सांगली, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – थोर महापुरुष, महनीय व्यक्ती यांच्या पुतळ्यांची स्थापना करण्यापूर्वी आवश्यक त्या सर्व अनुमती घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि राज्यशासन यांनी नियमावली ठरवली आहे. त्यामुळे जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. जिल्हाधिकारी यांच्या दालनात जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याच्या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी हे आवाहन केले. या वेळी पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, तहसीलदार जीवन बनसोडे, माजी आमदार विलासराव जगताप यांसह अन्य उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चबुतर्यावर लवकरात लवकर बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यात येईल; मात्र कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ नये यांसाठी स्थानिक पदाधिकारी अन् जनता यांनी सहकार्य करावे.’’