काणकोण, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा मुक्तीलढ्यात गोमंतकीय युवकांमध्ये ज्याप्रमाणे डॉ. राम मनोहर लोहिया यांनी क्रांतीची ज्योत पेटवली, त्याच धर्तीवर महान स्वातंत्र्यसैनिक डॉ. पुंडलिक गायतोंडे यांनी काणकोण येथील तत्कालीन युवकांमध्ये जागरूकता निर्माण केली; मात्र स्वातंत्र्यसैनिक डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचे महान कार्य विस्मृतीत जाण्याची चिन्हे दिसत आहेत.
डॉ. पुंडलिक गायतोंडे हे मूळचे पाळोळे, काणकोण येथील आहेत. ते एक नामांकित शल्यविशारद (सर्जन) होते आणि पोर्तुगीज काळात ते म्हापसा येथे काम करत होते. ते कर्करोगावर संशोधन करत होते. मूळातच राष्ट्रप्रेमाची वृत्ती असलेले डॉ. पुंडलिक गायतोंडे यांनी वैद्यकीय परीक्षा पोर्तुगालमध्ये दिली आणि गोव्यात आल्यावर त्यांनी ‘नॅशनल काँग्रेस’मध्ये कार्य चालू केले.
‘गोवा हा पोर्तुगालचा एक भाग आहे’, या विधानाला सार्वजनिकरित्या केला विरोध आणि विरोध केल्याने पोर्तुगिजांनी सुनावली शिक्षा
पणजी येथील एका हॉटेलमध्ये १४ फेब्रुवारी १९५४ या दिवशी न्यायाधीश सेमेदु या पोर्तुगीज अधिकार्याला पोर्तुगालला परत पाठवण्यासाठी एका निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एक डॉक्टर या नात्याने डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचीही उपस्थिती होती. या कार्यक्रमात डॉ. कुलासो या व्यक्तीने निरोपाचे भाषण करतांना ‘गोवा हा पोर्तुगालचा एक भाग आहे किंबहुना गोवा हा पोर्तुगालच आहे’, असे विधान केले. या वेळी डॉ. पुंडलिक गायतोंडे यांनी ताडकन उठून ‘मी या विधानाचा विरोध करतो’, असे म्हटले. डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्या या कृतीतून एक इतिहास घडला. त्याच क्षणी डॉ. पुंडलिक गायतोंडे यांना त्यांच्या पत्नीसह कह्यात घेऊन पोर्तुगालमध्ये पाठवण्यात आले. डॉ. पुंडलिक गायतोंडे हे राष्ट्रद्रोही आणि पोर्तुगालविरोधी असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. जुलै १९५४ मध्ये त्यांच्यावर लिस्बन, पोर्तुगाल येथे खटला भरून त्यांना ३ मास कारावास आणि १२ वर्षे नागरी हक्क बंदी, अशी शिक्षा ठोठावण्यात आली, तसेच ५ वर्षे ‘पॅरोल’ (पॅरोल म्हणजे कारावासातून काही कालावधी मुक्तता मिळणे) काळात पोर्तुगालच्या बाहेर न जाण्याची अट घालण्यात आली.
गोव्यातील तत्कालीन स्वातंत्र्यसैनिकांनी डॉ. पुंडलिक गायतोंडे यांना कह्यात घेतल्याच्या कृतीचा केला निषेध
या घटनेनंतर गोव्यातील तत्कालीन स्वातंत्र्यसैनिकांनी १७ फेब्रुवारी १९५५ हा दिवस ‘गायतोंडे दिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. काणकोण येथे १७ फेब्रुवारी १९५५ या दिवशी लोलये येथील मुकुंद गंगाराम लोलयेकर यांच्या नेतृत्वाखाली १४ युवकांनी काणकोण येथे सत्याग्रह केला. यामध्ये कृष्णा देसाई, बालाजी देसाई, जयवंत लोलयेकर, जिवा गावकर, चंद्रकांत वेळीप, भिसो वेळीप, नागेश देसाई, रामदास लोलयेकर, रंगनाथ सुदिर, विष्णु पागी, विश्वंभर लोलयेकर आणि सुबा देवळी या गावडोंगरी, थाळणी, लोलये अन् पैंगीण या भागांतील युवकांचा समावेश होता. या वेळी गंगाधर लोलयेकर आणि विलासिनी प्रभु महाले यांनी जिवाची तमा न बाळगता डॉ. पुंडलिक गायतोंडे यांना कह्यात घेतल्याच्या निषेधार्थ मडगाव येथे सत्याग्रह केला.
डॉ. पुंडलिक गायतोंडे यांच्या कार्याची ओळख पुढील पिढीला होणे आवश्यक !
गोवा मुक्तीनंतर डॉ. पुंडलिक गायतोंडे यांची सुटका झाली. त्यानंतर काणकोण येथील स्वातंत्र्यसैनिकांनी स्वातंत्र्यसैनिक डॉ. गायतोंडे यांच्या कार्याची आठवण म्हणून प्रतिवर्षी १७ फेब्रुवारी हा दिवस ‘गायतोंडे दिन’ म्हणून पाळण्याचे ठरवले आणि या कार्यक्रमामध्ये काणकोण येथील उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सामावून घेण्यात आले; मात्र या उपक्रमात पुढे खंड पडला. याच कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन काणकोण येथील तत्कालीन आमदार स्व. संजय बांदेकर यांनी चावडी, काणकोण येथे उभारलेल्या मैदानाचे ‘गायतोंडे मैदान’ असे नामकरण केले, तसेच काणकोण नगरपालिकेने पाळोळे येथील एका रस्त्याचे ‘गायतोंडे रस्ता’ असे नामकरण केले. डॉ. पुंडलिक गायतोंडे यांचे बंधू नंदा गायतोंडे यांनी १७ फेब्रुवारी हा दिवस ‘गायतोंडे दिन’ म्हणून पाळण्यात यावा, यासाठी प्रयत्न केला. डॉ. गायतोंडे यांच्या मूळ निवासस्थानी हा कार्यक्रम होत असे; मात्र हा उपक्रम पुढे चालू राहिला नाही. यामुळे आजची पिढी, सरकारी यंत्रणा आणि काणकोणवासीय यांना डॉ. गायतोंडे यांच्या त्यागाचा हळूहळू विसर पडत चालला आहे. यंदा गोवा मुक्तीचे ६० वे वर्षे साजरे करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला करून देण्याची आवश्यकता आहे.