|
मिरज, २४ फेब्रुवारी (वार्ता.) – मिरज एज्युकेशनच्या ‘वान्लेस नर्सिंग कॉलेज’ येथे परिचारिका विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. येथील परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार्या काही महिला, विद्यार्थिनी यांना ‘गळ्यात मंगळसूत्र घालून परीक्षा द्यायची नाही’, असे सांगून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र बाजूला काढून ठेवण्यास सांगण्यात आले. या प्रकरणी भाजपने प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन ७ दिवसांत संबंधित पर्यवेक्षकांचे अन्वेषण करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली आहे. प्रांताधिकार्यांच्या वतीने हे निवेदन निवासी नायब तहसीलदार नारायण मोरे यांनी स्वीकारले. या वेळी भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, महिला आघाडीच्या रूपाली देसाई, व्यापारी मंडळ अध्यक्ष नीलेश साठे, उपाध्यक्ष भास्कर कुलकर्णी, सुचिता बर्वे, राजन काकडे उपस्थित होते.
या संदर्भात अधिक माहिती अशी की,
१. हा प्रकार समजल्यावर भाजपचे श्री. ओंकार शुक्ल यांनी प्राचार्यांशी संपर्क केल्यावर त्यांनी ‘असा प्रकार घडला नसल्याचे’ सांगितले.
२. वास्तविक ज्या विद्यार्थिनी परीक्षेसाठी गेल्या होत्या त्यांनी असा प्रकार घडल्याचे ठामपणे सांगून नर्सिंग विद्यालय आणि ‘बोर्ड’ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
३. त्यामुळे भाजपने या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी प्रांताधिकार्यांना निवेदन दिले असून ‘हिंदु महिलांच्या संदर्भात धर्माचरण करण्यास प्रतिबंध करणारे, असे प्रकार खपवून घेणार नाही’, असे श्री. ओंकार शुक्ल यांनी पत्रकारांना सांगितले.