काश्मीरच्या प्रकरणी पाकच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे ‘के.एफ्.सी.’ आस्थापनेकडून क्षमायाचना

‘पिझ्झा हट’ आस्थापनेकडून अद्याप क्षमायाचना नाही !

पाकमध्ये असतांना पाकला समर्थन द्यायचे आणि भारतात क्षमा मागून मोकळे व्हायचे, यातून पाकमध्येही व्यवसाय करता येईल आणि भारतातही व्यवसाय चालू ठेवता येईल, अशाच मानसिकतेतून ही विदेशी आस्थापने काश्मीरविषयी बोलत आहेत. हे पहाता भारत सरकारने अशा आस्थापनांना देशातून हाकलून लावले पाहिजे ! – संपादक

नवी देहली – ‘ह्युंदई’ आणि ‘किआ’ या चारचाकी वाहनांच्या आस्थापनांनी काश्मीरमधील फुटीरतावादी आंदोलनाचे समर्थन केल्यानंतर ‘के.एफ्.सी.’ या खाद्यपदार्थ विकणार्‍या आस्थापनेच्या पाकिस्तान शाखेनेही ट्वीट करून अशा प्रकारचे समर्थन केल्याचे समोर आले आहे. याला सामाजिक माध्यमांतून विरोध करण्यात आला, तसेच ‘#BoycottKFC’ हा ‘ट्रेंड’ही करण्यात आला. त्यानंतर ‘के.एफ्.सी.’कडून क्षमा मागण्यात आली. ‘पिझ्झा हट’ या आस्थापनानेही अशा प्रकारचे ट्वीट केले आहे; मात्र त्याने क्षमा मागितलेली नाही. पाकिस्तानमध्ये साजरा करण्यात आलेल्या ‘काश्मीर एकता दिना’निमित्त के.एफ्.सी.ने ‘काश्मीर एकता दिनानिमित्त आम्ही त्यांच्या स्वातंत्र्यांच्या अधिकारांसमवेत उभे आहोत’, अशी पोस्ट केली होती.

के.एफ्.सी.ने क्षमायाचना करतांना म्हटले की, देशाबाहेर काही सामाजिक माध्यमांतून करण्यात आलेल्या पोस्टच्या प्रकरणी आम्ही क्षमा मागत आहोत. आम्ही भारताचा सन्मान करतो आणि भारतियांची सेवा करण्यास पूर्णपणे कटीबद्ध आहोत.