पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना विवाहोत्तर जीवनात आलेले काही अनुभव !

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना विवाहोत्तर जीवनात आलेले काही अनुभव !

पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख (वय ७५ वर्षे) या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आत्याची (सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने यांची) मुलगी, म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आते बहीण आहे.


‘पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेले अनुभव !’
भाग १. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/548199.html

पू. (श्रीमती) शालिनी नेनेआजी

३० जानेवारी २०२२ या दिवशी आपण श्रीमती अनुपमा देशमुख यांचे बालपण आणि त्यांच्यावरील साधनेचे संस्कार यांविषयी पाहिले. आजच्या लेखात आपण विवाहोत्तर जीवनात त्यांच्या मनावर झालेला परिणाम आणि त्यांना आलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांच्या अनुभूती पहाणार आहोत.  

(भाग २)

४. विवाहोत्तर जीवन

सौ. शालिनी नेने (सनातनच्या ३६ व्या संत पू. (कै.) श्रीमती शालिनी नेने)आणि कु. सुधा नेने (आताच्या श्रीमती अनुपमा देशमुख) (वर्ष १९५४)

४ अ. धार्मिक वातावरण असलेल्या लोकहितवादी गोपाळ हरि देशमुख यांच्या घराण्यात लग्न होणे : पुढे लग्न होऊन मी मुंबईला लोकहितवादी गोपाळ हरि देशमुखांच्या घराण्यात आले. (‘झी’ मराठी वाहिनीवर ‘उंच माझा झोका’ या मालिकेमध्ये लोकहितवादी आणि त्यांच्या पत्नी सौ. गोपिकाबाई यांची व्यक्तीचित्रे साकारण्यात आली आहेत.) माझ्या सासरी धार्मिक वातावरण आणि देवावरची श्रद्धा असणारी मंडळी होती. घरी प्रतिदिन यथासांग पूजा करण्यासाठी गुरुजी येत. गणपति, नवरात्र पाळले जात असे. ते मीही पुढे परंपरेनुसार चालू ठेवले.

श्रीमती अनुपमा देशमुख

४ आ. सासरच्या लोकांचा परमेश्वरावरील विश्वास दृढ करणारी घटना : माझ्या सासर्‍यांचे वडील डॉ. मोरेश्वर गोपाळ तथा नानासाहेब देशमुख (लोकहितवादी गोपाळराव हरि देशमुख यांचा मुलगा) हे मुंबईतल्या पहिल्या एम्.डी.च्या तुकडीतील (बॅचपैकी) एक होते, तसेच ते लोकमान्य टिळकांचे मित्र आणि ‘फॅमिली डॉक्टर’ होते. ते आधुनिक विचारांचे होते आणि नेहमी सूट-बूट अशा पेहरावात असत. एकदा त्यांना स्वप्न पडले. त्यात त्यांना असे दिसले की, अमुक दिवशी आणि अमुक वारी त्यांचा मृत्यू होणार आहे. त्यांनी झोपेतून उठून पंचांग पाहिले असता तो दिवस, वार आणि तिथी स्वप्नात दिसल्याप्रमाणे बरोबर होती. याविषयी ते त्यांच्या ओळखीचे एक सत्पुरुष तात्या पित्रे यांच्याशी बोलले. तेव्हा तात्या पित्रे त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीजवळच्या तळवडे या गावी असलेल्या दत्तमंदिरात राहून उपाय करा.’’ त्यांनी बरेच दिवस तात्यांच्या मार्गदर्शनाखाली पूजाअर्चा, जप, अनुष्ठान इत्यादी केले. स्वप्नात दिसलेला तो दिवस आणि वेळ येताक्षणी डॉ. नानासाहेबांना काही वेळ चक्कर आली. काही वेळाने ते शुद्धीवर आले. त्या अवस्थेत त्यांना असे दृश्य दिसले की, समोर देव-देवता आहेत आणि ते स्वतः त्यांच्याजवळ हात जोडून विनम्रपणे उभे आहेत. हे चित्र एका चित्रकाराने नंतर काढले आणि ते चित्र तळवड्याच्या दत्तमंदिरात लावलेले आहे. या साक्षात्कारानंतर बुद्धीप्रामाण्यवादी डॉ. नानासाहेबांची रहाणी आणि विचारसरणी यांत आमूलाग्र पालट होऊन ते धोतर, कोट, टोपी अन् चप्पल वापरू लागले आणि दिवसातून तीन वेळा स्नानसंध्या करू लागले. डॉक्टर या नात्याने आपले कर्तव्य ते शेवटपर्यंत चोखपणे बजावत होते. या घटनेमुळे घरच्या मंडळींचा परमेश्वरावरील विश्वास अधिक दृढ झाला.

