१. भजनांशी एकरूप होऊन ‘जणू प्रत्यक्ष प.पू. भक्तराज महाराजच भजने म्हणत आहेत’, असे जाणवणे
‘७.७.२०२१ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) जन्मोत्सवाच्या निमित्ताने इंदूर येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात भजनांचा कार्यक्रम आयोजित केला होता. तो थेट प्रक्षेपणाद्वारे सर्व साधकांना पहायला मिळाला. तेव्हा प.पू. बाबांच्या भक्तांनी म्हटलेली भजने ऐकत असतांना मी त्या भजनांशी एकरूपच झाले आणि ‘ती भजने जणू प्रत्यक्ष प.पू. बाबाच म्हणत आहेत’, असे मला जाणवले.
२. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतांना ते तेथे प्रत्यक्ष उपस्थित असल्याचे जाणवणे, तसेच ते विठ्ठलाला आर्ततेने हाक मारत असल्याचे जाणवणे
मी डोळे मिटले. तेव्हा ‘मी त्या समारंभात प्रत्यक्ष उपस्थित आहे’, असे जाणवू लागले. हळूहळू मला पुढील दृश्य दिसले. त्या ठिकाणी मी आणि प.पू. बाबा असे दोघेच होतो. प.पू. बाबांनी बंडी घातली होती आणि ते डफली वाजवत असतांना मला त्यांचे दंड आणि हातांची बोटेही स्पष्ट दिसली. ते डोळे मिटून भजने म्हणत असतांना ‘जणू काही ते विठ्ठलाला आर्ततेने हाक मारत आहेत आणि विठ्ठलही त्यांच्याकडे पाहून हसत आहे’, असे दिसले.
३. प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळे साधकांना परात्पर गुरुदेव लाभले, हे प.पू. भक्तराज महाराज यांना सांगून कृतज्ञता व्यक्त करणे
मी डोळे उघल्यावर ‘ते माझ्याकडे पहात आहेत’, असे दिसले. मला त्यांचे चरण दिसले. तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘बाबा, तुमच्या अनंत कृपेमुळे आज आम्हा सर्व साधकांना परात्पर गुरुदेव लाभले आणि त्यांच्या अनंत कृपेमुळे आम्हाला तुमची अलौकिक भजने ऐकायला मिळाली.’ असे म्हणून मी कृतज्ञता व्यक्त करत असतांना ते माझ्याकडे पाहून हसले.
४. प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनांची जाणवलेली वैशिष्ट्ये
अ. ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकून साक्षात् विठ्ठलही नाचत असेल’, असे मला वाटले.
आ. प.पू. बाबांच्या भजनांमधून मला ‘भगवंताच्या भेटीची ओढ कशी असते’, हे अनुभवायला मिळाले. मी ही भावाची स्थिती ४० मिनिटे अनुभवत होते. तेव्हा माझे डोळे पाणवले होते.
५. समारंभातील चैतन्य न पेलवल्याने थकवा येणे
हळूहळू मी त्या स्थितीतून बाहेर आले. तेव्हा मी संपूर्ण गळून गेले होते. माझ्या छातीत वेदना होत होत्या. मला पाणी प्यावेसे वाटले; परंतु मला स्वतः उठून पाणी घेता येत नव्हते. मला असा त्रास १५ मिनिटे झाला. नंतर माझे शरीर हलके झाले, तरीही मला दुपारी २ वाजेपर्यंत थकवा जाणवत होता. तेव्हा ‘त्या समारंभातील चैतन्य मला पेलवले नाही’, असे मला वाटले.
हे गुरुदेवा, तुमच्या अनंत कृपेने ही भावावस्था मला अनुभवायला मिळाली. त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. सुजाता अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |