उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली चि. देवकी जयदीप जठार !

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली अकलूज, सोलापूर येथील चि. देवकी जयदीप जठार (वय ३ वर्षे) !

माघ शुक्ल पक्ष चतुर्दशी (१५.२.२०२२) या दिवशी अकलूज, सोलापूर येथील चि. देवकी जयदीप जठार (वय ३ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

‘वर्ष २०२० मध्ये ‘चि. देवकी जयदीप जठार उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून ती ५१ टक्के आध्यात्मिक पातळीची आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये तिची पातळी ५३ टक्के झाली आहे. आता तिच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे तिची साधनेत प्रगती होत आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

चि. देवकी जयदीप जठार

चि. देवकी जयदीप जठार हिला तिसर्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून अनेक शुभाशीर्वाद !

१. व्यवस्थितपणा

अ. ‘देवकी सकाळी उठल्यावर लगेच तिचे अंथरूण उचलायला सांगते. ती कधी कधी अंथरूण स्वतः जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करते. अंथरूण घालत असतांना कोपर्‍यात थोडेसे दुमडले असले किंवा कुठे घडी पडली असेल, तर ती लगेच व्यवस्थित करते.

आ. तिला नीटनेटके रहायला आणि केस व्यवस्थित विंचरायला आवडतात. ती स्वतःचे कपडे खराब न होण्याची काळजी घेते आणि बसतांना कपडे व्यवस्थित आवरून बसते.

इ. तिचे खेळून झाल्यावर ती खेळणी जागेवर ठेवते. कुठे पाणी सांडले असल्यास ती ते पुसायला सांगते. तिने एखादी वस्तू घेतल्यास ती व्यवस्थित दिसेल, अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करते. एखादी वस्तू घेतांना तिच्याजवळील अन्य वस्तू किंवा साहित्य पडणार नाही, अशा पद्धतीने ती वस्तू काढून घेते.

सौ. प्रियांका जठार

२. प्रेमभाव

अ. ती सर्वांशी जवळीक साधते. तिला एखादी व्यक्ती एकदा भेटली, तरी ती व्यक्ती तिची आठवण काढते. देवकीला ‘सर्व साधक तिचे आहेत’, असे वाटते.

आ. ती तिच्या आजोबांना जेवणानंतर लगेच त्यांच्या औषधाच्या गोळ्या आणून देते. नंतर ती त्यांना पाणीही आणून देते. तिच्या आजोबांना ठसका लागल्यास ती लगेच ‘हळू आजोबा’, असे म्हणते.

३. चांगली निरीक्षणक्षमता

देवकी सतत शिकण्याच्या स्थितीत असते. तिची निरीक्षणक्षमता चांगली आहे. ती सतत ‘कोण काय करत आहे ?’, हे पहात असते आणि तशी कृती करण्याचा प्रयत्न करते.

४. उत्तम स्मरणशक्ती

अ. देवकीला एकदा सांगितलेले तिच्या लक्षात असते. ती सव्वा वर्षाची असतांना एकदा मी तिला कडेवर घेऊन घासलेली भांडी लावत होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तिने प्रत्येक भांड्याची जागा दाखवून तेथे भांडी ठेवायला सांगितली.

आ. एकदा मी देवकीच्या आजीशी ‘केक’ बनवण्याविषयी बोलत होते. तेव्हा देवकी आमचे बोलणे ऐकत होती. तिने लगेच स्वयंपाकघरात जाऊन शीतकपाटातील ‘इसेन्स’ची बाटली आणून माझ्या हातात दिली. आम्ही ४ मासांपूर्वी ‘केक’ केला होता. तेव्हा या ‘इसेन्स’चा उपयोग केला होता.

५. समंजस

गुढीपाडव्याच्या दिवशी मला ‘कोरोना’ झाल्यामुळे मी घरी अलगीकरणात राहिले होते. घरातील सर्व जण देवकीसह शेजारी एका साधिकेच्या घरी रहायला गेले होते. त्या वेळी तिने ‘मला आईकडे जायचे आहे’, असा हट्ट केला नाही. ती १७ दिवस आजीजवळ न रडता आनंदाने राहिली. घरातील सर्व जण, नातेवाईक आणि साधक यांना ‘ती आईला सोडून राहिली’, याचे पुष्कळ कौतुक वाटले.

६. सात्त्विकतेची आवड आणि धर्माचरण करणे

अ. देवकीला हातात बांगड्या, गळ्यात माळ आणि पायात पैंजण घालायला आवडतात. तिला कुंकू लावायला पुष्कळ आवडते.

