भावी पिढीला मूल्यांची शिकवण देण्याचे काम पालकांनी करावे ! – डॉ. राम लाडे, विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान

आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके

सांगली, १९ फेब्रुवारी (वार्ता.) – बलशाली समाज निर्मितीसाठी झोकून देऊन कार्यरत राहिल्यास समृद्धी नांदेल. राष्ट्राला परमवैभव प्राप्त करून देण्यासाठी यज्ञातील समिधा बनूनच कार्यरत रहाण्याची आवश्यकता आहे. वर्तमानकाळात संवेदनशीलता वाढत असल्याने सेवाभाव अल्प होतो कि काय, अशी स्थिती आहे. त्यामुळे भावी पिढीला मूल्यांची शिकवण देण्याचे काम पालकांनी करावे, असे आवाहन बामणोली येथील विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राम लाडे यांनी केले. डॉ. राम लाडे यांच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान या संस्थेला १७ फेब्रुवारी या दिवशी ‘आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके’ पुरस्कार देण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

डॉ. राम लाडे (मध्यभागी) यांना सन्मानपत्र देतांना नेत्ररोग तज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन, तसेच अन्य

वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्राची परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर्.डी. श्रीवास्तव, पुरस्काराचे अर्पणदाते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरद फडके, नितीन मारू, डॉ. मंजिरी फडके, विकास जोशी, वसंतराव आपटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यवाह सुहास करंदीकर यांनी आभार मानले.