विशेष संपादकीय : स्वर्गीय सूर विसावला !

विशेष संपादकीय

  • मराठी संतांचे भावविश्‍व स्वरांच्या माध्यमातून जगात पोचवण्याचे कार्य लतादीदी यांनी केले !

  • अनेक दशके लोटली, तरीही लतादीदींच्या स्वरांची महानता यत्किंचितही न्यून झाली नाही !

भारतात जी काही अलौकिक व्यक्तीमत्त्व साक्षात् ईश्वराने पाठवली आहेत, त्यांपैकीच एक म्हणजे दैवी स्वर घेऊन आलेल्या भारतरत्न लताबाई दीनानाथ मंगेशकर ! गेली आठ दशके सर्व स्तरांतील आणि वयांतील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा हा स्वर संगीताची निर्मिती करणार्‍या महासरस्वतीदेवीच्या जयंतीनंतर शांत झाला ! जशी १३ व्या शतकात महाराष्ट्रातील कुलकर्णी घराण्यातील चारही भावंडे अध्यात्माच्या क्षेत्रातील सर्वाेच्च अधिकारी झाली आणि त्यातही सर्व भावंडांची काळजी वहाणारी ज्ञानेश्वर माऊली ही सर्वश्रेष्ठ जाहली; तद्वतच २० व्या शतकात गोव्याच्या मंगेशकर घराण्यातील पाच भावंडांची काळजी घेऊन गानसाधना करणार्‍या लताबाई या स्वरक्षेत्रात सर्वश्रेष्ठ झाल्या ! ‘ज्यांनी गाऊन अंतिम केलेल्या गाण्यात सुधारणेला वाव नाही’ अशी परिपूर्णतेची अनुभूती देणारा एकमेवाद्वितीय असा ध्रुवीय स्वर देवाने मराठी मातीत जन्माला घातला आणि अजरामर केला ! त्यांच्या दैवी स्वराने विश्वाशी संवाद साधला ! देव आणि देश भक्ती सगुण रूपात त्यांच्यात असल्यानेच निर्गुणाच्या अनुभूतीकडे नेऊ शकणारा असा स्वर्गीय स्वर आता खरोखरचा ‘स्वर्गीय’ झाला !

दैवी स्वरयुगाचा अंत !

भारतातील ८ पिढ्या या गानसम्राज्ञीचा स्वरसाज अभिमानाने मिरवून मोठ्या झाल्या, ही अतिशयोक्ती नाही; कारण ‘रिमिक्स’ (भारतीय आणि पाश्‍चात्त्य संगीताचे मिश्रण असलेले संगीत) ऐकणारी अगदी अलीकडची तरुण पिढीही याला अपवाद नाही. वर्ष १९६० पासून अगदी १९९० च्या दशकापर्यंत आकाशवाणीने घरोघरी जे सूरसंगीत निर्माण केले, त्यात लताबाईंचा मधाळ आणि तितकाच दमदार अन् म्हणूनच परिपूर्णतेची जाणीव निर्माण करणारा स्वरसंस्कार भारतीय आणि विशेषतः मराठी मनावर झाला. नंतर दूरदर्शन, टेपरेकॉर्डर, ध्वनीचित्र-चकत्या यांसारखी माध्यमे आली; संगीतकार, गायक पालटले; पाश्‍चात्त्य वाद्य आणि संगीत यांचा प्रभाव वाढला; दशके लोटली तरीही ‘लता मंगेशकर’ नावाच्या स्वराची महानता यत्किंचितही न्यून झाली नाही, यातच त्याचे सार्वभौम श्रेष्ठत्व अधोरेखित झाले !

विराण्यांची आर्तता अंतःकरणात पोचवणारा स्वर !

संत ज्ञानेश्‍वराच्या विराण्या, म्हणजे परमेश्‍वराच्या विरहाने अत्यंत व्याकुळ होऊन माऊलींनी लिहिलेल्या ओव्या, लताबाईंनी तितक्याच सामर्थ्याने गाऊन एक आध्यात्मिक स्तरावरील अजरामर स्वरानुभव मराठी जनांना दिला. ‘घनु वाजे घुणघुणा ।’ ही असूदे किंवा ‘रंगा येईवो ये ।’ असूदे, त्यांच्या स्वरातील तीव्र आर्ततेमुळेच परमेश्‍वरविरहाची ही हाक अंतःकरणात अतिशय खोलवर जाते आणि ऐकणार्‍याला त्या निर्गुण परमेश्‍वराचा शोध घेण्यास उद्युक्त करते. ‘आजी सोनियाचा दिनु’ किंवा ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’ असूदे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिलेल्या ज्ञानेश्‍वर माऊलींच्या साधनावस्थेतील या विविध अनुभवांच्या भावावस्था उलगडण्याची क्षमता केवळ आणि केवळ लताबाईंच्या धीरगंभीर, आर्त आणि अंतर्मुख करणार्‍या आवाजात आहे. परमेश्‍वराच्या विरहापासून परमेश्‍वरमीलनाच्या अद्वैतावस्थेपर्यंत, म्हणजे ‘मोगरा फुले’पर्यंत सर्व आध्यात्मिक स्थितींचे वर्णन करणार्‍या लताबाईंच्या स्वराचा परमोच्च बिंदू गाठला गेला तो माऊलींच्या पसायदानाने ! जगात मराठी संतांचे अनमोल भावविश्‍व स्वरांच्या माध्यमातून पोचवण्याचे त्या सर्वोत्तम माध्यम झाल्या. लताबाईंच्या स्वरसाजाने या संतानुभूती अजरामर झाल्या. लताबाईंचा स्वर ऐकतांना नेत्र मिटले, तर अनेकदा आकाश, समुद्र, पर्वत अशा निसर्गातील महान गोष्टी चक्षूंसमोर येतात. ‘ने मजसी ने…’ ऐकतांना स्वातंत्र्यविरांच्या मनातील आर्त तळमळ पूर्ण क्षमतेने जितकी भावते, तितक्याच क्षमतेने सागर आणि त्याच्या लाटांचे चित्रही डोळ्यांसमोर उभे रहाते. या सर्वांच्या पुढे निगुर्णाच्या अनुभूतीकडे नेण्याची क्षमता लताबाईंच्या आवाजात आहे. ‘विश्‍वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’ ऐकतांना श्रोता अंतर्मुख होतो आणि एखाद्या अवकाशाच्या पोकळीत गेल्याची अनुभूती त्याला येते. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ काय किंवा ‘ए मेरे वतन के लोगो’ काय लताबाईंएवढ्या क्षमतेने खचितच कुणी गाऊ शकेल; कारण छत्रपती शिवराय आणि सैनिक यांविषयीचा तेवढाच आदर अन् क्षात्रवृत्ती त्यांच्या मनात होती म्हणूनच त्याची अभिव्यक्ती प्रत्येकाचे मन हेलावून टाकणारी झाली !

भाव आणि भक्ती स्वरांनी जीवनानुभव समृद्ध केला !

