महापालिका निवडणुकीसाठी केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर साडेतीन सहस्र हरकती- सूचना प्राप्त !

पुणे – आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेने केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर तब्बल ३ सहस्र ५९६ हरकती-सूचना प्राप्त झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेअन्वये महापालिकेच्या निवडणूक शाखेने १ फेब्रुवारी या दिवशी प्रारूप प्रभाग रचना आराखडा घोषित केला होता. त्यानंतर त्यावर हरकती-सूचना मागवण्याची प्रक्रिया चालू केली. निवडणुकीसाठी इच्छुक नगरसेवक, विद्यमान नगरसेवक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी त्यावर हरकती-सूचना नोंदवल्या आहेत. नैसर्गिक हद्द लक्षात न घेता प्रभाग रचना करण्यात आली आहे, लोकसंख्येच्या निकषाचे पालन झालेले नाही, प्रभाग रचना करतांना समानता दिसत नाही, सोसायट्यांचे भाग तोडण्यात आले आहेत, असे आक्षेप हरकती-सूचनांद्वारे नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली. प्राप्त हरकती आणि सूचना यांवर २६ फेब्रुवारी या दिवशी सुनावणी होणार आहे. सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकार्‍यांनी केलेल्या शिफारशींच्या संदर्भातील विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला २ मार्च या दिवशी पाठवणार असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच प्रभागाचा अंतिम आराखडा घोषित होईल.