१. दुचाकीवरून पडून हाताला दुखापत होणे
१ अ. दुचाकीवरून खाली पडल्यावर तोंडातून ‘आई ग’, असा शब्द बाहेर न पडता ‘प.पू. डॉक्टर’, असे शब्द बाहेर पडणे आणि लोकांनी उचलून बाजूला बसवल्यावर प.पू. डॉक्टर अन् कृष्ण यांचा सतत धावा करणे : ‘माझा ‘ॲक्वागार्ड वॉटर’चा (ॲक्वागार्ड कंपनीच्या पिण्याच्या पाण्याच्या विक्रीचा) व्यवसाय होता. २१.५.२०१७ या दिवशी मी सकाळी माझ्या भागीदाराला किल्ली देण्यासाठी निघालो. मी घरी परत येतांना काहीही कारण नसतांना माझी दुचाकी मागून ठोकल्याचे मला जाणवले. कुणीतरी मला जोरात धक्का दिला. दुचाकीच्या समोरच्या भागात उजवा हात अडकून मी पडलो. त्या वेळी माझ्या तोंडून ‘आई ग’, असे शब्द न येता ‘प.पू. डॉक्टर’, असे शब्द बाहेर पडले. त्या वेळी माझ्या कुटुंबातील सदस्य बाहेरगावी गेले होते. माझा मित्र अर्ध्या घंट्याने आला. तोपर्यंत लोकांनी मला उचलून बाजूला बसवले. मी ‘प.पू. डॉक्टर आणि हे कृष्णा’, असा सतत धावा करत होतो.
१ आ. घरात साहाय्यासाठी अन्य कुणी नसणे, सूक्ष्मातून ‘समवेत श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, असे दिसणे, त्यांनी प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला सांगणे : मला मित्राने चिकित्सालयात नेले आणि कच्चे प्लास्टर घालून रात्री घरी आणून सोडले. मी घरी एकटाच होतो. माझ्या उजव्या हाताची दोन हाडे मोडली होती. मला आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्यास सांगितले होते; परंतु माझ्या मित्राने तसे न करता मला लेप लावण्यासाठी एका गावाला नेले आणि नंतर घरी आणून सोडले. माझ्या साहाय्याला कुणीही नसल्याने मला रात्री कुलूपही लावता येत नव्हते. त्यामुळे मी घराचे प्रवेशद्वार उघडेच ठेवले होते. आमच्या घरात नेहमी मोठ्या घोरपडी निघतात. मला सूक्ष्मातून ‘माझ्या समवेत श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर आहेत’, असे दिसले. त्यांनी सूक्ष्मातून मला वेदना होत असलेल्या हातावर दैनिक ठेवायला आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावायला सांगितले. मी त्यानुसार केल्यावर मला रात्री चांगली झोप लागली.
१ इ. श्रीकृष्णाला प्रार्थना करून एका हाताने कुलूप लावतांना आपोआप कुलूप लागून श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवणे : २३.५.२०१७ या दिवशी मित्राच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था झाली. उष्णता पुष्कळ असल्याने कूलर लावावा लागणार होता. त्यासाठी पाणी हवे; म्हणून मी घराच्या मागचे दार उघडण्यास गेलो. मला एका हाताने काम करता येत नव्हते. त्यामुळे पाणी भरण्यासाठी उजव्या हाताचा वापर करावा लागला. ‘आता मागचे कुलूप कसे लावावे ?’, असा प्रश्न पडल्यावर मी श्रीकृष्णाला आळवून शरणागतभावाने प्रार्थना केली आणि कुलूपामधून किल्ली फिरवता येऊन ती खाली पडली अन् कुलूप लागले. त्या वेळी तेथे प्रत्यक्ष ‘श्रीकृष्ण उभा आहे’, अशी अनुभूती मी घेतली.
१ ई. हाताला वेदना होत असतांना ‘श्रीकृष्णाने उचलून त्याच्या जवळ झोपवले आहे’, असे दिसणे आणि त्या वेळी खोलीत पांढरा प्रकाश दिसणे : माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य दुसर्या राज्यात फिरण्यासाठी गेले होते. त्यांना माझा अपघात झाल्याचे मी कळवले नाही. ४.६.२०१७ या दिवशी माझ्या हातात पुष्कळ वेदना होत होत्या. तेव्हा ‘श्रीकृष्णाने मला त्याच्या जवळ झोपवले आहे’, असे मला दिसले. नंतर मला होणार्या वेदना हळू हळू न्यून झाल्या. त्या वेळी मला खोलीत पांढरा प्रकाश दिसला.
२. हातावरील शस्त्रकर्माच्या वेळी आलेल्या अनुभूती
२ अ. ‘लेप लावल्याने नसांना इजा झाली’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितल्यावर कुटुंबियांनी हाडांच्या आधुनिक वैद्यांकडे नेणे : ७.६.२०१७ या दिवशी माझी आई, बहीण आणि बहिणीचे पती घरी आले. त्यांनी नेहमीच्या आधुनिक वैद्यांना घरी बोलावले. आधुनिक वैद्यांनी ‘लेप लावल्याने नसांना इजा झाली आहे. त्यामुळे हात कापण्यासारखी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे’, असे सांगितले. त्यामुळे कुटुंबियांनी मला त्वरित हाडांच्या आधुनिक वैद्यांकडे नेले.
२ आ. गुंगीच्या इंजेक्शनचा परिणाम न होणे आणि‘परात्पर गुरु डॉक्टर’ अशी हाक मारताच इंजेक्शनचा परिणाम होऊन शस्त्रकर्म होणे : ९.६.२०१७ या दिवशी शस्त्रकर्मासाठी गेल्यावर माझे त्रास वाढले. त्या वेळी माझी मोठी बहीण आणि आई यांनी नामजपादी उपाय केल्यावर माझा त्रास न्यून झाला. मला दुपारी ३.३० वाजता शस्त्रकर्म करण्यासाठी बोलावण्यात आले. त्या वेळी मी परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना समवेत येण्यासाठी प्रार्थना केली. माझ्यावर गुंगीच्या इंजेक्शनचा परिणाम होत नसल्यामुळे आता ‘काय करावे ?’, या विचारात सर्व जण होते. मी ‘परात्पर गुरु डॉक्टर’ अशी हाक मारल्यावर मला गुंगी आली. त्या वेळी ‘माझे शस्त्रकर्म परात्पर गुरु डॉक्टर करत आहेत’, असे मला जाणवले. मला समोर बासरी हातात घेतलेला सोनेरी वस्त्रातील श्रीकृष्ण दिसला.
२ इ. रिक्शात राहिलेली वैद्यांनी दिलेली औषधांची धारिका देवाच्या कृपेने मिळणे : २०.६.२०१७ या दिवशी मला पक्के प्लास्टर घातल्यावर मी बहिणीकडे एक दिवस रहाणार होतो. तेव्हा औषधाची चिठ्ठी आणि आधुनिक वैद्यांनी दिलेली धारिका (फाईल) रिक्शातच राहिली. नंतर ताई पुन्हा दुसर्या रिक्शाने त्या रिक्शावाल्याला शोधायला गेली. तो कुठेच दिसला नाही. नंतर एका महिलेने ते साहित्य ताईच्या घरात आणून दिले. त्या महिलेने सांगितले, ‘‘तू तिसर्या मजल्यावर रहातेस; म्हणून परिचित नसलेल्या रिक्शावाल्याने ती फाईल खालीच पायरीवर ठेवली. मी ती वर आणली.’’ नंतर त्या बाईला धन्यवाद देण्यासाठी ताईने तिला शोधले, तर ती कुठेच दिसली नाही.
२ ई. घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशी फुलल्याने प्रसन्न वाटणे : शस्त्रकर्मानंतर ३ – ४ दिवसांनी आमच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ एका बाजूला राम-तुळस, तर दुसर्या बाजूला कृष्ण-तुळस फुलली होती. त्यामुळे मला घरात प्रसन्न वाटत होते आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनीच घराचे रक्षण केले’, असे मला वाटले.
– श्री. आनंद डाऊ, अमरावती (जून २०१७)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |