे सरकार दाऊद समर्थक आहे का ?, नवाब मलिक यांचे त्यागपत्र घ्या, अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा आशयाच्या घोषणा दिल्या. आंदोलनाच्या वेळी भाजपच्या आमदारांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विरोधातील फलक हातात घेतले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रवक्ते आणि अधिवक्ता आशिष शेलार, आमदार सौ. श्वेता महाले, सौ. नमिता मुदंडा यांसह भाजपचे सर्व आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.