सदोष लोकशाही आणि त्यासंदर्भात काही न करणारे झोपलेले मतदार !

लोकशाही कि भ्रष्टशाही ?

भाग ७.

भाग ६. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/549665.html

६. लोकशाही कि घराणेशाही ?

श्री. रमेश शिंदे

‘सामान्य घरातून येऊन ‘बॉलीवूड’मध्ये स्वकर्तृत्वाने ‘चांगला अभिनेता’ म्हणून नावाजलेल्या सुशांतसिंह राजपूत या युवा अभिनेत्याने वर्ष २०२० मध्ये आत्महत्या केली आणि संपूर्ण देशभरात ‘नेपोटिजम्’ अर्थात् नातलगत्व, घराणेशाही, वंशवाद यांच्या संदर्भात चर्चा चालू झाली. भारतातील युवा पिढीला ही चर्चा नवीन वाटत असली, तरी ही घराणेशाही काही नव्याने आलेली नाही. भारतावर स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ राज्य करणार्‍या काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद हे नेहरू-गांधी घराण्याकडेच राखीव ठेवल्यासारखे आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांच्या इतिहासापैकी ४१ वर्षे हे पद जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या नेहरू-गांधी कुटुंबातील ५ व्यक्तींकडेच फिरत राहिलेले आहे. त्यातही वर्ष १९९८ पासून ते वर्ष २०२२ या २४ वर्षांच्या काळात तर ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी या दोघांकडेच केंद्रित झालेले आहे. भारतातील ‘सर्वांत जुना लोकशाही व्यवस्था असणारा राजकीय पक्ष’ असे गौरवाने सांगणार्‍या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ‘स्वतःच्या पक्षातच लोकशाही नसून घराणेशाही चालू आहे’, याची लाज वाटत नाही, याचेच मोठे आश्चर्य वाटते ! अर्थात् या घराणेशाहीला कारणीभूत असतात हुजरेगिरी करून स्वतःचा स्वार्थ साधणारे नेते. याचे उदाहरण म्हणजे वर्ष १९७५ मध्ये इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात तत्कालीन काँग्रेसचे नेते देवकांत बरुआ यांनी ‘इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा’ (इंदिरा म्हणजे भारत आणि भारत म्हणजे इंदिरा) अशी दिलेली घोषणा प्रसिद्ध झाली होती.

ज्या भारताला लाखो वर्षांचा प्राचीन इतिहास आहे, ज्या भारतात राम-कृष्णादी अनेक अवतार अवतीर्ण झाले आहेत, तसेच व्यास-वाल्मीकि, तुलसीदास, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज अशी मोठी ऋषी-संत परंपरा होऊन गेलेली आहे. ज्या भारतात चंद्रगुप्त मौर्यापासून ते महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक वीर राजे-महाराजे, योद्धा होऊन गेलेले आहेत, या सर्वांचा इतिहास एका क्षणात संपवून आणीबाणीद्वारे भारतातील लोकशाही व्यवस्था मोडित काढणार्‍या अन् भारतावर एक प्रकारची हुकूमशाही लादणार्‍या ‘इंदिरा गांधींपुरते भारताला मर्यादित करणे’, हे या घराणेशाही रुजवणार्‍या हुजरेगिरीचे लक्षण नाही, तर काय म्हणावे ? बरे देशातील एक सर्वपरिचित उदाहरण म्हणून केवळ आपण नेहरू-गांधी घराण्याचे हे उदाहरण येथे अभ्यासले; मात्र भारतातील अन्य कोणत्याही राज्याचा किंवा राजकीय पक्षाचा विचार केला, तर तिथे वेगळे काही आढळणार नाही. महाराष्ट्रातील पवार घराणे, चव्हाण घराणे, पाटील घराणे, देशमुख घराणे अशा प्रमुख काही घराण्यांचा अभ्यास केल्यास तिथेही हीच ‘घराण्यांची’ लोकशाही चालू असल्याचे दिसते. तमिळनाडू राज्यातही करुणानिधी नंतर उत्तराधिकारी म्हणून त्यांचे पुत्र स्टॅलीन मुख्यमंत्री बनले आहेत. उत्तरप्रदेशात राम मनोहर लोहिया यांच्या नावे ‘समाजवादी पक्ष’ चालवणार्‍या मुलायमसिंह यादव यांनी तर या सर्वांवर कहर केला आहे. त्यांनी स्वतःच्याच घरातील एक-दोन नव्हे ११ नातेवाइकांना विविध ठिकाणांहून निवडून आणून राजकीय पदांवर बसवले आहे. हाच समाजवाद असल्याचा ते मुलामा देत आहेत आणि गरीब जनता त्याला लोकशाही मानत आहे. हे सर्व पाहिल्यावर ‘भारतातील विद्यमान राज्यव्यवस्थेला खरोखरंच लोकशाही म्हणता येईल का ?’, हादेखील एक प्रश्नच आहे.

(क्रमशः)

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.