गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका प्रचारसभेत ‘माझी ताकद वाढली असून ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’, असे दादागिरीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात भाजपच्या वतीने तक्रारी प्रविष्ट करून आंदोलने करण्यात येत आहेत. नाना पटोलेंसारख्या लोकप्रतिनिधींनी आणि राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणे, हे अत्यंत लाजिरवाणे अन् संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.
नाना पटोले यांनी वर्ष २०१४ मध्ये ‘भाजप शेतकर्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये संवेदनशील नाही’, असे वक्तव्य करून खासदारकीचे त्यागपत्र देऊन भाजपमधून बाहेर पडले. भाजप सोडल्यानंतर ते प्रत्येक कार्यक्रमात आणि पत्रकारांशी बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् भाजप यांचा तीव्र द्वेष करू लागले. यापूर्वी नाना पटोले यांनी ‘मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली’, असा आरोप करून ‘एवढा दायित्वशून्य पंतप्रधान जगात आजपर्यंत कुठेच झाला नाही’, अशी एकेरी भाषेत टीका केली.
विधानसभेत त्यांनी ‘भाजप सरकारच्या काळात आपले भ्रमणभाष ध्वनीमुद्रित केले जात आहेत, उद्धव ठाकरे यांचे सरकार आपल्यावर पाळत ठेवते’, असे वादग्रस्त आणि सत्ताधारी आघाडीला अडचणीत आणणारे विधान केले होते. अखेर त्यांनाच आपल्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचा दावा करत वेळ मारून नेण्याची वेळ आली. लोकप्रतिनिधींविषयीची ही काही प्रातिनिधीक उदाहरणे येथे दिली आहेत. कमी अधिक प्रमाणात अशा प्रकारचे वक्तव्य मधून मधून लोकप्रतिनिधींकडून होत असते.
एकूणच स्थिती पहाता लोकप्रतिनिधी किती खालच्या पातळीला जाऊन, गलिच्छ आणि संस्कृतीहीन टीका करून राजकारण करत आहेत, हे लक्षात येते. एवढेच नव्हेतर विधीमंडळातही लोकप्रतिनिधी शाळेतील खट्याळ मुलांप्रमाणे कसेही वागतात, हे आपण पहातो. यावर त्या पक्षाचे प्रमुखही याविषयी काही करू शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींचे हे वागणे आदर्श असण्याऐवजी लोकशाहीला अशोभनीय आहे, ही स्थिती देशासाठी चिंताजनक आहे. आता जनतेने आपला प्रतिनिधी म्हणून कुणाला निवडायचे हे ठरवावे. हिंदु राष्ट्रात असे लोकप्रतिनिधी नसतील.
– श्री. सचिन कौलकर, मुंबई