प्रथमोपचारवर्गात शिकवल्याप्रमाणे प्रसंगावधान राखून श्वास पूर्णपणे बंद झालेल्या एका लहान मुलीचे छातीदाबन करून प्राण वाचवणारे पुणे येथील श्री. संतोष चव्हाण !

‘६.१.२०२१ या दिवशी असलेल्या एका विवाहानिमित्त मी शेगाव येथे गेलो होतो. ५.१.२०२१ या दिवशी सायंकाळी विवाहाच्या मंडपात लहान मुले खेळत होती. रात्री ८ वाजता मी माझ्या एका नातेवाइकाच्या समवेत बोलत होतो. तितक्यात एका व्यक्तीने धावत येऊन ‘एका लहान मुलीला शॉक लागला आहे आणि ती तिथेच बेशुद्ध होऊन पडली आहे’, असे सांगितले. मी घटनास्थळी धावत गेलो. तोपर्यंत एका नातेवाइकाने सर्व ठिकाणचा विद्युत्प्रवाह बंद केला होता.

श्री. संतोष चव्हाण

मी तेथे पोचलो, तेव्हा त्या १० – ११ वर्षांच्या लहान मुलीचा श्वास पूर्णपणे बंद झाला होता. मी त्या मुलीला उचलून बाहेर आणले आणि तिच्या आई-वडिलांना विचारले, ‘‘मी तिला खाली भूमीवर ठेवून तिचा श्वासोच्छ्वास चालू करण्यासाठी प्रयत्न करू शकतो का ?’’ त्यांचे संपूर्ण लक्ष मुलीकडे असल्याने ते काही बोलले नाहीत. त्या वेळी भगवान श्रीकृष्णाने मला सुचवले, ‘घाबरून न जाता प्रथमोपचारवर्गात गुरुमाऊलीने जे शिकवले आहे, ते करून बघ.’ मी श्रीकृष्णाला कळकळीने प्रार्थना केली आणि प्रथमोपचारवर्गात शिकवल्याप्रमाणे आठवून तशी कृती करायला आरंभ केला. नंतर तिच्यावर छातीदाबप्रथमोपचार हा प्रथमोपचार केल्यानंतर तिचा श्वास चालू झाला. हे सर्व भगवान श्रीकृष्णानेच माझ्याकडून करवून घेतले. ‘हे प्रभु, मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे. माझ्याकडून हे जे कार्य घडले, ते तुझ्या चरणी अर्पण करतो.’

– श्री. संतोष चव्हाण, सातारा रस्ता, पुणे. (१२.३.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक