कठीण शारीरिक त्रासांवर मात करणार्या आणि सतत भावावस्थेत रहाणार्या फोंडा, गोवा येथील सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे (वय ४८ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !
सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे या आहेत श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या मधल्या बहीण !
रामनाथी, गोवा – ढवळी, फोंडा, गोवा येथे रहाणारे पू. सदाशिव परांजपे यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी २० जानेवारी २०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात पार पडला. याच कौटुंबिक कार्यक्रमात पू. सदाशिव परांजपे आणि पू. (सौ.) शैलजा परांजपे यांच्या मधल्या कन्या अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या बहीण सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे यांनी कठीण शारीरिक त्रासांवर मात करत आणि सतत भावावस्थेत राहून जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाल्याची आनंदवार्ता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अन्य एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना दिली.
अशी झाली आनंदवार्तेची घोषणा !
पू. सदाशिव परांजपे यांचा सहस्रचंद्रदर्शन शांतीविधी झाल्यानंतर त्यांच्यासह पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांचा सन्मान पू. नीलेश सिंगबाळ अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केला. त्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘पू. परांजपेआजोबांच्या झालेल्या विधीच्या कार्यक्रमातील वातावरण ब्राह्ममुहूर्तावर जसे चैतन्यमयी आणि आनंदी असते, तसे अनुभवायला आले. याचसमवेत ‘आपण एखादा उत्सव साजरा करत आहोत’, असे पुष्कळ वेळा अनुभवता आले’, असे सांगितले. यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘पू. परांजपेआजी-आजोबा यांना ३ मुली (ज्येष्ठ कन्या श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, मधल्या कन्या सौ. मधुरा सहस्रबुद्धे आणि ६५ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या धाकट्या कन्या सौ. शीतल गोगटे) असून त्यांतील सौ. मधुरा सहस्रबुद्धे आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले त्यांचे पती श्री. मनोज सहस्रबुद्धे यांना पू. आजी-आजोबा यांचा सहवास अधिक मिळाला. श्री. आणि सौ. सहस्रबुद्धे यांनी पू. आजी-आजोबा यांची सेवा पुष्कळ भावपूर्ण केली. त्यामुळे पू. आजी-आजोबा यांच्याविषयी श्री. आणि सौ. सहस्रबुद्धे यांनी शिकायला मिळालेली सूत्रे सांगावीत’, असे सांगितले. यानंतर श्री. मनोज आणि सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांनी पू. आजी-आजोबा यांच्याविषयीच्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली. या प्रसंगी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांनी ‘सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांच्या बोलण्यातून भावजागृती होते, असे जाणवते. त्या कठीण शारीरिक त्रासावर मात करत असतांना सतत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात आणि भावावस्थेत असतात. त्यामुळेच त्यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे’, अशी घोषणा करून उपस्थित कुटुंबियांना आनंदवार्ता दिली. या वार्तेमुळे उपस्थित सर्वांची भावजागृती झाली.
यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याविषयी भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
परात्पर गुरुदेवांमुळेच आध्यात्मिक प्रगती साध्य होऊ शकली ! – सौ. मधुरा सहस्रबुद्धे
मला अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींचा त्रास होत असतो; पण परात्पर गुरुदेवांनी दिलेल्या शक्तीमुळे आणि त्यांच्या अनुसंधानात राहिल्यामुळेच मला त्रास जाणवत नाही. माझी पातळी घोषित होणे, हे केवळ परात्पर गुरुदेवांमुळेच साध्य होऊ शकले. आज सकाळपासूनच मला पुष्कळ आनंद आणि भावाची स्थिती अनुभवता येत आहे.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेले मार्गदर्शन
सौ. मधुरा या कठीण आणि खडतर प्रारब्धावर मात करत भावस्थितीत असतात. कठीण प्रसंगांत भावाच्या आणि आनंदाच्या स्थितीत स्थिर रहाणे, हे साधकांनी शिकायला हवे अन् स्वतःची आध्यात्मिक प्रगती साध्य करायला हवी. – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांची सातत्याने भावजागृती होत होती.)
कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत
श्री. मनोज सहस्रबुद्धे (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांचे पती, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
गेल्या काही दिवसांपासून सौ. मधुरा ही भावस्थितीत असल्याचे जाणवते, तसेच तिच्या चेहर्यामध्ये पालट जाणवून तिची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचेही जाणवले.
