अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळलेल्या मुंबईतील वांद्रेगडाकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष !

  • ‘महाराष्ट्रातील गडांची ढासळत चाललेली स्थिती आणि गडांचे होत असलेले इस्लामीकरण पहाता पुरातत्व विभागच इतिहासजमा झाला आहे कि काय ?’ असे कुणाला वाटल्यास आश्चर्य ते काय ? – संपादक
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच गडांची दुरवस्था होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक
वांद्रा गड, मुंबई

मुंबई, १९ जानेवारी (वार्ता.) – मुंबईच्या दक्षिण बाजूच्या टोकावर असलेल्या वांद्रेगडाची अर्ध्याहून अधिक तटबंदी ढासळली आहे. तटबंदीची वेळीच डागडुजी न झाल्यास गडाची सर्वच तटबंदी पडण्याची शक्यता आहे. गडावरील काही बांधकामही पूर्णपणे पडले आहे. ही स्थिती अशीच राहिली, तर भविष्यात गडाच्या अन्य भिंतीही पडण्याची शक्यता आहे. पुरातत्व विभागाच्या अंतर्गत ‘प्राचीन संरक्षित स्मारक’ म्हणून या गडाचा समावेश होतो. हा गड समुद्रालगतच असल्यामुळे सागरी लाटांमुळे काही प्रमाणात गडाच्या बांधकामाला धक्का पोचला आहे; मात्र काही वर्षांपूर्वी गडाच्या बाहेर बांधण्यात आलेल्या संरक्षित कठड्यामुळे सध्या लाटांपासून गडाचे रक्षण होत आहे.

गडावरील कोसळलेली तटबंदी

१. वर्ष २००३ मध्ये ‘वांद्रे बँड स्टँड रहिवासी ट्रस्ट’कडून वांद्रे गडाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन स्थानिक खासदार शबाना आझमी यांनी खासदार निधीमधील काही निधी गडाच्या संवर्धनासाठी दिला. काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त याही याच लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. विधानसभेतील भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्या मतदारसंघात हा गड येतो.

गडावरील नामशेष झालेले बांधकाम

२. काही वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेमध्ये या गडाच्या दुरुस्तीचा विषय चर्चेला आला होता; मात्र प्रत्यक्षात गडाच्या दुरुस्तीचे काम अद्याप हाती घेण्यात आलेले नाही.

गडाचे दुसरे प्रवेशद्वार

३. गडावर येणार्‍या प्रेमीयुगुलांनी गडाच्या सर्व भिंतींवर नावे कोरल्याने भिंती विद्रूप झाल्या आहेत. हा गड पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असूनही गडावर कुठेही पुरातत्व विभागाच्या नावाची पाटीही लावण्यात आलेली नाही. गडाची नासधूस किंवा विद्रुपीकरण होऊ नये, यासाठी सूचनाही लावण्यात आलेल्या नाहीत.

प्रेमीयुगलांनी भिंतींवर काढलेल्या नावांमुळे विद्रूप झालेल्या भिंती

४. हा गड म्हणजे मुंबईच्या अरबी समुद्राचे अथांग दर्शन करण्याचे एक पर्यटनस्थळ म्हणून विकसित होऊ शकते; मात्र सरकार आणि पुरातत्व विभाग यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या गडाची दिवसेंदिवस पडझड होत आहे

मुंबई पुरातत्व विभागाने पुणे पुरातत्व विभागाला पाठवलेले पत्र

(पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
हे पहा –

गड-दुर्गांवर इस्लामी अतिक्रमण ! पुरातत्त्व खाते करतेय काय ?

वांद्रेगडाचा इतिहास

वर्ष १६४० मध्ये पोर्तुगिजांनी या गडाचे बांधकाम केले. मुंबईच्या दक्षिण टोकावर अरबी समुद्राच्या बाजूला असलेल्या एका उंच खडकावर हा गड बांधण्यात आला आहे. गडाचा परिसर अधिक मोठा नाही; मात्र गडावरून माहिमच्या परिसरासह अरबी समुद्राचा सर्व भाग दृष्टीक्षेपात येतो. त्यामुळे सामरिक संरक्षणाच्या दृष्टीने हा गड महत्त्वाचा आहे. वर्ष १६६१ मध्ये पोर्तुगिजांनी ब्रिटिशांना हा गड भेट म्हणून दिला. हा गड पुढे मराठ्यांच्या कह्यात गेल्यास इंग्रजांच्या राज्याला धोका निर्माण होईल, यासाठी इंग्रजांनी हा गड काही प्रमाणात उद्ध्वस्त केल्याचे म्हटले जाते.