आ. सायंकाळी घरात देवापुढे दिवा लावल्यानंतर ती घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करते.

इ. आम्ही प्रतिदिन ९.३० वाजता घरातील सर्व जण बसून नामजप करतो. तेव्हा ती ९.३० वाजता आम्हाला ‘जपाला चला’ अशी आठवण करून देते. ती स्वतः अत्तर आणि कापूर यांचे उपाय करते अन् इतरांनाही करण्यास सांगते.

ई. देवकीची आजी (वडिलांची आई, सौ. उल्का जठार, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) भ्रमणभाषवर व्यष्टी साधनेचा आढावा सांगत असतांना मध्येच सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये यांचा आवाज ऐकू आला की, देवकी झोपेतच त्यांचे नाव घेते आणि पुन्हा झोपते. ती प्रतिदिन सद्गुरु स्वातीताईंची आठवण काढते.

७. गुरुदेवांप्रती श्रद्धा आणि भाव

७ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे : आम्ही एकदा सोलापूर सेवाकेंद्रात गेलो होतो. तेथे एक पटल होते. ती पटलाकडे हात दाखवून ‘प.पू. बाबा (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत’, असे सारखे सांगत होती; परंतु तेव्हा पटलावर काहीच नव्हते. तेथील एका साधिकेने सांगितले, ‘‘त्या पटलावर पुष्कळ दिवस (१० ते १२ वर्षे) परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र ठेवले होते.’’ हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले आणि ‘देवकीला परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व सूक्ष्मातून अनुभवता आले’, असे मला वाटले.

७ आ. तिला ‘तू कुणाची आहेस ?’, असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘मी कृष्णाची आहे. प.पू. बाबांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) आहे.’’

७ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले दिसल्यावर भ्रमणसंगणकाला मिठी मारणे : ९.५.२०२१ या दिवशी माझी आई आणि आजी भ्रमणसंगणकावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगाची ध्वनीचित्र -चकती (भावसोहळा) पहात होतो. तेव्हा परात्पर गुरुदेव दिसले की, देवकी लगेच भ्रमणसंगणकाला मिठी मारायची. तिला कार्यक्रम पाहून पुष्कळ आनंद होत होता.

७ ई. सतत अनुसंधानात असणे

१. परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र किंवा कृष्णाचे चित्र पाहिल्यावर ती लगेच नमस्कार करते आणि इतरांनाही त्यांना नमस्कार करण्यास सांगते. ती सतत कृष्ण आणि परात्पर गुरुदेव यांच्या समवेत बोलते. तिला सर्वांमध्ये कृष्ण दिसतो. तिला प.पू. भक्तराज महाराज तिच्याकडे पाहून हसत असल्याचे जाणवते.

२. ती रात्री झोपण्यापूर्वी कृष्णाच्या चित्रापुढे उभे राहून कृष्णाला सांगते, ‘मला उचलून घे.’ तेव्हा ‘ती कृष्णाच्या ओंजळीत आहे आणि कृष्ण तिला झोपवत आहे’, असे तिला जाणवते. तिला भरवत असतांना ती पहिला घास कृष्णाला द्यायला सांगते.

३. तिच्या आजीचा (सौ. उल्का जठार यांचा) सत्संग चालू असतांना ती तिथेच खेळत असते आणि सत्संग झाल्यावर ती ‘सत्संग झाला का ? सत्संग छान झाला का ?’, असे विचारते.

८. चुकांविषयी संवेदनशील

तिच्याकडून चूक झाल्यास ती कान पकडून ३ वेळा क्षमायाचना करते.

९. स्वभावदोष

कौतुकाची अपेक्षा असणे आणि हट्टीपणा’

– सौ. प्रियांका जठार (देवकीची आई), सोलापूर (२२.७.२०२१)

पू. (कु.) दीपाली मतकर यांना जाणवलेली चि. देवकी जयदीप जठार (वय ३ वर्षे) हिची गुणवैशिष्ट्ये !

पू. (कु.) दीपाली मतकर

१. उत्साही : ‘देवकी सतत काही ना काही कृती करत असते, तरी ती कधीच थकलेली दिसत नाही.

२. प्रेमभाव : एकदा एक साधक तिला गमतीने म्हणाले, ‘‘मला बाऊ (आजारी) झाला आहे.’’ तेव्हा ती रडवेली झाली. त्या साधकाने ‘‘मला काही झाले नाही. मी बरा आहे’’, असे सांगितल्यावरच ती शांत झाली.

