८ मार्च या दिवशी असलेल्या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने…
बीड येथील प्रख्यात महिला कीर्तनकार आणि ह.भ.प. (श्रीमती) प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी यांची दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहर वर्षा कुलकर्णी यांनी भेट घेऊन मुलाखत घेतली. ८ मार्च २०२२ या दिवशी जागतिक महिलादिन असून त्या निमित्ताने ह.भ.प. (श्रीमती) प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी यांचा परिचय, त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलेले धार्मिक आणि सामाजिक कार्य याविषयीची माहिती त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
ह.भ.प. (श्रीमती) प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी यांचा परिचय आणि त्यांना मिळालेले विविध पुरस्कार
बीड येथील प्रख्यात महिला कीर्तनकार आणि ह.भ.प. (श्रीमती) प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी या मराठवाड्यातील पहिल्या महिला कीर्तनकार आहेत. त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षापासून कीर्तनसेवेस प्रारंभ केला. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि बृहन्महाराष्ट्र येथे ५ सहस्रांहून अधिक कीर्तने केली आहेत. त्यांनी महिला सक्षमीकरण, ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’; ‘स्त्री भ्रूणहत्या पाप आहे’, वृक्षारोपण, स्वच्छता संदेश अशा सामाजिक आणि क्रांतीकारकांचे चरित्र अशा विविध विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. ग्रामीण भागात ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘दासबोध’ या ग्रंथांचे पारायण करून या धार्मिक माध्यमांतूनही त्यांनी महिलांचे संघटन केले आहे.
ह.भ.प. (श्रीमती) प्रज्ञाताई भरतबुवा रामदासी यांनी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक सेवा संचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या कीर्तन प्रशिक्षण शिबिरात नवोदित कीर्तनकारांना प्रशिक्षण देण्याचे महान कार्य केलेले आहे. ‘महिला सबलीकरण’ आणि ‘स्त्रीभ्रूण हत्या’ या विषयांवर कीर्तने करून समाजप्रबोधन केल्याविषयी राज्याच्या तत्कालीन महिला कल्याण आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त त्यांना ‘गौरव स्त्री शक्तीचा’, ‘कस्तुरी रत्न’, ‘सन्मान स्त्री शक्तीचा’, ‘कीर्तन विदुषी’, ‘भक्तीश्री’, ‘कीर्तन पारंगत’ अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
वडील आणि पती यांच्या साहाय्याने कीर्तनक्षेत्रात कार्य करण्याची संधी लाभणे !
माझे वडील देवीदास श्रीराम मांडे हे एक वैदिक, ज्योतिषाचार्य, कीर्तनकार, संगीत, नाटक, वादक, लेखक, कवी अशा अनेक गुणांचा समुच्चय असलेले व्यक्तीमत्त्व होते. त्यांनी लहानपणापासूनच माझ्यात कीर्तनाची गोडी निर्माण केली आणि मला कीर्तन करण्यास प्रोत्साहनही दिले. पुढे वैकुंठवासी ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांच्याशी विवाह झाल्यानंतर तेही कीर्तनक्षेत्रातील असल्यामुळे त्यांच्यासह संसार करतांना कीर्तन सेवेत कधीही खंड पडला नाही. वडील आणि पती यांच्या साहाय्याने कीर्तनक्षेत्रात कार्य करण्याची संधी लाभली.
सनातनच्या साधकांची प्रामाणिकपणे कार्य करण्याची पद्धती एक अद्वितीय अनुभव ! – ह.भ.प. (श्रीमती) प्रज्ञाताई भरतबुवा रामदासीकीर्तन सेवेच्या निमित्ताने मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली. तेथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विचारांचे अस्तित्व सनातनच्या साधकांच्या आचरणातून अनुभवता आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या विचारांनी प्रेरित झालेले साधक मला अनेक ठिकाणी भेटले. साधकांची तळमळ, त्यांची कार्यातील निःस्पृहता, तत्त्वनिष्ठता, प्रामाणिक कार्य करण्याची पद्धती एक अद्वितीय अनुभव आहे. त्याचदृष्टीने ‘आपलाही खारीचा वाटा असावा’, या विचाराने अनेक ठिकाणी व्याख्यान घेण्याची सेवा केली. |