भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंत्रिमंडळाकडून पूर्णत: मान्यता ! – शिक्षणमंत्री उदय सामंत

दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर

रत्नागिरी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली १७ फेब्रुवारी या दिवशी कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे २ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयामध्ये भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयास मंत्रिमंडळाकडून पूर्णत: मान्यता आणि राज्यभरातील विद्यापिठांमधील अध्यासन केंद्रांना ३ कोटी रुपयांचा निधी देण्याच्या निर्णयांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

 (सौजन्य : Maharashtra Live)

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले,

१. आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय उभारण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न केले; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या हयातीत महाविद्यालयाच्या जागेचे भूमीपूजन होऊ शकले नाही.

२. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कलीना येथील ३ एकरचा भूखंड या महाविद्यालयासाठी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच तेथे भूमीपूजन होईल.

मंत्री उदय सामंत

३. प्रत्येक विद्यापिठात एक अध्यासन केंद्र आहे. ही अध्यासन केंद्र विद्यापिठाने निर्माण केली आणि त्यानंतर या अध्यासन केंद्राकडे बघण्याचा दृष्टीकोन, आर्थिक परिस्थिती आणि त्या अध्यासनाला ताकद न दिल्याने तिथे कर्मचारी मिळू शकले नाही, तिथे नवनवीन उपक्रम होऊ शकले नाही.

४. या पार्श्‍वभूमीवर आज निर्णय झाला की, आजपर्यंत राज्यातील जी १८ अध्यासन केंद्रे चालू झालेली होती. त्यांना प्रत्येकी ३ कोटी रुपयांचा निधी द्यायचा. एकदाच निधी द्यायचा आणि प्रतिवर्षी त्या व्याजातील १७ लाख रुपयांतून ही अध्यासन केंद्र चालवायची.