(म्हणे) ‘मुसलमान एकत्र आले, तर सर्व जण माझे पाय धरतील !’

  • समाजवादी पक्षाचे माजी आमदार इम्रान मसूद यांचे दिवास्वप्न !

  • समाजवादी पक्षात प्रवेश करूनही पक्षाने अपमान केल्याचा मसूद यांचा आरोप !

वैयक्तिक स्वार्थासाठी धर्माचे राजकारण करणार्‍या अशा नेत्यांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्‍चर्य वाटू नये ! – संपादक

माजी आमदार इम्रान मसूद

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – ‘सर्व मुसलमान एकत्र आले, तर सर्व जण माझे पाय धरतील’, असे विधान काँग्रेसमधून समाजवादी पक्षामध्ये गेलेले माजी आमदार इम्रान मसूद यांनी केल्याचा एक व्हिडिओ भाजपचे नेते शलभमणी त्रिपाठी यांनी ट्वीट केला आहे. यात मसूद पुढे म्हणतात, ‘तुमच्यामुळे (मुसलमानांमुळे) मला दुसर्‍यांच्या पाया पडावे लागत आहे. तुम्ही मला कुत्रा बनवून टाकला आहे.’ समाजवादी पक्षाने मसूद यांना महत्त्व न दिल्याने त्यांनी असे विधान केले आहे.

काही दिवसांपूर्वीच समाजवादी पक्षात प्रवेश केल्यानंतर मसूद यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावरच त्यांचा अवमान केल्याचा आरोप केला आहे. मसूद यांनी म्हटले की, अखिलेश यादव यांनी मला दोनदा लक्ष्मणपुरी येथे येण्याचे आमंत्रण दिले; मात्र प्रत्यक्षात भेट दिली नाही. तसेच सहारणपूर (मसूद सहारणपूर येथील माजी आमदार आहेत) येथे पक्षाचा उमेदवारही घोषित केला. मी माझ्या सहकार्‍यांचा सल्ला घेऊन समाजवादी पक्षात प्रवेश केला होता.