सनातन संस्थेशी जिव्हाळ्याचे संबंध असणारे संपादक दिनकर रायकर !

दैनिक ‘लोकमत’चे समूह संपादक आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले दिनकर रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची सनातनचे संत पू. शिवाजी वटकर, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. अरविंद पानसरे यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

दिनकर रायकर
श्री. अभय वर्तक

१. प्रदीर्घ अनुभव असूनही अतिशय विनम्र व्यक्तीमत्त्व असलेले दिनकर रायकर !

दिनकर रायकर यांच्या निधनाची वार्ता ही सर्वांनाच धक्कादायक होती. ते ८० वर्षांचे होते. शेवटपर्यंत ते अथकपणे कार्यरत होते. अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेले आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असूनही अतिशय विनम्र व्यक्तीमत्त्व असलेले त्यांचे उदाहरण विरळाच म्हणावे लागेल. ‘मी समूह संपादक आहे’, याचा अविर्भाव त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधीही दिसला नाही. वर्ष २००८ मध्ये प्रथमच माझा त्यांच्याशी संपर्क आला. कुणाचाही संदर्भ न घेता रायकर यांच्याकडे आम्ही गेलो होतो. तत्कालीन राज्य सरकारकडून सनातन संस्थेच्या कार्यात विविध प्रकारच्या अडचणी आणल्या जात होत्या.

२. वस्तूनिष्ठता बाळगणारे संपादक !

रायकरसाहेबांना भेटल्यावर त्यांनी आमची (सनातनची) बाजू ऐकून घेतली. आम्हाला कोणत्याही दडपणाखाली ठेवले नाही. ‘सनातनचे कार्य कौतुकास्पद आहे’, हे त्यांचे बोल होते. सनातन आश्रमाचे सर्व कार्य त्यांती अतिशय आपुलकीने समजून घेतले. त्यानंतर त्यांना जे जे शक्य होते, ते ते साहाय्य त्यांनी वेळोवेळी केले.

३. सतत कार्यरत आणि मनमोकळे संपादक !

ते शेवटच्या श्वासापर्यंत ‘लोकमत’ वृत्तपत्रात कार्यरत होते. त्यांना अनेक वेळा मी म्हणायचो, ‘साहेब आता निवृत्त का होत नाही ?’ त्यावर ते म्हणत, ‘मी निवृत्त झालो, तर मी आजारी पडीन. मी नोकरी पैशांसाठी करत नाही. मला वेळ रिकामा घालवायला आवडत नाही. मी इकडे असलो की, सतत व्यस्त असतो.’ ते अनेक गोष्टी मनमोकळेपणाने सांगत. ‘जीवनात माझ्यावर कसे प्रसंग आले ?’, ‘मी त्यातून काय शिकलो ?’ हे ते सांगत. ‘पत्रकारितेच्या क्षेत्रातील विविध अनुभवही ते मोकळेपणाने सांगत असत. त्यांच्या आणि माझ्या वयात बरेच अंतर असले, तरी आमच्यात अगदी मित्रत्वाचे नाते होते. त्यांना कोणतीही अडचण सांगितली, तरी ती ते पटकन् सोडवायचे. त्यांना शक्य नसल्यास ते मनमोकळेपणाने त्यातील अडचणी सांगायचे; पण त्यांनी कधीही आम्हाला अंधारात ठेवले नाही. प्रसंगानुरूप ‘आध्यात्मिक उपचार’ या विषयी चर्चा होत असे. त्यांनी नामजप करण्यास आरंभ केला होता. त्यामुळे त्यांना विविध अनुभूतीही येत.

४. रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात येणे राहून गेले !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देण्याची त्यांची इच्छा होती. कोरोना महामारीच्या संकटामुळे ते राहून गेले. याची हुरहुर मनाला कायमच राहील. धर्मप्रचारानिमित्त मी मुंबईबाहेर असलो, तरी त्यांच्याशी दूरभाषवरून संपर्क असायचा. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून दु:ख झाले. महाराष्ट्राने एक संवेदनशील आणि प्रगल्भ संपादक गमावला आहे. सनातन परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

– श्री. अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था, देहली.

