नवी मुंबई – महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना घोषित करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून सिद्ध केलेली ही सदोष प्रभाग रचना न पालटल्यास न्यायालयात दाद मागणार आहे, अशी माहिती ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गणेश नाईक पुढे म्हणाले की, प्रारूप प्रभाग रचना सिद्ध करतांना ऐरोली पश्चिम भागात ज्या पक्षाचे प्राबल्य आहे, त्या विशिष्ट पक्षाला निवडणुकीत लाभ मिळवून देण्यासाठी प्रभागांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे ३ सहस्र ८५२ हरकती आल्या आहेत. नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते या सीमा घेण्याऐवजी छोट्या गल्ल्या यांची सीमारेषा ठरवली आहे. इमारतींचे, घरांचे, वस्त्यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वस्त्यांचे विभाजन होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता होती. या नियमाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेमध्ये राज्य निवडणूक आयोग, महापालिका अधिनियमातील तरतुदी, उच्च आणि सर्वोच्च न्यायालय यांचे निर्देशांचे पालन करून अंतिम प्रभाग रचना करावी. निवडणूक आयोग सदोष प्रभाग रचना पालटून नियमानुसार दुरुस्त्या करेल, असा विश्वास आहे; मात्र जर तसे झाले नाही, तर उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करू.