‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या यज्ञाच्या वेळी कु. मधुरा भोसले यांना श्री प्रत्यंगिरादेवीविषयी मिळालेले दैवी ज्ञान !

‘१५.१.२०२२ या दिवशी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात महर्षींच्या आज्ञेनुसार ‘श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचा यज्ञ’ झाला. देवाने माझ्याकडून या यज्ञाच्या सूक्ष्म परीक्षणाची सेवा करवून घेतली. श्रीगुरूंच्या कृपेने श्री प्रत्यंगिरादेवीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये उलगडणार्‍या दैवी ज्ञानाची सूत्रे येथे दिली आहेत.

१. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये ५० टक्के शिवतत्त्व आणि ५० टक्के विष्णुतत्त्व असणे

श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये ५० टक्के शिवतत्त्व आणि ५० टक्के विष्णुतत्त्व आहे. देवीतील शिवतत्त्वामुळे तिच्यामध्ये पुष्कळ प्रमाणात मारक शक्ती आहे आणि तिच्यातील विष्णुतत्त्वामुळे ती श्रीविष्णूचे अवतार करत असलेल्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात साहाय्य करते. श्रीप्रत्यंगिरादेवीमध्ये योगमायेचा वास असल्यामुळे तिच्या कृपेमुळे शिवाला सहस्र वर्षे निर्बिज समाधी अवस्था आणि श्रीविष्णूला योगनिद्रा प्राप्त होते.

श्री प्रत्यंगिरादेवी

२. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित कार्य करण्याची क्षमता श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये उत्पत्तीशी संबंधित ५, स्थितीशी संबंधित ५ आणि लयाशी संबंधित ९० टक्के कार्य करण्याची क्षमता आहे. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये मारक शक्तीचे प्रमाण ९० टक्के असल्यामुळे तिच्याकडून प्रामुख्याने लयाशी संबंधित कार्य होते.

३. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या प्रगट शक्तीचे प्रमाण देवीची प्रगट शक्ती ९० टक्के असल्यामुळे तिच्या कृपेने वाईट शक्तींचा त्रास अल्पावधीत न्यून होतो. श्रीनृसिंह अवताराकडून हिरण्यकश्यपूरूपी दैत्यराजाचा वध करण्यासाठी ९० टक्के प्रगट शक्तीची आवश्यकता होती.

४. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या शारीरिक वैशिष्ट्यांमागील अध्यात्मशास्त्र

४ अ. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवी चतुर्भुज असण्याचे महत्त्व : श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवी श्रीनृसिंह अवताराच्या वेळी प्रगट झाली होती. श्रीनृसिंह अवताराने हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर हिरण्यकश्यपूचे राज्य त्याचा परमप्रिय भक्त प्रल्हादाकडे सोपवून पृथ्वीवर धर्मसंस्थापना केली होती. तिच्या चार भुजा या ‘धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष’, या धर्माच्या चार पुरुषार्थांचे प्रतीक आहेत.

४ आ. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या हातांमध्ये असणार्‍या विविध वस्तूंचे महत्त्व

४ आ १. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डमरू असण्याचे महत्त्व : श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये शिवाची लयकारी (मारक) शक्ती पुष्कळ प्रमाणात कार्यरत असते. त्यामुळे तिने शिवाच्या लयकारी शक्तीचे सगुण स्तरावरील प्रतीक असणारे ‘त्रिशूळ’ हे शस्त्र हातात घेतले आहे. जेव्हा देवी बलाढ्य अनिष्ट शक्तींशी सगुण-निर्गुण स्तरावर युद्ध करते, तेव्हा ती त्यांचा वध त्रिशूळाने करते. शिवाची लयकारी शक्ती श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये नादशक्तीच्या रूपाने निर्गुण-सगुण स्तरावर कार्यरत असल्यामुळे तिच्या उजव्या हातात शिवाचे ‘डमरू’ हे वाद्य आहे. जेव्हा देवी बलाढ्य अनिष्ट शक्तींशी निर्गुण-सगुण स्तरावर युद्ध करते, तेव्हा ती डमरूनाद करून अनिष्ट शक्तींचे ध्यान आणि स्तंभन भंग करते अन् मारक नादलहरींचा मारा करून त्यांची निर्गुण स्तरावरील त्रासदायक शक्ती नष्ट करते.

४ आ २. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या डाव्या हातात पाश आणि असुराचे कापलेले शिर असण्याचे महत्त्व : ‘पाश’ हे सर्व प्रकारच्या बंधनांचे प्रतीक आहे. देवीने सात्त्विक, राजसिक आणि तामसिक मायेवर, म्हणजे मोहपाशावर विजय मिळवल्याने तिने हातात ‘पाश’ धारण केलेला आहे. जेव्हा आसुरी शक्ती देवीचे उग्र रूप पाहून पलायन करतात, तेव्हा देवी त्यांच्यावर पाश टाकून त्यांना बांधून तिच्याजवळ खेचते आणि त्यांच्यावर त्रिशूळाने वार करून त्यांचा नाश करते. ‘असुराचे शिर हे अविद्या, अज्ञान आणि अहंकार’ यांचे प्रतीक आहे. देवी असुर आणि मायेत भरकटलेले तिचे भक्त यांच्यातील ‘अविद्या, अज्ञान आणि अहंकार’, यांचा नाश करणारी आहे; म्हणून तिने तिच्या डाव्या हातात असुराचे कापलेले शिर धरले आहे.

४ इ. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचे मुख सिंहाप्रमाणे असण्याचे महत्त्व : ‘सिंह’ हा ‘शक्ती, शौर्य, पराक्रम आणि वीरता’, यांचे प्रतीक आहे अन् तो ‘वनराज’, म्हणजे ‘वनाचा राजा’ आहे. देवीमध्ये पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज आणि मारक शक्ती असल्यामुळे ती सिंहाप्रमाणेच शक्तीशाली, शूर, पराक्रमी, वीर आणि दुष्ट शक्तींवर नियंत्रण मिळवणारी आहे. त्यामुळे तिचे मुख सिंहाप्रमाणे आहे.

४ ई. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवी सिंहावर वाहन म्हणून आरूढ असण्याचे कारण : श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीची ९० टक्के प्रगट मारक शक्ती धारण करण्याचे सामर्थ्य वनराज सिंहामध्येच आहे. त्याचप्रमाणे सिंह चपळ असल्यामुळे तो वेगाने धावतो. त्यामुळे देवीने सिंहाला तिचे ‘वाहन’ म्हणून निवडले आहे. जेव्हा श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवी सिंहावर आरूढ होते, तेव्हा तिचे वाहन सिंह वायूवेगाने ब्रह्मांडातील विविध लोकांमध्ये संचार करतो. युद्धाच्या वेळी देवीचे वाहन असलेला सिंह आसुरी शक्तींवर झेप घेऊन त्यांना फाडून काढतो.

४ उ. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचा उजवा चरण खाली आणि डावा चरण गुडघ्यातून दुमडलेल्या स्थितीत असण्याचे महत्त्व : देवीचे ‘दुमडलेले चरण’ हे अप्रगट आणि ‘खाली सोडलेले चरण’ हे प्रगट शक्तीचे प्रतीक आहेत. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीची सूर्यनाडी चालू असल्यामुळे तिच्या उजव्या चरणातून पाताळाकडे सतत ९० टक्के प्रकट मारक शक्ती प्रवाहित होते. त्यामुळे पाताळात वास करणारी रज-तम प्रधान अनिष्ट आणि अधर्मी शक्ती तिच्या चरणाखाली दबली जाते. त्यामुळे अनिष्ट शक्तींनी पृथ्वीवर सोडलेल्या निर्गुण-सगुण स्तरावरील त्रासदायक शक्तीचा प्रवाह श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या चरणांखाली नष्ट झाल्यामुळे हा प्रवाह पृथ्वीपर्यंत पोचत नाही. अशाप्रकारे देवीने पृथ्वीचे पाताळातील अनिष्ट शक्तींपासून रक्षण केले आहे. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीची चंद्रनाडी अकार्यरत असल्यामुळे तिच्या दुमडलेल्या चरणामध्ये १० टक्के अप्रगट, म्हणजे निर्गुण-सगुण अवस्थेतील शक्तीचा वास आहे.

४ ऊ. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीची कांती पांढर्‍या, निळसर किंवा काळ्या रंगाची असण्याचे महत्त्व : काही चित्रांमध्ये देवीची कांती पांढर्‍या रंगाची आहे, काही चित्रांमध्ये ती निळसर रंगाची, तर काही चित्रांमध्ये काळ्या रंगाची आहे. जेव्हा श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये निर्गुण शक्ती कार्यरत असते, तेव्हा तिची कांती पांढर्‍या रंगाची असते. जेव्हा देवीमध्ये नीलतारा किंवा नीलसरस्वतीदेवीची मारक शक्ती कार्यरत होते, तेव्हा तिची कांती निळसर रंगाची असते. जेव्हा देवीमध्ये कालीदेवीचे तत्त्व वाढते, तेव्हा तिची कांती काळसर रंगाची असते.

४ ए. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या तत्त्वाचा रंग लाल असणे आणि तिने लाल रंगाची साडी परिधान करणे यांचे महत्त्व : ‘लाल’ रंग हा ‘मारक शक्ती’ आणि ‘गुलाबी’ रंग हा ‘तारक शक्ती’ यांचे प्रतीक आहे. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीमध्ये मारक शक्ती ९० टक्के इतक्या प्रमाणात प्रगट असल्यामुळे तिच्या तत्त्वाचा रंग लाल आहे. जेव्हा श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवी लाल रंगाची साडी परिधान करते, तेव्हा तिच्यामध्ये शिवाची लयकारी (मारक) शक्ती प्रगट स्वरूपात दीर्घकाळ कार्यरत रहाते आणि तिच्या लाल रंगाच्या साडीतून वायूमंडलात प्रक्षेपित होते.

५. श्रीविष्णूच्या चौथ्या क्रमांकाच्या श्रीनृसिंह अवताराला साहाय्य करण्यासाठी कार्यरत झालेल्या श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीचे सूक्ष्मातील कार्य

ब्रह्मदेवाने हिरण्यकश्यपूला दिलेल्या वरदानाच्या मर्यादा पाळत त्याचा संहार करण्यासाठी श्रीविष्णूला श्रीनृसिंहाचे उग्र रूप धारण करावे लागले. श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवी ही जारण-मारणादी अभिचाराशी संबंधित देवी असून तिच्या कृपेमुळे जारण-मारण आणि तंत्रविद्या यांनी केलेले सर्व प्रयोगही विफल होतात. श्रीनृसिंह अवताराला साहाय्य करण्यासाठी जेव्हा श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवी श्रीनृसिंह अवतारामध्ये प्रगट झाली, तेव्हा श्रीनृसिंह अवताराला हिरण्यकश्यपूच्या भोवती असणारे तंत्रमंत्रांनी भारित केलेले मायावी सिद्धीचे कवच भेदून त्याच्या स्थूल देहापर्यंत पोचता आले. ब्रह्मदेवाने दिलेल्या वरदानानुसार हिरण्यकश्यपूचा वध कोणत्याही प्रकारच्या शस्त्र किंवा अस्त्र यांच्याविना करायचा होता. त्यामुळे श्रीनृसिंह अवताराच्या दोन्ही हातांतील नखांना शस्त्राप्रमाणे सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी महाशक्तीचे यज्ञज्वाळेप्रमाणे उग्र आणि मारक रूप असलेली श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीची शक्ती श्रीनृसिंह अवताराच्या दोन्ही हातांच्या नखांमध्ये सामावली गेली. त्यामुळे श्रीनृसिंह अवताराने त्याच्या हातातील तीक्ष्ण नखांनी हिरण्यकश्यपूचे पोट फाडून त्याचा क्षणार्धात वध केला.

कु. मधुरा भोसले

श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने वंदन : ‘ज्ञानावतार आणि विश्वगुरु असणारे विष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्री शूलिनी प्रत्यंगिरादेवीच्या संदर्भात वरील दैवी ज्ञान मिळाले आणि तिचा महिमा लक्षात आला’, यासाठी मी श्रीगुरुचरणी कृतज्ञताभावाने वंदन करते.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१.२०२२)

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• सूक्ष्म :
व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) :
काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• सूक्ष्म-परीक्षण :
एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक