परिवहनमंत्री अनिल परब यांची दापोली (जिल्हा रत्नागिरी) येथील अनधिकृत ‘रिसॉर्ट’ पाडण्याचा केंद्रशासनाचा आदेश ! – किरीट सोमय्या, भाजप

किरीट सोमय्या आणि अनिल परब

मुंबई – परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे दापोली समुद्र किनार्‍यावरील २ अनधिकृत रिसॉर्ट पाडण्याचा आदेश केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ३१ जानेवारी या दिवशी महाराष्ट्र सरकारला दिला आहे, अशी माहिती भाजपचे नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्या यांनी दिली आहे. याविषयीचे पत्र त्यांनी सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केले आहे.

कारवाईचा आदेश दिलेल्या रिसॉर्टच्या विरोधात किरीट सोमय्या यांनीच केंद्र सरकारकडे तक्रार केली होती. ‘साई रिसॉर्ट एन एक्स’ आणि ‘सी क्रौंच रिसॉर्ट’ अशी या रिसॉर्टची नावे आहेत. केंद्रशासनाच्या पर्यावरण विभागाने कारवाईविषयी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘ही रिसॉर्ट ‘सी.आर्.झेड.’ नियमाचे उल्लंघन करून बांधण्यात आली आहेत. यामुळे पर्यावरण कायद्याचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे ही रिसॉर्ट पाडून समुद्र किनार्‍याची जागा पूर्ववत् करण्यात यावी. हे दायित्व महाराष्ट्र सरकारचे आहे.’ या कारवाईकडे लक्ष देण्याची सूचनाही केंद्रशासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने नागपूर येथील विभागीय कार्यालयातील संबंधित अधिकार्‍यांना दिली आहे.