मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – एस्.टी. कर्मचार्यांच्या वेतनातील तफावतीविषयी चर्चा करण्यास मी सिद्ध आहे. कर्मचार्यांच्या अन्यही काही मागण्या असतील, तर त्या चर्चेने सोडवता येतील; मात्र एस्.टी कर्मचार्यांचे विलगीकरण शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती परिवहनमंत्री अनिल परब यांनी ८ मार्च या दिवशी विधान परिषदेत केली. विधान परिषदेत तारांकित प्रश्नावर उत्तर देतांना अनिल परब यांनी वरील एस्.टी. कर्मचार्यांच्या संपाविषयी सभागृहाला अवगत करतांना वरील स्थिती सांगितली.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी एस्.टी. कर्मचार्यांच्या कामबंद आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचना केली. त्याला परिवहनमंत्र्यांनी सहमती दर्शवली. एस्.टी. कर्मचार्यांचा संपाचा प्रश्न सोडवण्यासाठी विरोधकांनीही पुढाकार घेण्याची सिद्धता दर्शवली.