अकोला – येथील सनातन संस्थेच्या साधिका सौ. देवयानी धीरज राऊत यांना राजस्थान येथील श्री जे.जे.टी. विद्यापिठाने ‘विद्यावाचस्पती (पीएच्.डी.)’ पदवीने नुकतेच सन्मानित केले. त्यांनी या पदवीसाठी ‘क्वालीटेटीव्ह अनॅलिसिस ऑफ कॉस्मॉलॉजिकल मॉडेल्स इन स्केलर टेंसर’ आणि ‘थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन विथ किनॅमॅटिकल टेस्ट’, या विषयावर प्रबंध सादर केला होता. अनेकविध अडचणींना तोंड देत त्यांनी हे यश साडेतीन वर्षांत मिळवले. ‘या यशात माझे सासरे डॉ. भानुदास राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या यशाचे श्रेय भगवान श्रीकृष्ण आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अर्पण करते अन् त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते’, असे मनोगत सौ. राऊत यांनी व्यक्त केले.
सौ. देवयानी राऊत यांनी व्यक्त केलेले मनोगत !
‘शिक्षणाच्या साडेतीन वर्षांच्या काळात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. माझे दुसरे बाळंतपण मुदतीपूर्वी झाले. नंतर बाळाला एक मास माझ्यापासून दूर काचेच्या पेटीत ठेवावे लागले. मध्यंतरी माझ्या सासूबाईंचे निधन झाले. त्यानंतर सासर्यांच्या गुडघ्यांचे मोठे शस्त्रकर्म झाले. घरातील सर्व कामे माझे पती करत होते. मी करत असलेली चाकरी दळणवळण बंदीमुळे गेली. त्यामुळे आर्थिक स्थितीही खालावली होती. माझे पती आधीपासूनच साधनेत असल्यामुळे त्यांनी हे सर्व आनंदाने स्वीकारले. माझ्या मनाची स्थिती जेव्हा ढासळत असे, तेव्हा मी सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांना नामजपादी उपाय विचारून ते करत असे. ‘‘मी अर्धवट शिक्षण पूर्ण करू का ?’’, असे पू. पात्रीकरकाका यांना विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘पुढील आपत्काळाची जाणीव ठेवून शिक्षण घेऊ शकते; पण श्रीकृष्णासाठी शिक्षण घेत आहे, असा भाव ठेव.’’ तेव्हापासून मी श्रीकृष्णाला विचारून अभ्यास आणि अन्य कौटुंबिक कामे करत असे. परीक्षेसाठी जातांनाही ‘मी परीक्षेला जात आहे’, असे कागदावर लिहून तो कागद परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जीवनदर्शन ग्रंथात ठेवून आणि त्यांना प्रार्थना करून जात असे. त्यामुळे मला मिळालेले यश हे केवळ श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या कृपेमुळेच आहे.’