सनातनचे संत पू. शिवाजी वटकर यांनी अनुभवलेले संपादक रायकर !

पू. शिवाजी वटकर

‘श्री. दिनकर रायकर वर्ष १९९२ पासून, म्हणजे ‘मुंबई येथील प.पू. भक्तराज महाराज यांची गुरुपौर्णिमा होती’ त्या वेळेपासून सनातनला साहाय्य करायचे. ते त्या वेळी इंग्रजी दैनिक ‘दी इंडियन एक्सप्रेस’मध्ये संपादक होते. त्याचप्रमाणे सनातन संस्थेवर ज्या वेळी काही कठीण प्रसंग यायचे, त्या वेळी ते मोलाचे सहकार्य करत असत. जवळजवळ २५ वर्षे माझा त्यांच्याशी संपर्क होता आणि त्यांनी नेहमीच सकारात्मक राहून मला, सनातन संस्थेला आणि धर्मकार्याला साहाय्य केलेले आहे. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’

– पू. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

दिनकर रायकर आणि हिंदु जनजागृती समिती !

श्री. अरविंद पानसरे

१. पूर्वीपासून साहाय्य करणारे रायकर !

दिनकर रायकर हे पूर्वी दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये कार्यरत असतांना त्यांच्या साहाय्यामुळे त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनाविषयक लिखाण आणि बातम्या प्रसिद्ध होत होत्या.

२. बातम्या, लेख यांना दैनिकामध्ये प्रसिद्धी !

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था समाजसाहाय्याचे उपक्रम राबवत असतांना तुलनेने अल्प प्रसिद्धी मिळत असे. या पार्श्वभूमीवर रायकर हे ‘लोकमत’मध्ये समूह संपादक असतांना पू. शिवाजी वटकर यांच्यासह त्यांना भेटल्यावर त्यांनी धर्मप्रचाराच्या बातम्या लावण्यासाठी साहाय्य करण्याचे आम्हाला आश्वासन दिले. त्यांच्या या आश्वासनाप्रमाणे त्यांनी बहुतांश बातम्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध केल्या. तसेच धर्मप्रचाराच्या उपक्रमांचे लेख, धर्मशिक्षण मालिकाही प्रसिद्ध केली.

३. नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देणारे रायकर !

मी आणि समितीचे अन्य काही कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी वर्षातून तीन-चार वेळा तरी जात होतो. आम्ही आणलेले विषय त्याचप्रमाणे आमचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घ्यायचे. त्याला ते सकारात्मक प्रतिसादही देत. ते म्हणायचे की, संपादकाने प्रत्येकाचे नेहमी ऐकत राहिले पाहिजे, तरच त्याला सर्व बाजू कळतात. मी आजही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींवर लक्ष ठेवून असतो.

४. सतत व्यस्त असतांनाही वेळ देणारे रायकर !

रायकरसाहेब हे दैनिक ‘लोकमत’ समूहाचे समूह संपादक असल्यामुळे ते सतत विविध बैठकांमध्ये व्यस्त असायचे. त्यांच्या वर्तमानपत्राचे राज्य अन् राष्ट्रीय स्तरावर अनेक कार्यक्रम अन् सोहळे चालू असायचे. त्यातही ते सहभागी व्हायचे; मात्र हे सर्व चालू असतांना आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेल्यावर ‘मला वेळ नाही’, असे ते कधीही म्हणायचे नाहीत. ते आमच्यासाठी वेळ काढून आम्हाला भेटायचे. बाजूला त्यांची एखादी बैठकही चालू असायची. मधेच ते बैठकीला जाऊन लगेच पुन्हा आम्हाला भेटायला यायचे. रायकरसाहेब यांच्यातील प्रेमभाव आणि आपुलकी यांमुळे ते आम्हाला वेळ देत असत. त्यांच्यासारखा इतक्या मोठ्या पदावर असलेला संपादक इतक्या आस्थेने भेटतो, सकारात्मक प्रतिसाद देतो, हे अत्यंत विरळ आहे.’

– श्री. अरविंद पानसरे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.