गोवा विधानसभा निवडणुकीत स्वत:चा सहभाग नसल्याचे प्रशांत किशोर यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेेला उधाण

पणजी, १ मार्च (वार्ता.) –  तृणमूल काँग्रेसचे राजकीय धोरण ठरवणारे नेते म्हणून प्रशांत किशोर यांची ओळख आहे; मात्र प्रशांत किशोर यांनी हल्लीच एका राष्ट्रीय वृत्तसंस्थेचे पत्रकार करण थापा यांना दिलेल्या मुलाखतीत ‘माझा गोवा विधानसभेच्या निवडणुकीत सहभाग नव्हता’, असे विधान केल्याने गोव्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

प्रशांत किशोर

मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, ‘‘मी देहली किंवा गोवा येथे असलो, तरी तेथे निवडणुकीत सहभागी आहे, असे होत नाही. राजकीय निरीक्षणासाठी मी कुठेही जाऊ शकतो; मात्र त्याचा अर्थ मी प्रत्यक्ष राजकारणात किंवा निवडणुकीत सहभागी आहे, असा होत नाही.’’ प्रशांत किशोर यांच्या या विधानुमळे गोव्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांतील नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये आणणे आणि मगोपशी युती करणे आदी अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये प्रशांत किशोर यांचा मोठा सहभाग होता, असे संबंधित नेत्यांनीच यापूर्वी सांगितले आहे. तृणमूल काँग्रेसचे कळंगुट येथील नेते तथा माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी स्वत: ते, जोझेफ सिक्वेरा (हे आता भाजपचे उमेदवार आहेत) आणि अँथनी मिनेझिस हे २ वेळा प्रशांत किशोर यांना भेटल्याचे सांगितले आहे. राजकीय विश्‍लेषकांच्या मते, तृणमूल काँग्रेसने गोव्यातील निवडणुकीत सुमार कामगिरी बजावली आहे आणि याचा ठपका त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर पडू नये; म्हणून प्रशांत किशोर गोव्यातील निवडणुकीतून अंग काढून घेत आहेत.