पणजी, २ फेब्रुवारी (वार्ता.) – १४ फेब्रुवारी या दिवशी होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी ४० मतदारसंघांमध्ये एकूण ३०१ उमेदवार रिंगणात उभे आहेत. शिवोली मतदारसंघात सर्वाधिक १३, मुख्यमंत्री निवडणूक लढवत असलेल्या साखळी मतदारसंघातून १२ उमेदवार, तसेच डिचोली, पर्वरी, सांताक्रूझ, मडगाव आणि बाणावली मतदारसंघांमध्ये सर्वांत अल्प म्हणजे प्रत्येकी ५ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. मतदान १४ फेब्रुवारी या दिवशी होणार असून १० मार्च या दिवशी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीतील काही महत्त्वाचे उमेदवार
साखळी मतदारसंघात भाजपकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मडगाव मतदारसंघातून उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, डिचोली मतदारसंघातून गोवा विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर. काँग्रेसच्या तिकिटीवर मडगाव मतदारसंघातून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत. मगोपच्या तिकिटीवर मडकई मतदारसंघातून सुदिन ढवळीकर, तर काँग्रेसकडून लवू मामलेदार. प्रियोळमध्ये मगोपकडून दीपक ढवळीकर. पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उत्पल मनोहर पर्रीकर आदी काही महत्त्वाच्या उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात उभे आहेत.