मुसलमान बुद्धीप्रामाण्यवाद्याला न्यायालयाकडून जामीन संमत

इस्लाम आणि महंमद पैगंबर यांचा अवमान केल्याचे प्रकरण

मुसलमान बुद्धीप्रामाण्यवादी अनीश जासी

कन्याकुमारी (तमिळनाडू) – इस्लाम आणि महंमद पैगंबर यांचा अवमान करणारी पोस्ट फेसबूकवर प्रसारित केल्याच्या प्रकरणी अटकेत असलेले मुसलमान बुद्धीप्रामाण्यवादी अनीश जासी यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने जामीन संमत केला. ‘भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत धर्म आणि देवाचे अस्तित्व यांविषयी मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे’, असे न्यायाधीश आर्. साक्तीवेल यांनी जामीन संमत करतांना स्पष्ट केले.

कोईंबतूर जिल्ह्यातील बीके पुडुर येथील रहिवासी अनीश जासी यांना  इस्लामविरोधी पोस्ट फेसबूकवरून प्रसारित केल्याच्या आरोपाखाली तमिळनाडू पोलिसांनी २९ डिसेंबर २०२१ या दिवशी अटक केली होती. ‘जासी यांच्या विरोधात आरोप निश्‍चित करू शकणारा कुठलाच प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध नाही. याचिकादाराने सार्वजनिक ठिकाणी अशांतता निर्माण केल्याचा कुठलाच पुरावा पोलीस सुपूर्द करू शकलेले नाहीत’, असे न्यायाधिशांनी सांगितले. ‘जेव्हा मी हदिथ (महंमद पैगंबर यांची शिकवण) वाचतो, तेव्हा माझी मलाच लाज वाटते’, आदी इस्लामविरोधी लिखाण जासी यांनी प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.