नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणा ! – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कन्या अनिता बोस यांचे आवाहन

उजवीकडे अनिता बोस

मुंबई – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूला ७७ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र जपानमधील त्यांच्या अस्थी भारतात आणणे शक्य झालेले नाही. नेताजी बोस यांची मुलगी म्हणून मला नेताजींच्या अस्थी भारतात आलेल्या पहायच्या आहेत. माझ्या वडिलांनी आपल्या देशावर जिवापाड प्रेम केले. देशाला स्वतंत्र्य मिळालेले पहाण्याचे त्यांचे स्वप्न होते; मात्र त्यांना ते पहाता आले नाही. तथापि त्यांच्या मृत्यूनंतर तरी त्यांच्या अस्थी त्यांच्या प्राणप्रिय देशात पोचल्या पाहिजेत, अशा भावना नेताजी सुभाष चंद्र बोस यांची एकुलती एक मुलगी अनिता बोस यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केली. २३ जानेवारी या दिवशी नेताजी बोस यांची जयंती आहे.

अनिता बोस पुढे म्हणाल्या की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. काँग्रेसने राजकीय डावपेचाचा एक भाग म्हणून देशाच्या स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय अहिंसात्मक आंदोलनाला दिले; मात्र आझाद हिंद सेनेच्या सैनिकी उठावामुळे ब्रिटिश सरकार हादरले होते. त्यामुळे यापुढे भारताला नियंत्रणात ठेवणे अशक्य असल्याची जाणीव ब्रिटिश सरकारला झाली होती. या दाव्याला पुष्टी देणारी अंसख्य कागदपत्रे उपलब्ध आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या वादाला मूठमाती द्यावी !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूच्या वादाला आता मूठमाती द्यावी. नेताजींच्या मृत्यूपेक्षा त्यांचे जीवनकार्य, देशप्रेमाचा विचार कितीतरी मोठा आहे. त्याची आठवण ठेवण्याची आवश्यकता असल्याचे अनिता बोस म्हणाल्या.

म. गांधी धूर्त राजकारणी होते आणि ते त्यांच्या विचारांशी सहमत नसणार्‍यांना धडा शिकवायचे !

म. गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि म. गांधी यांचे मतभेद जगजाहीर होते; मात्र तरीही नेताजींना गांधी यांच्याविषयी अतीव आदर होता. तथापि गांधी एक धूर्त राजकारणी होते. त्यांच्या विचारांशी सहमत नसणार्‍यांना ते धडा शिकवायचे. याउलट नेताजी सरळमार्गी आणि स्पष्टवक्ते होते. नेहरू यांच्यापेक्षा नेताजींचे योगदान मोठे होते याची जाणीव देशवासीयांना आहे, असे स्पष्ट मत अनिता बोस यांनी व्यक्त केले.