३. सेवाकेंद्रात रहाण्याची ओढ

अ. ती सोलापूर सेवाकेंद्रात आल्यावर लगेच सगळ्या साधकांमध्ये मिसळते. ती सेवाकेंद्रातील प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवते.
आ. ती प्रसाद आणि महाप्रसाद ग्रहण करतांना जे असेल, ते आवडीने खाते. एखाद्या वेळी पदार्थ तिखट असला, तरी ती तो पदार्थ आवडीने खाते.
इ. एकदा सेवाकेंद्रातून घरी निघतांना तिला वाईट वाटून रडू आले. तिला ‘सेवाकेंद्रातून घरी जाऊ नये’, असे वाटत होते.

४. सतत अनुसंधानात असून अंतर्मुख असणे : एकदा देवकी रात्री झोपलेली असतांना खोलीतील साहित्य घेतांना माझ्याकडून आवाज झाला. तेव्हा ‘तिला जाग येऊन ती रडेल’, असे मला वाटले; पण ती उठून बसली आणि हसून पुन्हा झोपली. ती सतत अनुसंधानात असून अंतर्मुख असल्याचे जाणवते.’

– (पू.) कु. दीपाली मतकर, सोलापूर (२२.७.२०२१)

अकलूज, सोलापूर येथील चि. देवकी जयदीप जठार हिच्याविषयी अन्य सूत्रे !

१. गरोदरपण

अ. ‘गरोदरपणात मला केवळ ८ दिवसच ‘मळमळ आणि उलटी’ यांचा त्रास झाला. त्यानंतर कोणताही त्रास झाला नाही.

आ. या कालावधीत मला सतत नामजप करण्याची इच्छा होत होती. ४ था मास चालू असतांना मी एकदा नामजपाला बसले होते. तेव्हापासून नेहमी मला नामजपाला बसण्याच्या आधीच गर्भाची हालचाल जाणवू लागायची. त्या वेळी ‘बाळ मला नामजपाची आठवण करून देत आहे’, असे मला वाटायचे. अन्य वेळेच्या तुलनेत नामजपाच्या वेळी बाळाची हालचाल अधिक प्रमाणात होत असे.

इ. आईंनी (सासूबाई, सौ. उल्का जठार यांनी) उपायांसाठी मला ‘नामपट्ट्यांचा कंबरपट्टा’ बनवून तो घालण्यास सांगितले. कंबरपट्टा घातल्यामुळे बाळाभोवती सतत संरक्षणकवच असल्याचे मला जाणवत होते. कंबरपट्ट्यामुळे माझे कंबर दुखण्याचे प्रमाणही न्यून झाले.

ई. मला सातवा मास चालू असतांना सद्गुरु (कु.) स्वाती खाडये जिल्ह्यात आल्या होत्या. त्यांनी घरी येऊन मला ‘नऊवारी’ साडी दिली. त्या वेळी मला पुष्कळ कृतज्ञता वाटून ती साडी नेसण्याची इच्छा सतत होत होती.

२. प्रसुती

अ. १८.२.२०१९ या दिवशी मला ‘सद्गुरु स्वातीताईंनी दिलेली साडी नेसण्याची इच्छा झाली. त्याच दिवशी मला प्रसुतीकळा चालू झाल्या.

आ. प्रसुतीकक्षात गेल्यानंतर मला तेथे पुष्कळ पांढरा प्रकाश दिसत होता. ‘माझ्या शेजारी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर आहेत अन् तेच मला सर्व सहन करण्याची शक्ती देत आहेत’, असे मला वाटले. काही त्रास न होता केवळ २० ते २५ मिनिटांमध्ये माझी नैसर्गिक प्रसुती झाली.

३. बाळाच्या जन्मानंतर

३ अ. जन्म ते १ मास

१. प्रसुती झाल्यानंतर मला आधुनिक वैद्यांनी बाळ दाखवले. बाळ शांत आणि तेजस्वी दिसत होते. बाळाच्या अंगावर आणि अंगाभोवती गुलाबी रंगाची छटा दिसत होती. त्याच्या अंगावर सुरकुत्या नव्हत्या आणि त्वचा मऊ होती.
२. सद्गुरु स्वातीताईंना भ्रमणभाष करून मला मुलगी झाल्याचे कळवले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘आपल्याकडे ‘रणरागिणी’च आली आहे.’’ त्यांनी ‘रणरागिणी’ म्हटल्याप्रमाणे बाळाचा आवाज पुष्कळ मोठा आहे.
३. जन्माच्या पहिल्या दिवसापासून बाळ शेजारी ठेवलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राकडे सतत बघत असे.
४. बाळ झोपेत वेगवेगळ्या मुद्रा करायचे आणि हसायचे. बाळाकडे बघून ‘त्याचे झोपेतही अनुसंधान चालू आहे’, असे मला वाटायचे.
५. मला आणि बाळाला पहायला येणार्‍यांनी ‘बाळ सात्त्विक आहे. बाळाचा तोंडवळा तेजस्वी आहे’, असे सांगितले.

३ आ. वय – १ ते ३ मास

३ आ १. देवाची ओढ : बाळ सकाळी ५ – ६ च्या सुमारास उठून १ घंटा श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघत बसायचे.
३ आ २. प्रसन्न आणि चपळ : झोपेतून उठल्यानंतरही बाळाचा तोंडवळा नेहमी प्रसन्न असायचा. ते उठल्यावर लगेच खेळायला लागायचे. त्याचे दोन्ही हात धरल्यानंतर ते मान आणि पाठ उचलण्याचा प्रयत्न करायचे.
३ आ ३. बाळाचा ‘नामकरण विधी’ : २.३.२०१९ या दिवशी बाळाचा ‘नामकरण विधी’ केला आणि सद्गुरु स्वातीताईंनी सुचवल्याप्रमाणे बाळाचे नाव ‘देवकी’ असे ठेवले. सर्व विधी पूर्ण होईपर्यंत देवकी शांत होती. तिने कोणताही त्रास दिला नाही किंवा रडलीही नाही.
३ आ ४. अनुभूती : तापामुळे देवकीची हालचाल बंद होणे आणि सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेल्या नामजपादी उपायांमुळे ती त्वरित बरी होणे : दुसर्‍या मासात तिला ‘ट्रिपल पोलीओ’चे इंजेक्शन दिले होते. त्या रात्री तिला ताप आला. त्या वेळी तिला आधुनिक वैद्यांनी दिलेले औषध दिले; परंतु तिचा ताप उतरला नाही. तिचा ताप वाढल्याने तिचे डोळे पांढरे झाले आणि सर्व हालचालही बंद झाली. आम्ही तिला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जात असतांना सासूबाईंनी सद्गुरु राजेंद्रदादांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी ‘एकम्’ चा जप करण्यास सांगितले. रुग्णालयात जातांना आम्ही तो जप करू लागलो. नंतर काही मिनिटांतच तिचा ताप पूर्णपणे उतरला आणि ती हालचालही करू लागली.

३ इ. वय – ४ ते ६ मास

३ इ १. परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरु स्वातीताई यांच्या प्रती असलेली ओढ

अ. देवकी कधी रात्री रडत असतांना तिच्यासमोर परात्पर गुरुदेवांचा विशेषांक धरल्यावर तिचे रडणे थांबते आणि ती खेळायला लागते.
आ. एकदा देवकीला ‘आज सद्गुरु स्वातीताई आपल्या घरी येणार आहेत’, असे सांगितले. त्या दिवशी ती पूर्ण दिवस हसत होती आणि तिच्या तोंडवळ्यावर आनंद जाणवत होता. त्या वेळी ती केवळ ५ मासांची होती. सदगुरु स्वातीताई घरी आल्यावर ती सतत त्यांच्याकडे पहात होती. इतर वेळी घरी कुणी पाहुणे आल्यानंतर ती पाहुण्यांकडे जात नाही; परंतु सदगुरु स्वातीताईंनी तिला घेतल्यानंतर ती लगेच त्यांच्याकडे गेली.
इ. सद्गुरु स्वातीताईंनी तिला घेतल्यावर ती त्यांच्याजवळ असलेल्या परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे झेप घेऊन गुरुदेवांशी बोलण्याचा प्रयत्न करत होती.
ई. एरव्ही रात्री झोपतांना ती थोडी रडते; परंतु सद्गुरु स्वातीताईंच्या जवळ ती काही मिनिटांतच न रडता झोपी गेली.

३ ई. वय – ७ ते १० मास

३ ई १. देवीशी अनुसंधानात असल्याप्रमाणे देवीकडे एकटक पहाणे : २०.८.२०१९ या दिवशी आम्ही देवकीला घेऊन प्रथमच ग्रामदेवी श्री अकलाईदेवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. ‘दर्शनासाठी रांगेत उभे असल्यापासून ते देवीचे दर्शन घेईपर्यंत ती एकटक देवीकडे पहात होती. तेव्हा जणू तिचे देवीशी अनुसंधान चालू आहे’, असे मला वाटत होते.
३ ई २. सद्गुरु स्वातीताईंकडे जाण्यासाठी झेप घेणे : २२.८.२०१९ या दिवशी अकलूज येथे सद्गुरु स्वातीताईंचा सत्संग होता. आम्ही सद्गुरु स्वातीताईंच्या गाडीतून सत्संगाच्या ठिकाणी जात होतो. त्या वेळी देवकी सतत सद्गुरु स्वातीताईंकडे जाण्यासाठी झेप घेत होती. त्यांनी तिला घेतल्यानंतर ती गाडीतील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करू लागली. त्या वेळी ती पुष्कळ आनंदी दिसत होती.
३ ई ३. देवकीने सद्गुरु स्वातीताईंच्या चरणांना हात लावून त्यांच्या चरणांशी खेळणे आणि जणू ‘ती कृतज्ञता व्यक्त करत आहे’, असे वाटणे : २३.८.२०१९ या दिवशी कृष्णाष्टमी होती. सद्गुरु स्वातीताईंनी ‘आपण देवकीला श्रीकृष्ण बनवूया’, असे सांगितले; परंतु तिला कृष्णासारखे सजवण्यासाठी आमच्याकडे श्रीकृष्णाची वस्त्रे आणि दागिने नव्हते. देवाच्या कृपेने ते सर्व आम्हाला १ – २ घंट्यांत मिळाले. सद्गुरु स्वातीताई तिला घालण्यासाठी दागिने बाजूला काढत होत्या. तेव्हा देवकी त्यांच्या चरणांशी त्यांच्या चरणांना हात लावून खेळत होती. तेव्हा ‘ती कृतज्ञता व्यक्त करत आहे’, असे मला वाटले.
३ ई ४. कृष्णाष्टमीच्या दिवशी सद्गुरु स्वातीताईंच्या हातून देवकीचा ‘अन्नप्राशन विधी’ होणे आणि बालकृष्णाप्रमाणे तिच्या बाललीला जाणवणे : देवकीचा ‘अन्नप्राशन’ विधी करायचा राहिला होता. कुठलेही पूर्वनियोजन नव्हते; पण ‘कृष्णाष्टमी आहे आणि सद्गुरु स्वातीताईही घरी आहेत’; म्हणून आम्ही तिचा ‘अन्नप्राशन’ विधी करायचा’, असे ठरवले. सद्गुरु स्वातीताईंच्या सांगण्यानुसार देवकीला श्रीकृष्णाप्रमाणे वेशभूषा केली. प्रथम सद्गुरु स्वातीताईंनी तिला औक्षण करून तांदळाची खीर खाऊ घातली. त्या वेळेस ती कृष्णाप्रमाणे दिसत होती. खीर खातांना तिच्या तोंडाला लागलेली खीर आणि तिच्या बालकृष्णाप्रमाणे होणार्‍या हालचाली पाहून ‘बाळकृष्ण जसा लोणी खातो, त्याप्रमाणे ती खीर खात आहे’, असे मला वाटले. त्या वेळी वातावरणात पुष्कळ आनंद जाणवत होता.
३ ई ५. संगणकावर परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र पाहिल्यावर टाळ्या वाजवणारी देवकी ! : डिसेंबर २०१९ मध्ये संगणकीय प्रणालीद्वारे परात्पर गुरुदेवांविषयी एक सत्संग होता. देवकीने परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र संगणकावर पाहिले. नंतर तिने लगेच पूजेसाठी ठेवलेल्या परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राकडे पाहिले. ती संगणकाकडे पहात त्यांचे निरीक्षण करत होती. तिला मध्ये मध्ये त्यांचे दर्शन झाले की, ती टाळ्या वाजवत होती.

४. अन्य सूत्रे

अ. देवकीचा तोंडवळा निरागस आहे. तिच्याविषयी सर्वांना प्रेम आणि ओढ वाटते. तिचा तोंडवळा सतत आनंदी असतो.
आ. देवकीचे जेवण पुष्कळ अल्प आहे; परंतु ती अखंड खेळत असते. तेव्हा तिला ‘देवच शक्ती देत आहे’, असे आम्हाला वाटते.
इ. देवकीला देवतांच्या नामपट्ट्यांसमवेत खेळायला पुष्कळ आवडते. रात्री झोपेतून जागी झाल्यानंतरही ती अंथरूणाखाली ठेवलेल्या नामपट्टीसह पुष्कळ मन लावून खेळते.’

– सौ. प्रियांका जयदीप जठार (आई), अकलूज, सोलापूर. (२४.६.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक