|
नवी देहली – ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण संस्थे’ने नुकत्याच ओडिशामध्ये केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये गेल्या ५ वर्षांत मद्यपान आणि तंबाखू यांचे सेवन करणार्या महिलांची संख्या वाढली असून पुरुषांची संख्या न्यून झाली आहे, असे म्हटले आहे.
१. या अहवालानुसार वर्ष २०१५-१६ मध्ये १५ वर्षांवरील महिलांमध्ये मद्यपानाचे प्रमाण २.४ टक्के होते, ते वर्ष २०२०-२१ मध्ये वाढून ४.३ टक्क्यांवर पोचले आहे. त्याच वेळी पुरुषांच्या संदर्भात वर्ष २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ३९.३ टक्के होते. ते घटून २८.८ टक्क्यांवर आले आहे.
२. ओडिशातील ग्रामीण भागांत रहाणार्या १५ वर्षांवरील वयोगटातील पुरुष आणि महिला या शहरी भागातील महिला अन् पुरुष यांच्या तुलनेत अधिक मद्यपान करत असल्याचे दिसून आले. शहरी भागातील २२.७ टक्के पुरुषांच्या तुलनेत ३०.२ टक्के ग्रामीण भागातील पुरुष दारू पित असल्याचे दिसून आले. मद्यपान करणार्या महिलांच्या संदर्भात हे प्रमाण ग्रामीण भागात ४.९ टक्के आणि शहरी भागात १.४ टक्के आहे.
३. केवळ मद्यपानच नाही, तर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे तंबाखू सेवनाचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये १७.३ टक्के महिलांना तंबाखू खाण्याचे व्यसन होते; मात्र या अहवालानुसार हा आकडा आता २६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. शहरी भागातील १६.६ टक्के, तर ग्रामीण भागातील २६ टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. तंबाखू खाणार्या पुरुषांचा आकडा ५५.९ टक्क्यांवरून घसरत ५१.६ टक्के झाला आहे. ग्रामीण भागात हाच आकडा ५८.८ टक्क्यांवरून घटून ५४.१ टक्क्यांवर आला आहे. शहरी भागातील पुरुषांमधील तंबाखू सेवनाचे प्रमाणही घटले असून हा आकडा ४५.३ टक्क्यांवरून घटून ४०.५ टक्के झाला आहे.