पीडित विद्यार्थिनीचा लेखी जबाब घेतला !
अधिष्ठातासारख्या उच्च पदावर असणार्या अधिकार्यांनी विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणे संतापजनक आणि लज्जास्पद आहे ! ८ वर्षांपूर्वी त्यांच्यावर कठोर कारवाई न झाल्याचाच हा परिणाम आहे ! – संपादक
संभाजीनगर – येथील एका विवाहित विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयाचे अधिष्ठाता रमेश वडजे यांची ५ सदस्यीय समितीच्या वतीने २८ फेब्रुवारीपासून चौकशी चालू झाली आहे. याच दिवशी समितीने आधी पीडित विद्यार्थिनीचा जबाब घेतला. त्यानंतर वडजे यांचीही चौकशी केली. ८ वर्षांपूर्वीही रमेश वडजे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला होता. पीडित विद्यार्थिनीच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिकवणीवर बहिष्कार टाकला आहे.
‘फाईन आटर््स’चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने मुंबई येथील कला संचालनालयाचे प्रभारी संचालक राजीव मिश्रा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत तिने ४ प्रसंगांचा उल्लेख करून अधिष्ठाता रमेश वडजे हे तिच्यावर दबाव टाकून अश्लील संवाद साधतात, तसेच स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात. ‘त्यांच्यावर कठोर कारवाई करावी,’ अशी मागणी केली होती. त्यानंतर मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार साहाय्यक प्राध्यापक शायनी देठे, प्रा. अश्विनी सालोडकर आणि प्रा. विजय सुरळकर यांच्यासह अन्य दोघांचा समितीत समावेश आहे.
८ वर्षांपूर्वी नाशिक येथे रमेश वडजे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप झाला होता !८ वर्षांपूर्वी नाशिक येथील ललित कला महाविद्यालयात प्राचार्य असतांना एका विद्यार्थिनीने वडजे यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. १८ सप्टेंबर २०१४ या दिवशी पीडित विद्यार्थिनीने संस्थेच्या सरचिटणीसांकडे लेखी तक्रार केली होती. अश्लील संवाद साधणे, मागे-मागे येणे, स्पर्श करण्याचा प्रयत्न करणे, महाविद्यालयाची वेळ संपल्यानंतर दालनात थांबण्यासाठी आग्रह करणे, कुणाकडे तक्रार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे धमकावणे होते. या प्रकारांना कंटाळून विद्यार्थिनीने तक्रार केली होती. त्या वेळी वडजे यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे त्या विद्यार्थिनीने सांगितले. (विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीची नोंद न घेणार्यांवरही कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे ! – संपादक) |