घरातील सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर विविध माध्यमातून साहाय्य लाभल्याने साधिकेने अनुभवलेली गुरुकृपा !

सौ. सुनीता सावंत

१. श्री गणेशचतुर्थीनंतर साधिका, तिचे यजमान आणि सून यांना कोरोनाचा संसर्ग होणे आणि साधिकेला ताण येऊन तिने गुरुदेवांना प्रार्थना करणे

‘आम्ही श्रीगणेशचतुर्थीला कपिलेश्वरी, फोंडा येथे आमच्या घरी गेलो होतो. गणपति विसर्जन करून आम्ही दुसर्‍या दिवशी खांडेपार येथे घरी आलो आणि सर्वांना ताप येऊ लागला. त्यामुळे आम्ही २९.८.२०२० या दिवशी कोरोनाची चाचणी करून घेतली. चाचणीत मी, माझे यजमान आणि सून यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांवर श्रद्धा ठेवून घरातच अलगीकरणात रहाणे पसंत केले. माझ्या यजमानांना मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा त्रास आहे, तसेच त्यांना मूत्रपिंडाचा आजार असल्याने त्यांचे शस्त्रकर्मही झाले आहे. त्यामुळे प्रथम मला ताण आला. मी गुरुदेवांना नमस्कार करून प्रार्थना केली. नंतर मला जाणवले, ‘आपत्काळातील हा प्रसंग मला शिकण्यासाठी घडला असून पुढे अशा प्रसंगांमध्ये मनाची स्थिरता ठेवायची आहे.’

२. स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे दर्शन होऊन भावजागृती होणे आणि प.पू. बाबांचे वाक्य आठवणे

त्याच रात्री मला स्वप्नात दिसले, ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ खांडेपार येथे एका ठिकाणी सत्संग घेत आहेत. त्यांना पाहिल्यावर माझा भाव जागृत झाला. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी (प.पू. बाबांनी) सांगितले आहे, ‘माझ्याकडे सुख मागू नका, तर दुःख सहन करण्याची शक्ती मागा.’

३. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेनिमित्त घरी आलेल्या साधिकेने नामजपादी उपाय सांगितल्यामुळे मनातील भीती नाहीशी होणे

३०.८.२०२० या दिवशी सौ. उज्ज्वला कामटेकर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेनिमित्त आमच्या घरी आल्या. त्या वेळी ‘गुरुदेवांनीच त्यांना पाठवले असावे’, असा विचार मनात येऊन मी त्यांना आम्हाला कोरानाची लागण झाल्याचे सांगितले. त्यांनी उत्तरदायी साधकाला विचारून अधिकाधिक नामजप करणे, सूक्ष्मातून गुरूंच्या सतत सान्निध्यात रहाणे, क्षणोक्षणी प्रार्थना करणे, तसेच अन्य उपाय यांविषयी सांगितले. त्यामुळे माझ्या मनातील भीती नाहीशी झाली.

४. शेजारी आणि नातेवाईक यांनी केलेले साहाय्य

अ. आमच्या शेजारी एक आधुनिक वैद्यच रहात असल्याने माझ्या यजमानांचा कोरोना अहवाल फोंडा येथील रुग्णालयात पाठवणे आम्हाला शक्य झाले.

आ. माझी सून पोलीस खात्यात कार्यरत आहे. तिने माझ्या यजमानांच्या रक्तातील साखरेची पडताळणी करणे, वाफ घ्यायला लावणे इत्यादी साहाय्य केले.

इ. माझी बहीण आणि तिचे यजमान यांनीही आम्हालासाहाय्य केले.

सध्या समाजात कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांना बहिष्कृत केले जात असल्याची अनेक उदाहरणे आढळून येत आहेत; पण गुरुदेवांच्या कृपेने आम्हाला समाजातील परिचितांकडून सकारात्मक वागणे अनुभवण्यास मिळाले.

‘हे गुरुदेवा, आमच्यावर आपली कृपा सदोदित असावी. अन्य काही नको’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

– सौ. सुनीता सदानंद सावंत, खांडेपार, फोंडा, गोवा.(७.५.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक