राऊत यांच्याकडून भाजपच्या विविध नेत्यांवर आरोप
मुंबई, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – भाजपच्या काही प्रमुख नेत्यांनी देहलीत भेटून मला ‘आम्ही महाराष्ट्रातील सरकार पाडणार असून त्यामध्ये तुम्ही पडू नका. आम्ही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करू. काही आमदार आमच्या हाताशी आहेत. तुम्ही आम्हाला साहाय्य केले नाही, तर केंद्रीय अन्वेषण यंत्रणा तुम्हाला ‘टाईट’ करतील’, अशा शब्दांत धमकी दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. ठाकरे सरकारला नख लागेल, असे कोणतेही कृत्य करणार नसल्याची ग्वाही देत राऊत यांनी या वेळी भाजपच्या काही नेत्यांवरच भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
संजय राऊत पुढे म्हणाले,
१. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा गैरवापर केला जात आहे.
२. महाविकास आघाडीकडे बहुमत असतांनाही भाजपचे लोक सरकार पाडण्याचा दिनांक कुणाच्या भरवशावर देत आहेत ?
३. मी नकार दिल्यानंतर तिसर्या दिवशी मी आणि माझे सहकारी यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाची धाड पडायला प्रारंभ झाला. सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहेत.
४. अन्वेषण यंत्रणा ज्या पद्धतीने आक्रमण करत आहेत, हे देशावरील संकट आहे. अन्वेषण यंत्रणा कशा प्रकारे त्रास देत आहेत, याविषयी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना मी पत्र लिहिले आहे.
५. महाराष्ट्र घाबरणारा नाही. पाठीवर वार केले, तरी शिवसेना घाबरणार नाही. गुन्हा केला नसेल, तर कुणाच्या बापाला घाबरू नका, हा संदेश आम्हाला द्यायचा आहे.
पत्रकार परिषदेतील अन्य सूत्रे
१. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांनी रामनाथ (अलिबाग) येथील कोरलाई गावात १९ बंगले बांधल्याचा आरोप केला आहे. ही दिशाभूल आहे. असे बंगले असतील, तर मी राजकारण सोडीन.
२. ‘श्रीधर पाटणकर यांनी कर्जत देवस्थानाच्या भूमी कह्यात घेतल्या’, असा आरोप झाला होता. एकमेकांना विकलेल्या अशा १० व्या माणसांकडून ती भूमी खरेदी केली. देवस्थानची भूमी कशी घेतली ? हे सिद्ध करून दाखवावे.
३. ज्या किरीट सोमय्या यांनी शाळेत मराठी भाषा सक्तीची करू नये, यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती, ते महाराष्ट्रातील भाजपचा मुखवटा आहेत.
४. माझ्या नावे असलेल्या ५५ गुंठे भूमीची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडून चालू आहे. माझ्या नातेवाइकांची चौकशी चालू असून त्यांना कारागृहात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
पी.एम्.सी. बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याने भाजपला २५ सहस्र कोटी रुपये पक्षनिधी दिला !
१. पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बँक (पी.एम्.सी. बँक) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी राकेश वाधवान याच्या खात्यातून २५ सहस्र कोटी रुपये पक्षनिधी म्हणून भाजपच्या खात्यात जमा झाले आहेत.
२. राकेश वाधवान याच्याकडून किरीट सोमय्या यांनी गोखिवले (वसई) येथील ४०० कोटी रुपयांची भूमी केवळ साडेचार कोटी रुपयांना देवेंद्र रजनीकांत लधानी यांच्या नावे घेतली आहे.
३. या भूमीवर जी ‘निकॉन इन्फा कन्स्ट्रक्शन कंपनी’ आहे, तिचे व्यवस्थापकीय संचालक किरीट सोमय्या यांचा मुलगा नील हा आहे. यासह किरीट सोमय्या यांनी राकेश वाधवान यांच्याकडून ८० ते १०० लाख रुपये लधानी यांच्या नावे घेतले आहेत. हे आस्थापन उभे करण्यासाठी ‘पी.एम्.सी. बँक’ घोटाळ्यातील पैसा वापरण्यात आला. हे आस्थापन उभारतांना हरित लवादाच्या नियमांचे पालन करण्यात आलेले नाही. या प्रकरणी हरित लवादाने कारवाई केली, तर २०० कोटी रुपयांचा दंड होऊ शकेल. ‘पी.एम्.सी. बँकेतील घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील याला अटक करण्यात यावी. या बँकेत घोटाळा होण्यापूर्वी सोमय्या यांनी त्यांचे पैसे काढून घेतले. या सर्व प्रकरणाची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी. या घोटाळ्याची सर्व कागदपत्रे मी अंमलबजावणी संचालनालयाकडेही पाठवली आहेत; मात्र हे सर्व अंमलबजावणी संचालनालयाचे दलाल आहेत.
मुंबईतील ७० बिल्डरकडून ‘ईडी’च्या नावाने वसुली चालू आहे !
मागील ४ मासांपासून मुंबईतील ७० बिल्डरांकडून अंमलबजावणी संचालनालयाच्या नावाने वसुली चालू आहे. ही सर्व माहिती मी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देणार आहे. फरीद शहा, रोमी आणि फिरोज शमा यांनी मुंबईतील बिल्डरांकडून ३०० कोटी रुपये वसूल केले आहेत. यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाचे लोकही सहभागी आहेत.
संजय राऊत यांचे भाजप आणि अंमलबजावणी संचालनालय यांवर गंभीर आरोप
१. भाजपच्या एका माजी वनमंत्र्यांनी त्यांच्या मुलाच्या विवाहासाठी साडेनऊ कोटी रुपयांचे गालिचा (कार्पेट) टाकला होता.
२. हरियाणा येथील नरवण नावाचा एक दूधवाला ७ सहस्र कोटी रुपयांचा मालक कसा झाला ? महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यापासून त्याचे महाराष्ट्रात येणे-जाणे चालू झाले. त्याला साडेतीन सहस्र कोटी रुपये महाराष्ट्रातून गेले आहेत.
३. भाजपची सत्ता असतांना राज्यात ‘महाआयटी’मध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला. अमोल काळे या व्यक्तीला विनानिविदा कामाचा ठेका दिला गेला.
४. मोहीत कंबोज यांनी पत्राचाळ येथे जी भूमी विकत घेतली आहे, तो ‘पी.एम्.सी.’ बँक घोटाळ्यातील पैसा आहे. या ठिकाणी कंबोज एक प्रकल्प निर्माण करत आहेत. कंबोज यांनी १२ सहस्र कोटी रुपयांची ही भूमी राकेश वाधवान यांच्याकडून केवळ १०० कोटी रुपयांना खरेदी केली. कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस असून तो फडणवीस यांना बुडवणार आहे.