द्वेषाचे प्रतीक असलेल्या व्यक्तीला मी उत्तर देणार नाही !

हिजाबला विरोध केल्याने असदुद्दीन ओवैसी यांची तस्लिमा नसरीन यांच्यावर टीका

एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी व बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

भाग्यनगर (तेलंगाणा) – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एका मुलाखतीमध्ये ‘हिजाब, बुरखा किंवा निकाब हे दडपशाहीचे प्रतीक आहेत’, असे सांगितले होते. यावर एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका करतांना, ‘मी द्वेषाचे प्रतीक असलेल्या व्यक्तीला उत्तर देणार नाही. मी अशा व्यक्तीला उत्तर देणार नाही, जिला भारताकडून आश्रय दिला गेला आहे आणि जी भारताच्या तुकड्यांवर पडून आहे. जी व्यक्ती स्वतःच्या देशात स्वतःला वाचवू शकली नाही, तिच्याविषयी मी बोलणार नाही’, असे म्हटले आहे. तस्लिमा नसरीन यांना बांगलादेशातील धर्मांधांकडून ठार मारण्याच्या फतव्यामुळे भारतात आश्रय घ्यावा लागला आहे. त्या अनेक वर्षांपासून भारतात रहात आहेत.

असदुद्दीन ओवैसी तस्लिमा यांच्याविषयी पुढे म्हणाले की,

१. उदारमतवादी व्यक्ती केवळ त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याविषयी आनंदी आहेत. उदारमतवाद्यांना ‘प्रत्येक मुसलमानाने त्यांच्यासारखे वागावे’, असे वाटते, तर उजव्या विचारसरणीच्या कट्टरतावाद्यांची अशी इच्छा आहे की, आम्हाला (मुसलमानांना) राज्यघटनेने दिलेली आमची धार्मिक ओळख आम्ही सोडावी.

२. भारतीय राज्यघटनेने मला निवडीचे, विवेकाचे आणि माझी धार्मिक ओळख पुढे नेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे आणि कुणीही कोणत्याही व्यक्तीला धर्म सोडण्यास सांगू शकत नाही. भारत हा बहु-सांस्कृतिक, बहु-धार्मिक देश आहे; पण मला कुणीही कसे वागावे, हे सांगू शकत नाही आणि कुणीही मला माझा धर्म किंवा माझी संस्कृती सोडण्यास सांगू शकत नाही.