भारताला ‘वर्धिष्णुर्विश्ववन्दिता’ बनवण्यासाठी धर्माधिष्ठान मिळवणे अपरिहार्य !
गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये ध्रुवीकरण होत आहे. हा पालट केवळ हिंदुत्वनिष्ठ समजला जाणारा भाजप विरुद्ध कथित धर्मनिरपेक्षतावादी म्हणजेच अल्पसंख्यांकांचा अनुनय करणारी काँग्रेस यांच्यापर्यंत सीमित नाही. वैचारिक आणि व्यावहारिक अशा विविध स्तरांवर ही क्रांती घडत आहे. यामुळे एकेकाळी ‘लव्ह जिहाद’ अथवा ‘हिंदूंचे धर्मांतर’ अशा शब्दांना जिथे ‘समाजाच्या एका विशिष्ट गटाकडून रेटल्या गेलेल्या कपोलकल्पित संकल्पना’ असे संबोधून त्यांस कचर्याची टोपली दाखवली जात होती, तिथे या षड्यंत्रांच्या वास्तविकतेची जाणीव व्यापक समाजपुरुषामध्ये होत गेल्याने भाजपशासित का असेना; परंतु विविध राज्य शासनांनी यांवर आळा घालणारे कायदे केले. हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेला जिथे ‘फ्रिंज ऐलिमेंट्स’ची (जनाधार नसलेल्यांची) चाल म्हणून हिणवले जायचे, तीच आता ‘मेनस्ट्रीम’ (मुख्य प्रवाहातील) होऊ लागली आहे. कालमाहात्म्य काय असते ? त्याची ही प्रचीती !
जिवंत राष्ट्रीय अनुभूती !
आता याचे पुढचे पाऊल म्हणजे हे हिंदु राष्ट्र सत्यात उतरवणे होय; परंतु त्यापूर्वी प्रस्थापित शासनतंत्र आणि त्याआधीचा इतिहास यांचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. गेल्या १ सहस्र ३०० वर्षांचा इतिहास पाहिला, तर त्याच्या उदरात ‘धर्मसत्य’ लपले आहे. ते सांगून आजच्या भरकटलेल्या समाजास जागृत करणे आवश्यक आहे. इस्लामच्या उदयानंतर पहिल्या १०० वर्षांतच पूर्व युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य-पूर्वेतील देश येथे त्याने त्याचे वर्चस्व प्रस्थापित केले. एवढे की, युरोपातील पगान पंथ, बेबीलॉन (आजच्या इराकमधील भूभाग), पर्शिया (आजचा इराण), मेसोपोटॅमिया (तुर्कस्तान, इराक, सिरिया आणि कुवेत येथील भूभाग), इजिप्त येथील धर्म, संस्कृती अन् सभ्यता नष्ट झाल्या. आज पर्यटनापुरत्याच त्या संस्कृतींच्या स्मृती शिल्लक राहिल्या आहेत. केवढी ही अधोगती ! याउलट भारताने म्लेच्छांचे आक्रमण पूर्णपणे पचवले नि तो त्यास पुरून उरला. याचे श्रेय केवळ या ३००-४०० वर्षांतील काही ठराविक गौरवशाली महापुरुषांनाच देणे इतिहासाची प्रतारणा केल्यासारखे होईल. या सर्वांच्या आधीची ८५० वर्षे पाहिली, तरी इस्लामच्या आक्रमणास शह देणारा समाज अस्तित्वात होता. त्याची बलस्थाने केवळ महान योद्धे नव्हते; कारण जर तसे असते, तर उपरोल्लेखित राज्यांतही असे महापराक्रमी योद्धेपुरुष असणारच ! भारत आणि अन्य राष्ट्रांतील महत्त्वपूर्ण भेद म्हणजे सनातन हिंदु धर्म अन् त्याचे आचरण करणारा समाजपुरुष होय. बुद्धीच्या पलीकडील ही सूक्ष्म समष्टी शक्ती हीच खरेतर हिंदूंची वास्तविक शक्ती होती. त्यामुळे आसेतुहिमाचल असलेले हे राष्ट्र घायाळ झाले, तरी हिंदु म्हणून असलेला त्याचा परिचय पुसला गेला नाही. ‘धर्मशक्ती काय असते ?’, याची ही ऐतिहासिक नि जिवंत राष्ट्रीय अनुभूती आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
अधोगतीची परिसीमा !
धर्माचा हाच धागा वर्ष १९४७ मध्ये भारताने राज्य आणि समाज यांच्यापासून विलग केला अन् भारताच्या अधोगतीस प्रारंभ झाला. धर्माचरणामुळे मिळणारी जी सूक्ष्म नि जगातील सर्वांत बलवान शक्ती आपल्या ठायी होती, ती आपल्यापासून दूर होत गेली. यामुळे साहजिकच देशाच्या धोरणकर्त्यांपासून म्हणजेच राजापासून प्रजा हे सर्व चैतन्यविहीन होत गेले नि मरणासन्न स्थितीला पोचले. अपप्रवृत्त्या बळावल्या, भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला, लाखो कोटी रुपयांच्या कर्जाचे देशावर ओझे आले, खंडित भारताचे लचके तोडले गेले, भारतीय स्त्री अधिकाधिक असुरक्षित होत गेली अन् ७५ वर्षांच्या आतच भारत पुन्हा एकदा फाळणीच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला आहे. भारताने आधुनिक शासनतंत्र म्हणून नावारूपाला आलेली लोकशाही स्वीकारली खरी; परंतु सात्त्विक समाजातच ही शासनप्रणाली बहरू शकते, हे लक्षात न घेतल्याने धर्मविहीन हिंदु समाजाची अधोगतीच होत गेली. यातून धर्माचे भारतियांच्या जीवनातील महत्त्व लक्षात येणे पुरेसे आहे आणि हो, यासाठीच धर्माधिष्ठित राष्ट्राची म्हणजेच ‘हिंदु राष्ट्रा’ची भारताला आवश्यकता आहे. त्यामुळे ‘राष्ट्रहित सर्वाेपरि ।’, ‘तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन चार रहें ना रहें ।’ यह देश रहना चाहिए !’, ‘गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, अशा वीरश्री निर्माण करणार्या घोषणा देण्याइतपत सीमित न रहाता या वीरश्रीला ‘धर्मश्री’चा आधार मिळण्यासाठी आणि चैतन्यमय हिंदु राष्ट्राची पहाट पहाण्यासाठी हिंदूंनी चैतन्याची उपासना करणे आवश्यक आहे. हिंदूंनी समष्टी साधना करण्यातच दैन्यावस्था प्राप्त झालेल्या समाजपुरुषाच्या नि देशाच्या उद्धाराचे रहस्य लपलेले आहे.
वर्धिष्णुर्विश्ववन्दिता !
या दिशेने आता मार्गक्रमण चालू झाले आहे. प्रयागराज येथे नुकत्याच झालेल्या संत संमेलनामध्ये हिंदु राष्ट्राची राज्यघटना लिहिली जाणार असल्याचे संतांनी घोषित केले आहे. त्रिकालज्ञानी असलेले संत-महापुरुषच मानवाचा उद्धार करू शकतात. या दृष्टीकोनातून व्यवहारिक स्तरांवर संरक्षणतज्ञ आणि कायदेतज्ञ यांच्या जोडीला संत ही राज्यघटना लिहिणार असल्याने याकडे जागरूक हिंदू आशेचा किरण म्हणून पहात आहेत. हिंदु राष्ट्रामध्ये प्रत्येक हिंदूला धर्मशिक्षण दिले जाईल, गुरुकुल शिक्षणपद्धतीचा पुन्हा एकदा उदय होईल, धर्म हाच प्रत्येक राष्ट्रीय अभियानाचा केंद्रबिंदू असेल अन् त्यामुळे हिंदूंच्या या मातृभूमीचा पुन्हा एकदा जागतिक महासत्ता नि ज्ञानशक्ती म्हणून प्रभावशाली उदय होईल. यातून ‘वर्धिष्णुर्विश्ववन्दिता’ म्हणजे हिंदु धर्मराष्ट्राचे तेज वर्धिष्णु होत जाऊन विश्ववंदनीय होणार आहे. येणारा काळ हा महातेजस्वी असून हे गौरवशाली भविष्य साकारण्यात खारीचा वाटा उचलण्यासाठी हिंदूंनो, साधना करा, आपले धर्मतेज वृद्धींगत करा अन् हिंदु राष्ट्राच्या दैवी कार्यास हातभार लावा ! जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् !