४ इ. सासरच्या घराण्यात घडलेल्या प्रसंगांनंतर अध्यात्माचे मनात असलेले कुतूहल जागे होणे : हा प्रसंग आणि माझ्या सासरी घडलेले इतरही काही प्रसंग ऐकून माझ्या मनातील कुतूहल जागे होऊ लागले. त्या वेळी ‘आपल्या वाट्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे ज्या काही चांगल्या आणि वाईट गोष्टी आलेल्या असतात, ते भोग भोगूनच संपवावे लागतात’, हे माझ्या लक्षात आले. काही सिद्ध पुरुषांच्या आणि सिद्ध स्त्रियांच्या संदर्भातील प्रसंग ऐकून ‘आपल्यात जो ईश्वरी अंश आहे, तो प्रार्थना आणि उपासना यांनी आणखी प्रकाशमान करता येतो, म्हणजेच दरवाजा बंद असला, तरी खिडकी उघडली जाते. पाऊस किंवा उन्हाचा त्रास झाला, तर त्यापासून रक्षण करण्यासाठी छत्री (छत्र) मिळते (प्रारब्धामुळे मार्गात काही अडथळे असले, तरी त्यातून मार्ग मिळतो)’, यावर माझा विश्वास बसला.

त्या वेळी मी केवळ संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असे आणि नियमित गणपतीचा नामजप करत असे; कारण माझा मुलगा सिद्धार्थ याचा जन्म श्री गणेशचतुर्थीला आणि मुलगी शीतल हिचा जन्म संकष्टी चतुर्थीला झाला आहे.

४ ई. सासूबाईंचे आजारपण आणि झालेले परिणाम : मुंबईला डॉ. देशमुख लेन, डॉ. देशमुख बिल्डिंगमध्ये रहाणार्‍या मोरेश्वर उपाख्य दिलीप देशमुख या देखण्या पॅथॉलॉजिस्ट तरुणाशी माझे लग्न झाले होते. लग्नानंतर घरात आम्ही दोघे आणि सासू-सासरे होतो. एक विवाहित नणंद सासरी त्यांच्या घरी रहात होत्या. माझ्या सासूबाई सतत आजारी असायच्या. वर्ष १९४६ मध्ये त्यांची १६ वर्षांची तरुण मुलगी टायफॉइडच्या (विषमज्वराच्या) साथीत वारली आणि त्या घटनेचा परिणाम होऊन त्यांनी अंथरुण धरले, ते कायमचेच. वास्तविक चांगले पती, एक १३ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांचा मुलगा असे कुटुंब होते, तरीही त्या दुःखातून सावरल्या नाहीत.

४ उ. घरातील तणावयुक्त वातावरणामुळे विविध शारीरिक दुखणी जडणे : घरातील मुख्य स्त्रीच मनाने खचली, तर पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो, तसेच झाले. मी लग्न होऊन आल्यावर माझ्यावर त्याचा खोलवर परिणाम झाला. एकतर सासू-सुनेचे अवघड नाते (टीप) आणि त्यात ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’, अशा स्थितीमुळे मी पूर्ण मिटून गेले. त्याचा परिणाम म्हणजे मला ताण, डोकेदुखी, आम्लपित्त (ॲसिडीटी) आणि मानेच्या मणक्यांना सूज येणे (स्पॉन्डिलायटीस) ही दुखणी त्रस्त करू लागली. त्यासाठी ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी असे उपचार करून पाहिले; पण तेवढ्यापुरते जरासे बरे वाटत असे. पुन्हा असह्य डोकेदुखी, अर्धशिशी, मळमळणे, उलट्या असे त्रास होत असत. त्याच सुमारास माझ्या वडिलांनाही डोळ्यांचा त्रास चालू होता. त्यांचा डोळा एकदम लाल होत असे. त्यामुळे त्यांना गॉगल लावून नाटक आणि सिनेमा यांमध्ये काम करावे लागे. त्यामुळे त्यांना मिळणार्‍या भूमिकांवरही बंधने आली.

टीप – अनुपमा देशमुख यांचे सासूबाईंच्या संदर्भातील वैशिष्ट्य

‘अनुपमा देशमुख यांनी ‘माझ्या सासूबाई अशा होत्या, तशा होत्या’, असे सांगून सासूबाईंना नावे ठेवली नाही, तर ‘सासू-सुनेचे अवघड नाते’, असे त्याबद्दल लिहिले.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

 

डावीकडून श्रीमती अनुपमा देशमुख यांचे सासरे, सासूबाई, सौ. अनुपमा देशमुख पती श्री. मोरेश्वर देशमुख, आई-वडील सौ. शालिनी नेने आणि श्री. राजा नेने (वर्ष १९६७)

५. आध्यात्मिक उपायांचे आलेले विलक्षण अनुभव !

५ अ. सहजयोग उपचारपद्धतीने डोकेदुखीचा उपचार करतांना चंदनाचा सुगंध येणे : आमचे नशीब चांगले; म्हणून त्याच वेळी माझ्या आईचे आतेभाऊ ती. आप्पा कर्वे आमच्याकडे आले. ते मला म्हणाले, ‘‘निर्मलादेवी श्रीवास्तव तथा ‘माताजी’ यांच्याकडे जाऊ या. त्यांच्या सहजयोगाचा काही लाभ होऊ शकेल.’’ त्या वेळी मुंबईत भारतीय विद्याभवनात त्यांचे सत्संग होत असत. माझ्या डोकेदुखीसाठी मीही आई-वडिलांसह तिकडे तीन चार वेळा गेले. एकदा माताजींचे प्रवचन झाल्यावर त्यांचे शिष्य माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्या शरिरात शक्ती (स्पंदने, ‘व्हायब्रेशन्स’) सोडत होते. (ही त्यांची उपचार करण्याची पद्धत होती. त्या वेळी रुग्ण किंवा साधक यांनी ध्यानस्थ बसायचे असते.) त्या उपचारांच्या वेळी अकस्मात् मला चंदनाचा सुवास येऊ लागला. मी डोळे उघडल्यावर सर्व जण म्हणू लागले की, तुमच्या डोक्यातून चंदनाचा सुगंध आला. फारच छान ! नंतर मी आई-वडिलांना विचारले. त्या वेळी मला वाटले की, दारातून चंदनाचे अत्तर लावलेले कोणीतरी आले असावे; कारण माझे डोळे बंद होते. तेव्हा ते म्हणाले, ‘‘सत्संग चालू झाल्यावर सभागृहाची दारे बंद होतात. त्यामुळे कोणीही जा-ये करू शकत नाही.’’ माझा विश्वास बसेना. नंतर माताजींनी मला जवळ बोलावले आणि म्हणाल्या, ‘‘तुझ्या डोक्यातून चंदनाचा सुगंध आला. मला पुष्कळ बरे वाटले. हे असेच होते. जे अंतर्मनात असते, तेच बाहेर येते.’’ (बेटा जो अंदर होता है, वही बाहर आता है ।) त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही दिवस मी प्रतिदिन घरी त्यांनी सांगितलेली सहज योगसाधना करू लागले आणि लवकरच माझी डोकेदुखी बरी झाली.

५ आ. एका सिद्ध पुरुषांकडून सासूबाईंच्या वागण्याचा झालेला परिणाम हे डोकेदुखीचे कारण असल्याचे योग्य निदान होणे : माझ्याकडून एक चूक झाली की, मला बरे वाटल्यानंतर मी ध्यान करणे सोडून दिले. ‘हे ध्यान कायम करायला हवे’, हे मला समजले नाही. त्यामुळे काही काळानंतर मला पुन्हा डोकेदुखी हैराण करू लागली. पुन्हा वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाऊन उपचार चालू झाले; पण त्यांचा उपयोग झाला नाही. शेवटी माझ्या वहिनींच्या भावाकडून एका सिद्ध पुरुषाचे नाव कळले; म्हणून मी त्यांच्याकडे गेले. ते उच्चशिक्षित (M.Sc.) होते आणि ‘नॅशनल केमिकल लॅबोरेटरी’मध्ये (N.C.L.) काम करत होते. ते खरेखुरे गुरु होते. त्यांना माझ्या डोकेदुखीविषयी सांगितले असता ते म्हणाले, ‘‘तुमच्या सासूबाई सतत आजारी असायच्या ना ? त्यांच्या वागण्याचा तुमच्या मनावर परिणाम झाला आहे.’’ त्यांनी काही आयुर्वेदीय औषधांचा काढा बनवून मला प्यायला सांगितला; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांनी रोगाचे निदान मात्र अचूक केले होते. पुढे वर्ष १९८० मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांकडे गेल्यावर मला याचा प्रत्यय आला.’

– श्रीमती अनुपमा देशमुख (सनातनच्या ३६ व्या संत पू. (श्रीमती) शालिनी नेने आणि कै. राजा नेने यांच्या कन्या), पुणे (१६.१.२०२२)

(क्रमशः उद्याच्या अंकात)

(भाग ३.) ‘पुणे येथील श्रीमती अनुपमा देशमुख यांचा अभिनय ते साधना असा झालेला जीवनप्रवास आणि त्यांना स्वसंमोहन तंत्राविषयी आलेले विलक्षण अनुभव !’ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/548822.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक