जालना येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षारक्षक नसल्याने अज्ञात महिलेने बाळ चोरून नेले !

  • आरोग्यमंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यातच जिल्हा रुग्णालयाची अशी स्थिती असेल, तर इतरत्र कसे असेल ? – संपादक  
  • रुग्णालयात पुरेसे सुरक्षारक्षक नसतील, तर येऊ शकणार्‍या अडचणींचा जराही विचार प्रशासनाने कसा केला नाही ? याला उत्तरदायी असणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करायला हवी ! – संपादक 
जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना 

जालना – येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षारक्षक नसल्याने एका अज्ञात महिलेने बाळ चोरून नेण्याची घटना ७ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजता घडली आहे. रुग्णालयातून बाळ चोरून नेतांना महिला सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे.

जिल्हा स्त्री रुग्णालयात सुरक्षारक्षकांची कमतरता असल्याने आतापर्यंत येथून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या; आता मात्र नवजात बाळाची चोरी झाल्याची घटना घडली असून त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेतील अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. रुग्णालयात प्रवेश करण्यास अनेक चोरवाटा असून मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकही नसतो, असे पुढे आले आहे.

प्रतिदिन २ सहस्रांहून अधिक लोकांची वर्दळ असलेल्या या रुग्णालयात २४ घंटे सुरक्षेसाठी केवळ १० सुरक्षारक्षक आहेत. यातील एकाचा गतवर्षी मृत्यू झाल्यामुळे ही जागा रिक्त आहे, तर एकजण नियमित सुटीवर असतो. उर्वरित ८ जणांपैकी ४, २ आणि २ अशा पद्धतीने तिन्ही पाळ्यांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामावर नियुक्ती केली आहे; मात्र नातेवाइकांचा वावर अधिक असल्यामुळे सुरक्षारक्षकांना प्रवेशद्वारावर थांबावे लागते. यामुळे बाह्य परिसर सुरक्षेविनाच रहातो. याचाच अपलाभ घेऊन या ठिकाणी चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

रुग्णालयात जाऊन सीसीटीव्ही चित्रणाची पहाणी करून महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक काम करत आहे. महिलेच्या तक्रारीनुसार ठाण्यात गुन्हा नोंद करून घेतला आहे. लवकरच ‘त्या’ महिलेला शोधून काढू, असे साहाय्यक पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी म्हटले आहे.