सौ. शीतल गोगटे (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांची धाकटी बहीण, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के)
सौ. मधुरा ही लहानपणापासून अनेक आजारांना सामोरी गेली आहे. तसेच तिला अनेक शारीरिक त्रासांनाही सामोरे जावे लागले आहे; पण तिने कायम परिस्थिती स्वीकारून आणि प्रारब्ध भोग आनंदाने स्वीकारले.
श्री. आशिष सहस्रबुद्धे (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांचा मोठा मुलगा)
मी कार्यक्रमाला आल्या आल्या श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे दर्शन घेत होतो. त्या वेळी मी प्रार्थना केली. त्या वेळी माझ्या बाबांनी मला विचारले की, काय जाणवत आहे ? प्रारंभी मला काही जाणवले नाही; पण नंतर नीट बघितल्यानंतर मला त्या वेळी देवीच्या मुखमंडलाच्या ठिकाणी माझ्या आईचा, म्हणजे सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांचा तोंडवळा दिसत होता. त्या वेळी मला त्याचा कार्यकारणभाव कळला नाही. थोड्या वेळातच मला आईची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्याचे कळले. तेव्हा मला कळले की, देवीलाही मला हेच सांगायचे होते.
श्री. अनिकेत सहस्रबुद्धे (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांचा लहान मुलगा)
आम्ही सांगली येथे असतांना आई मला बर्याच वेळा म्हणायची की, माझे भोग कधी संपणार ?; पण गोव्यात आल्यापासून तिचे ते म्हणणे आपोआपच बंद झाले. यातून ‘तिचा अपेक्षांचा भाग न्यून झाला आहे, हे जाणवले. यातून मला तिचे भोगही संपले असणार; म्हणूनच तिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली’, असे वाटले.
सौ. सायली सिद्धेश करंदीकर (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांची भाची ((श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची मुलगी)
१. मी दिवाळी किंवा मे मासाच्या सुटीमध्ये सांगली येथे पू. परांजपेआजींच्या घरी अथवा मावशीच्या घरी गेल्यावर तिने मला आईची (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची) उणीव कधी जाणवू दिली नाही. तिने आम्हा चारही भावंडांवर (श्री. आशिष सहस्रबुद्धे, श्री. अनिकेत सहस्रबुद्धे, सौ. सायली करंदीकर आणि कु. निधी गोगटे) समान प्रेम केले.
२. ती २ घंट्यांसाठी आश्रमात सेवा आणि नामजप करण्यासाठी येत असे. तिचा नंतर अपघात झाल्यावर आश्रमातील अनेक साधक तिच्या प्रकृतीची चौकशी करत असत. यातून तिने अल्प कालावधीत साधकांशी साधलेली जवळीक आणि प्रेमभाव दिसून आला.
सौ. मधुरा हिने खडतर प्रारब्धावर मात करून ती जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तीची सप्तपदी चालत आहे ! – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांची मोठी बहीण)
सौ. मधुरा ही लहानपणापासूनच अनेक खडतर प्रसंगांना सामोरे जाऊन प्रारब्धावर मात करत आली आहे. आम्हा तिघी बहिणींमध्ये तिला त्रासांना सर्वाधिक प्रमाणात सामोरे जावे लागले. तिला असलेला संधीवाताचा त्रास, तिचा हाताचा अस्थिभंग होणे, अशा अनेक शारीरिक गोष्टींना ती आणि श्री. मनोज आनंदाने सामोरे गेले. श्री. मनोज यांनी सौ. मधुरा हिला व्यवहार आणि साधना या दोन्हींमध्ये चांगली साथ दिली. श्री. मनोज यांनी यापूर्वीच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून आता सौ. मधुरा हिनेही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून खर्या अर्थी ते दोघे जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तीची सप्तपदी चालत आहेत.
पू. सदाशिव परांजपे (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांचे वडील)
माझ्या सहस्रचंद्रदर्शन शांती विधीच्या दिवशी सौ. मधुरा हिच्याविषयी आनंदाची बातमी मिळणे, ही दुग्धशर्करायोगाची घटना आहे ! परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्ही सर्व कुटुंबीय त्यांच्या चरणांशी आहोत.