लताबाईंच्या स्वरांतील भक्ती आणि भाव गीतांनी मराठी जनांच्या ४ पिढ्यांचे भावविश्‍व समृद्ध केले आणि यापुढेही करत रहातील. गेली अनेक वर्षे मराठी माणसाचा गणेशोत्सव लताबाईंच्या आवाजातील ‘गजानना तू गणराया’ हे भक्तीमय स्वर कानावर पडल्याविना पूर्ण होत नाही. २२ भाषांत गाणार्‍या लताबाईंना एका अर्थाने या ‘वसुंधरेचा स्वर’ होण्याचा सन्मान मिळाला. नासाने पृथ्वीची ओळख म्हणून जे ध्वनी किंवा गोष्टी अन्य जीवसृष्टीच्या शोधार्थ असलेल्या यंत्रणेसमवेत पाठवल्या त्यात लताबाईंचा आवाज आहे ! जसा अभिनेता, लेखक, चित्रकार जीवनानुभवांनी जितका समृद्ध तितका तो अधिक संवेदनशील असतो, त्याचप्रमाणे लताबाईंचा स्वर सर्व प्रकारच्या नात्यांतील भाव आणि भावना विश्‍व समृद्ध करणारा आहे आणि इतकेच नव्हे, तर त्याला भारतीय संस्कृतीतील त्याग, निर्मळता, क्षात्रवृत्ती आदी वैशिष्ट्ये व्यक्त करणारे कंगोरे आहेत. यासाठी अर्थात्च त्यांनी घेतलेले गानपरिश्रमही तितकेच कारणीभूत ठरले. आता गाण्यातील कडवी आणि अन्य संगीत एकमेकांना जोडून अन् मिसळून काही मिनिटांचे गाणे पूर्ण केले जाते. लताबाईंच्या आरंभीच्या काळात वाद्यवृंदासहित सराव करून संपूर्ण गाणे ध्वनीमुद्रित करण्याची पद्धत होती. संगीतकाराला पसंत पडेपर्यंत अनेक गाणी पहाटेपर्यंत पुन:पुन्हा अनेक घंटे म्हटली. ‘जीवनात ही घडी’ किंवा ‘लेक लाडकी या घरची’ अशी हलकीफुलकी लडीवाळ गाणी, ‘श्रावणात घन निळा’ किंवा ‘मेंदीच्या पानावर’ यांसारखी नाजूक संवेदना व्यक्त करणारी गाणी ते ‘मी रात टाकली’ किंवा ‘सख्या रे घायाळ मी हरणी’ यांसारख्या कामभावना व्यक्त करणारी गाणी प्रत्येकात त्यांचा स्वर चपखल बसून गेला. ‘नववधु पिया मी बावरते’ यांसारख्या प्रेमगीतापासून ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’ यासारख्या प्रणयगीतापर्यंत लताबाईंच्या स्वरांनी श्रोत्यांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे. शांता शेळके, ना.धो. महानोर, सुरेश भट यांसारखे गीतकार आणि पं. हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, श्रीनिवास खळे आदी संगीतकार यांच्या प्रतिभेला न्याय देऊन मराठी गानविश्‍वाला एका उंचीवर नेऊन ठेवले यामागे अर्थात्च त्यांच्या मनाची निर्मळता, सोज्वळता आणि चारित्र्यसंपन्नता होती. बालगीतापासून कोठीवरच्या गाण्यांपर्यंत शेकडो स्वररचनांतून त्यांनी सर्व प्रकारच्या नात्यांतील ओलावा जिवंत केला.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या ‘हृदयी’चा आवाज !

त्या संगीतकारांना गुरुसमान मानत; मग ते मराठी असोत कि हिंदी चित्रपटसृष्टीतील सचिनदेव बर्मन, नौशाद, लक्ष्मीकांत-प्यारेलाल असोत. त्या काळी प्रसिद्ध असलेल्या नूरजहां, शमशाद बेगम, सुरैया, अमीरबाई या सार्‍यांना मागे टाकून लताबाई पुढे गेल्या. ‘आयेगा आनेवाला’पासून जी यशस्वी घोडदौड चालू झाली ती अगदी ‘बिंदिया चमकेगी’पर्यंत चालू राहिली. मधुबाला, वहिदा रहेमान, वैजयंतीमाला, आशा पारेख यांच्यापासून मधल्या काळातील रेखा, श्रीदेवी आणि अगदी अलीकडे माधुरी दीक्षित अन् काजोलपर्यंत सर्वच अभिनेत्रींना त्यांचा स्वर अगदी साजेसा झाला, हे मोठे वैशिष्ट्य होते. ‘रैना बीती जाए’, ‘इस मोडसे जाते है’, ‘देखा एक ख्वाब’ यांसारख्या शेकडो गाण्यांनी अनेक पिढ्यांच्या भावनाविश्‍वावर त्यांनी अधिराज्य केले. ‘आता विसाव्याचे क्षण’ हे त्यांच्या संगीतउपासनेला साजेसे गाणे सर्वांत अखेरीस त्यांनी म्हटले. एक संगीतसंस्था आता अनंतात विलीन झाली, संगीताचे सुवर्णयुग समाप्त झाले. त्यामुळे आता स्वरपुरुष म्हणेल, ‘तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही, शिकवा नही, तेरे बिना जिंदगी भी लेकिन, जिंदगी नही ।’ त्यांनी दिलेल्या स्वरानुुभवासाठी हे विश्‍व त्यांचे कृतज्ञ राहील !