‘वाईन’चे समर्थन करणारे खालील प्रश्नांची उत्तरे देतील का ?

गेल्या मासात महाराष्ट्र सरकारने किराणा दुकानांमध्ये ‘वाईन’ विक्री करण्याचा निर्णय घोषित केला आहे. या निर्णयाच्या विरोधात वाईनचे समर्थन करणार्‍यांना सामाजिक माध्यमांमधून काही प्रश्न विचारले जात आहेत. ते येथे देत आहोत.

१. ऊसापासून देशी दारू बनते; मग ऊस उत्पादक शेतकर्‍याला लाभ का होत नाही ?

२. ज्वारीपासून ‘बिअर’ बनते; मग ज्वारी उत्पादकाला लाभ का होत नाही ?

३. पूर्वीपासून वाईन द्राक्षापासून बनवली जात आहे, तर शेतकर्‍यांची किती प्रगती झाली ?

४. कापसापासून कापड होते; मग कापूस उत्पादक आत्महत्या का करत आहे ?

५. सोयाबीनपासून सोयामील तेल निघते; मग सोयाबीन उत्पादक आत्महत्या का करत आहे ?

६. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरात दूध असतेच; मग दूध उत्पादक तोट्यात का आहेत ?

७. शेतकर्‍यांनी पिकवलेला शेतमाल कवडीमोल दरात विकत घेऊन पोटभर अन्न खाणार्‍यांचे पोट वाढलेले असतांना शेतकर्‍यांना उपाशी राहून त्यांना आत्महत्या का करावी लागत आहे ?

धवलक्रांती झाली, हरितक्रांती झाली, तरी शेतकर्‍यांना सुखाचे दिवस का आले नाहीत ? आता मद्यक्रांतीतून शेतकर्‍यांच्या जीवनात कोणता पालट होणार आहे ? साखर कारखान्याचा अध्यक्ष, दूध संघाचा अध्यक्ष, वाईन/दारू उद्योगाचे अध्यक्ष यांच्या भल्यासाठी, विदेशी उद्योगांच्या प्रगतीसाठी शेतकर्‍यांचे बळी देणारे सम्राट आणि वाईनचे समर्थन करणारे वरील प्रश्नांची उत्तरे देतील का ?

शेतकर्‍यांना शिकवणार्‍यांनी प्रथम शेतीची समस्या सोडवावी आणि नंतर त्याविषयी बोलावे !

(साभार : सामाजिक संकेतस्थळ)