पू. (सौ.) शैलजा परांजपे (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांच्या आई)
लहानपणापासून तिला परात्पर गुरुदेवांनीच खर्या अर्थी सांभाळले आहे, तसेच तिला पूर्वी अनिष्ट शक्तींचा त्रास होत होता. त्यातूनही परात्पर गुरुदेवांनीच बाहेर काढले. परात्पर गुरुदेवांनी आम्हा सर्वांना त्यांच्या चरणांजवळ घेतले आहे, यासाठी त्यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे यांचे आध्यात्मिक कुटुंब
लहानपणापासूनच दैवी गुण अंगी असणार्या देवीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !
‘सर्वप्रथम मी पू. (सौ.) शैलजा सदाशिव परांजपे, पू. सदाशिव नारायण परांजपे (सौ. मधुरा सहस्रबुद्धे यांचे आई-वडील) आणि देवीस्वरूप बहीण श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ असलेल्या दैवी कुंटुबात जन्म दिल्याबद्धल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीताईचा दत्तजयंतीच्या आदल्या दिवशी (१७.१२.२०२१ या दिवशी) वाढदिवस साजरा झाला. त्या दिवशी मला आमचे बालपण आठवले.
१. मुलींचे लाड पुरवतांनाही शिस्त लावणारी आई पू. (सौ.) शैलजा परांजपे !
आमचे बालपण पुष्कळ मजेत गेले. पू. आई आणि पू. बाबांनी आमचे पुष्कळ लाड केले. आम्ही मुली असूनही त्यांनी आमची सर्व प्रकारची हौस पुरवली. आमच्यावर चांगले आध्यात्मिक संस्कार केले. पू. (सौ.) आई आम्हाला नेहमी सांगायची, ‘मुलांचे खाण्या-पिण्याचे लाड करायचे. शिस्तीच्या संदर्भात सवलत किंवा लाड नाहीत.’ आमच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी ती प्रसंगी आम्हाला शिक्षाही करायची.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ लहान असतांनाच त्यांच्यातील अनुभवलेले देवीतत्त्व !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीताईमध्ये बालपणापासूनच विविध गुण आणि साधकत्व आहे. ‘तिचा जन्म पायाकडून झाल्यामुळे ती ‘पायाळू’ आहे’, असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीच्या पाठीची शीर दुखत असेल आणि ताईने त्या व्यक्तीच्या पाठीवरून ३ वेळा पाय उतरवला, तर त्या व्यक्तीच्या पाठीची शीर लगेच मोकळी होत असे. तेव्हा ‘तिच्यामधील देवीतत्त्व जागृत होत असेल आणि त्याचा लाभ त्या व्यक्तीला होत असेल’, असे आता मला वाटते.
३. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
३ अ. उत्तम स्मरणशक्ती : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीताईचा शाळेत अभ्यासामध्ये नेहमी पहिला क्रमांक येत असे. तिची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे; पण तिला तिच्या हुशारीचा जराही अहं नाही.
३ आ. विविध कौशल्ये : ती शाळेत असतांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये पुष्कळ बक्षिसे मिळवायची, उदा. संगीत, चित्रकला, रांगोळी, हस्ताक्षर स्पर्धा इत्यादी.
३ इ. इतरांना समजून घेणे : आम्ही लहान असतांना आम्हाला नेहमी वाटायचे, ‘सगळे ताईचेच कौतुक करतात. आमचे कोणीच कौतुक करत नाही.’ त्यामुळे आम्ही नाखुश व्हायचो; पण ती आम्हाला समजून घ्यायची.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीताईचा जीव जन्मतःच सात्त्विक आहे आणि त्या सात्त्विक जिवाला परात्पर गुरुदेवांसारखे गुरु लाभले आहेत. त्यामुळे तिच्या जन्माचे सार्थक झाले. ‘हे गुरुदेवा, आमच्याकडूनही तुम्हाला अपेक्षित सेवा घडू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
‘हे गुरुदेवा, तुम्ही मला अशी देवीस्वरूप बहीण दिलीत. त्यासाठी मी तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. मधुरा मनोज सहस्रबुद्धे, ढवळी, फोंडा, गोवा. (२०.१२.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |