धर्मांतरबंदी कायदा हवाच !

संपादकीय

मिशनर्‍यांच्या शाळांमध्ये ख्रिस्ती पंथाचा प्रचार न होण्यासाठी शाळा सरकारने कह्यात घ्याव्यात !

प्रतिकात्मक छायाचित्र

तमिळनाडूतील ख्रिस्ती मिशनरी शाळेत शिकणार्‍या मुलीने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण देशभर गाजत आहे. त्याचे कारणही तसे गंभीर आहे. महाविद्यालयाकडून संबंधित मुलीवर ख्रिस्ती पंथात धर्मांतरित होण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता, त्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. तिला शाळेत पुढील शिक्षण चालू ठेवायचे असेल, तर तिला धर्मांतरित व्हावेच लागेल, असे आई-वडिलांसमक्ष सांगण्यात आले. तिला तमिळनाडूतील पारंपरिक हिंदु धार्मिक सण पोंगल साजरा करण्यासही प्रतिबंध करण्यात आला होता. तिला हा जाच सहन झाला नाही आणि तिने आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. या १७ वर्षीय मुलीच्या पालकांनी माध्यमांसमोर बोलतांना सांगितले की, त्यांची मुलगी धर्मांतरास नकार देत असल्याने महाविद्यालयाने तिला शौचालये स्वच्छ करण्यास लावली, अन्य झाडलोट करण्यास लावली. तिच्या संदर्भात जे घडले, ते अन्य मुलांच्या संदर्भात घडू नये आणि धर्मांतराची ही शेवटची घटना ठरावी. मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि रोचलीन मेरी अन् सगाया मेरी यांना शिक्षा झाली पाहिजे.

कॉन्व्हेंट शाळांचे भीषण स्वरूप !

कॉन्व्हेंट शाळांच्या संदर्भात हिंदु मुलींना टिकली लावण्यास, बांगड्या घालण्यास अथवा भारतीय पोषाख घालून येण्यास मज्जाव करण्यात येतो. हिंदु मुलांच्या हातातील दोरे कापण्यात येतात, टिळा लावण्यास अथवा गळ्यात देवतांची पदके घालण्यास विरोध करण्यात येतो. हिंदूंना राख्या बांधून शाळेत येऊ दिले जात नाही. असे हिंदु धर्मविरोधी अनेक प्रकार शाळांमध्ये घडतात. धर्मांतराच्या प्रक्रियेचा प्रारंभ या शाळांमध्ये होतो. हिंदूंच्या देवतांचा जाणीवपूर्वक अवमानास्पद उल्लेख केला जातो. गणपतीला ‘एलिफंट गॉड’, मारुतीला ‘मंकी गॉड’ असे संबोधले जाते. मुलांना शाळेत नेणारी बस जाणीवपूर्वक बंद पाडली जाते आणि मुलांना ‘तुमच्या उपास्यदेवाला प्रार्थना करा’, असे सांगितले जाते, तेव्हा बस चालू करण्यात येत नाही. नंतर ‘येशूला प्रार्थना करा’, असे सांगितले जाते. तेव्हा बस चालू करण्यात येते. यातून येशूला प्रार्थना करण्याचे महत्त्व, येशूच तुमचा तारणहार असल्याचे मुलांवर बिंबवले जाते. ‘तुमचे घर नदीकाठी असल्यास नदीला पूर आल्यावर तुमचा दगडाचा देव तरंगणार कि येशू तरंगणार ?’, असे विचारून येशूचे श्रेष्ठत्व बिंबवले जाते. हे मानसिक धर्मांतर आहे. एकाच वेळी हिंदु देवतांविषयी तिटकारा आणि येशू, बायबल, मेरी यांविषयी आपलेपणा निर्माण केला जातो. अशा शिकवणुकीमुळे मुलांवर ख्रिस्त्यांचे कुसंस्कारच होणार !

धर्मांतरास नकार : विद्यार्थ्यांच्या हत्या !

विदेशातील मिशनर्‍यांच्या शाळांनी गुन्ह्यांचा उच्चांकच गाठला आहे. तेथे शाळांमध्ये शेकडो नव्हे, तर सहस्रो मुलांचे लैंगिक शोषण झाले आहे. याला उत्तरदायी असलेल्या पाद्र्यांना शिक्षाही होत नाही; केवळ तेथील चर्चच्या प्रमुखासमोर ‘कन्फेशन’ (चर्चमध्ये गुन्ह्यांची स्वीकृती करण्याची प्रथा) केले की काम झाले. त्यामुळे शोषणास बळी पडलेल्या नन, अन्य महिला यांसुद्धा त्यांच्यावर झालेले अत्याचार सांगण्यास पुढे येत नाहीत. कॅनडा येथे तर कॅथॉलिक शाळांच्या आवारात काही मासांपूर्वीच लहान मुलांची अशी शेकडो थडगी सापडली की, ज्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिल्यामुळे चर्चकडून त्यांची हत्या करण्यात आली होती. कॅथॉलिक चर्चवर या अमानवी कृत्यांविषयी जगभरातून टीका होऊन त्यांनी मुलांवर केलेल्या अत्याचारांविषयी माफी मागण्याची मागणी केली; मात्र माफी मागतील ते ख्रिस्ती कुठले ? पाद्र्यांकडून केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविषयी, मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याविषयी ख्रिस्त्यांचे सर्वाेच्च धर्मगुरु पोप यांनी पाद्र्यांना कठोर शब्दांत सुनावल्याचे अथवा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्याचे सांगितल्याचे वाचनात आले नाही. केवळ ‘असे काहीतरी चुकीचे प्रकार झाले’, असे याविषयी त्यांनी गुळमुळीत भाष्य केले. चर्च संस्थाही संबंधित देशांच्या सरकारकडे शिक्षा देण्यासाठी पाद्र्यांना आवाहन करत नाहीत, हे विशेष आहे. ‘झाले गेले आपसांत मिटवून टाकूया’, असे चर्चचे धोरण दिसते. एवढे उघड गुन्हे होऊनही ख्रिस्त्यांच्या शिखरसंस्थांचे असे वर्तन म्हणजे ‘त्यांना गुन्ह्यांचे काही गांभीर्यच नाही’, असे लक्षात आणून देण्यास पुरेसे आहे.

हिंदूंचे धर्मांतर हाच उद्देश !

ख्रिस्त्यांचे आश्रम, त्यांची स्वयंसेवी संस्था अथवा मानवतेच्या नावाखाली चालू करण्यात येणार्‍या धर्मादाय संस्था, रुग्णालये ही मानवता जोपासण्याची ठिकाणे नसून धर्मांतराची केंद्रेच असतात. त्या ठिकाणी प्राथमिक साहाय्य करून आज ना उद्या ते स्वत:चा छुपा ‘अजेंडा’ राबवतातच. स्वत: मदर तेरेसा यांनीही त्यांचा धर्मांतराचा उद्देश लपवून ठेवला नाही. त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने गोरगरिबांची सेवा करण्याच्या नावाखाली असाहाय्य, गरजू लोकांचे धर्मांतर केले. भारतात गरिबी अजूनही मोठ्या प्रमाणात आहे, काही भाग अद्यापही आदिवासी वर्गात मोडतो. त्यांना पोटापाण्याची व्यवस्था करण्याची भ्रांत असते. त्यांना हेरून आणि त्यांचे दारिद्र्य दूर करण्याच्या नावाखाली धर्मापासूनही दूर नेतात. त्या वेळी त्यांना अनिच्छेने धर्मपरिवर्तन करावे लागते. बहुसंख्य हिंदू असलेल्या भारताचे ख्रिस्ती प्रदेशात रूपांतर करण्याचे आदेशच, नव्हे स्वत: पोप यांचीच ती मनीषा आहे. साहजिकच प्रत्येक ख्रिस्ती धर्माेपदेशकाचे ते आद्य पंथकार्य आहे. परिणामी कर्नाटकात येऊ घातलेल्या धर्मांतरबंदी कायद्याला विरोध चालू झाला आहे. धर्मांतरबंदी कायदा हा बळजोरीच्या धर्मांतरांवर जालीम उपाय असेल, तर तो शासनाने देशभर करावाच; मात्र त्यासमवेत हिंदूंना मंदिरे, शाळा, महाविद्यालये यांतून धर्मशिक्षणाची व्यवस्था केल्यास कुणीही हिंदु धर्मांतरित होणार नाही, हे सत्य आहे.