-
पिंपळवाडी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार !
-
शेतकर्याने ९ लाख रुपये व्यय करून घर बांधले !
पैठण (जिल्हा संभाजीनगर) – बँक ऑफ बडोदा या अधिकोषाच्या खात्यातील केवळ एका क्रमांकाच्या चुकीमुळे ग्रामपंचायतीचे १५ लाख रुपये पैठण तालुक्यातील पिंपळवाडी ग्रामपंचायतीअंतर्गत येणार्या दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर औटे यांच्या खात्यात जमा झाले. त्यांना वाटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष २०१४ च्या निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासन पाळत हे पैसे त्याच्या जनधन खात्यात जमा केले आहेत. यानंतर शेतकर्याने थेट पंतप्रधानांना इमेल करत त्यांचे आभारही मानले. यातील ९ लाख रुपये काढून त्यांनी स्वतःचे घरही बांधले. ही चूक ग्रामपंचायतीच्या लक्षात आल्यानंतर आता पिंपळवाडी ग्रामपंचायतीने पैसे परत करण्यासाठी औटे यांच्याकडे तगादा लावला आहे. हा विषय सध्या पैठणमध्ये चर्चेचा ठरला आहे.
१. याविषयी ज्ञानेश्वर औटे म्हणाले की, हे पैसे आपल्याला मिळाल्याचे वाटल्यानेच मी ते व्यय केले आहेत. आता उरलेले ६ लाख आणि व्यय केलेली रक्कम अधिकोषाला हप्त्या-हप्त्याने परत करू. ज्ञानेश्वर औटे यांनी बँक ऑफ बडोदाच्या खात्यावर १७ ऑगस्ट २०२१ या दिवशी १५ लाख ३४ सहस्र ६२४ रुपये जमा झाले होते. खात्यात इतके पैसे कसे आले यावर गावात चर्चा चालू झाल्यानंतर अनेकांनी ज्ञानेश्वर यांचे अभिनंदन करत, ‘हे पैसे दिलेल्या आश्वासनानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पाठवले आहेत’, असे त्यांना सांगितले.
२. १५ व्या वित्त आयोगाचे ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेकडून मिळणारे हे पैसे शेतकर्याच्या खात्यावर जमा झाल्याची चूक ४ मासानंतर ग्रामपंचायतीच्या लक्षात आली. आता ज्ञानेश्वर यांना ग्रामपंचायतीने पैसे परत करण्याचे पत्र पाठवले असून यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
‘शेतकर्याच्या खात्यावर एवढी मोठी रक्कम आली, ही गोष्ट शेतकर्याने बँक किंवा पोलीस यांना सांगणे आवश्यक होते. ही रक्कम शेतकर्याच्या खात्यावर चुकून जमा करण्यात आली असून ही रक्कम परत करावी, अन्यथा आम्ही गुन्हा नोंद करू.’ – बाळकृष्ण गव्हाणे, ग्रामसेवक |
गटविकास अधिकारी झोपेत काम करतात का ?
‘१५ लाख रुपये एवढी मोठी रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जात नाही, दुसरीकडे जाते, तरी २-३ मास प्रशासनाला ही गंभीर गोष्ट कळत नाही. आता या शेतकर्याला धमक्या दिल्या जात आहेत. हे सर्व होत असतांना गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक झोपले होते का ?’ – किशोर तांगडे, सामाजिक कार्यकर्ते