‘एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सूक्ष्म स्तरावर अनुभवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे देत आहे.
१. सत्संगात साधक सांगत असलेल्या सूत्रांकडे लक्ष न जाता पुष्कळ आनंद अनुभवणे
या सत्संगात संतांसह साधक उपस्थित होते. साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांना स्वत:चे साधनेचे प्रयत्न आणि अनुभूती सांगत होते, त्या वेळी मला पुष्कळ आनंद अनुभवायला येत होता. या आनंदाचे प्रमाण एवढे होते की, साधक सांगत असलेल्या माहितीकडे लक्ष न जाता माझे लक्ष आनंदाकडे केंद्रित होत होते.
२. सत्संगस्थळी श्री. निषाद यांना सत्यलोकाचे आणि कु. मधुरा भोसले यांना वैकुंठाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवणे
या सत्संगात पुष्कळ प्रमाणात सात्त्विकता जाणवत असून ती स्थिर होती. यासंदर्भात ईश्वराने सांगितले, ‘सत्ययुगात अशीच स्थिती होती. सत्ययुगात जेवढी सात्त्विकता असायची, जवळपास तेवढी सात्त्विकता आता सत्संगस्थळी निर्माण झाली आहे.’ हे सूत्र माझ्यासाठी नवीन असल्याने मी ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनीही ‘त्यांना सत्संगस्थळी वैकुंठाचे वातावरण निर्माण झाल्याचे जाणवत आहे’, असे सांगितले.
३. सत्संगात परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व श्रीराम आणि श्रीकृष्ण यांप्रमाणे दिसणे
या सत्संगात मला परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे सूक्ष्म रूप श्रीराम आणि श्रीकृष्ण या अवतारांच्या वेशभूषेत दिसत होते.
४. सत्संगात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूतींच्या संदर्भात मिळालेले ईश्वरी ज्ञान
४ अ. साधकांचे अंतरंग साधनेत रममाण झाल्याने सत्ययुगाचे वातावरण निर्माण होणे : ‘ज्या वेळी साधकाचे अंतरंग म्हणजे मन आणि बुद्धी पूर्णपणे सत्मध्ये (साधनेमध्ये, ईश्वरामध्ये) रममाण होते, त्या वेळी त्या ठिकाणी सत्ययुगाचे वातावरण निर्माण होते.
४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या शिकवणीमुळे साधकांचे मन, बुद्धी आणि चित्त यांवर साधनेचे संस्कार झाल्याने त्यांना विविध प्रसंगांत अंतरंगातून ज्ञान मिळणे : सत्ययुगामध्ये विविध योगमार्गांनी साधना करणार्या जिवांच्या मनावर अत्यल्प संस्कार असल्याने त्यांना थेट ईश्वराकडून सूक्ष्मातील मार्गदर्शन मिळायचे किंवा विविध अनुभूतींतून ईश्वर त्यांना शिकवायचा. पुढे त्रेता आणि द्वापर या युगांमध्ये समष्टीची आध्यात्मिक पातळी अल्प झाल्याने श्रीराम आणि श्रीकृष्ण अशा अवतारांना जन्म घेऊन सर्व योगमार्गांचे मार्गदर्शन करावे लागले.
वर्तमान कलियुगात परात्पर गुरु डॉक्टर आठवले अवतारांप्रमाणेच सर्व योगमार्गी जिवांना मार्गदर्शन करत आहेत. अनेक वर्षे त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आता साधकांचे मन, बुद्धी आणि चित्त यांवर साधनेचे संस्कार होत आहेत. या संस्कारांमुळे त्यांना विविध कठीण प्रसंगांमध्ये अंतरंगातून म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त यांतून साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन मिळत आहे. याप्रकारे अंतरंगातून मिळणार्या मार्गदर्शनानुसार साधक प्रयत्न करत असल्याने त्यांची आध्यात्मिक उन्नती होत आहे. हीच प्रक्रिया ‘सत्संगात सत्ययुगाचे वातावरण निर्माण होणे आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे सूक्ष्म अस्तित्व श्रीराम अन् श्रीकृष्ण अशा अवतारांप्रमाणे दिसणे’, या अनुभूतींतून शिकण्यास मिळाली.’
५. सत्संगात एका साधिकेने कर्नाटक येथील एका बालसाधकाविषयी सांगितल्यावर अनाहत चक्राच्या ठिकाणी गारवा जाणवून भाव आणि आनंद अनुभवणे अन् आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवून ध्यान लागणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात कर्नाटक येथील युवा साधिका कु. सविता हलगेकर हिने तिचा भाचा (बहिणीचा मुलगा) कु. समर्थ पटदारीच्या संदर्भात माहिती सांगितली. तिने माहिती सांगणे चालू केल्यावर अकस्मात् माझ्या अनाहत चक्राच्या ठिकाणी गारवा जाणवून पुष्कळ आनंद होऊ लागला. ‘माझ्या आध्यात्मिक हृदयाला आनंद होत होता’, असे मला जाणवले. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञताही वाटत होती. ‘दोन्ही हात जोडून किंवा लोटून त्या बालसाधकाला शिरसाष्टांग नमन करावे’, असे मला जाणवत होते. एक-दोन मिनिटांनंतर मला माझ्या आज्ञाचक्रावर स्पंदने जाणवून माझे ध्यान लागू लागले. ‘या बालसाधकाची आध्यात्मिक पातळी चांगली आहे’, असे विचार माझ्या मनात आले.’
– श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|