छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी महाराणी सईबाई यांची राजगडाच्या पायथ्याशी समाधी असून ती आणि शिवपट्टण परिसराचा पर्यटन विकास आराखडा सिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी अन् विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी या परिसराची पहाणी केली. विलंबाने का होईना, समाधी स्थळाचा विकास होत आहे, ही वार्ता निश्चितच आनंदाची आहे. याच समवेत राजगडाचे संवर्धन, पुनरुज्जीवन करून जतन करणे, हेही तितकेच आवश्यक आहे. ऐतिहासिक ठिकाणे भावी पिढीला वेगवेगळ्या प्रकारचे प्रेरणादायी संदेश देतात, त्यामुळे त्यांचे संवर्धन होणे अनिवार्य आहे.
विदेशात ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन कल्पकतेने हाताळण्याची प्रथा आहे. आपल्याकडे मात्र पुरातन वास्तू जतन करणे, हाताळणे याचे धोरण ना सरकारकडे आहे, ना पुरातत्व विभागाकडे ! पुरातन वास्तूंची किरकोळ डागडुजी, संवर्धन आणि संरक्षण करण्याचे अधिकार कायद्यानुसार फक्त पुरातत्व खात्याकडेच असतात. या संस्थेला बळकट करण्याचा धोरणात्मक निर्णय सरकारने आतापर्यंत घेतला नाही, ही सर्वांत मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे ! खरेतर पर्यटनाच्या माध्यमातून केवळ मौजमजा करण्यापलीकडेही गडांचे महत्त्व आहे, हे दुर्दैवाने पर्यटकांच्या लक्षात येत नाही. प्रेमीयुगलांसाठी तर गड म्हणजे मोक्याचे ठिकाण आहे. यामुळे गडांचे पावित्र्य भंग होत आहे. तसेच गडावरील जैवविविधतेची आणि पर्यावरणाची हानी होत आहे, याचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे.
पर्यटन आणि अतिक्रमण या माध्यमांतून भंग पावणारे पावित्र्य यांमधून पुढील पिढीला कोणता आदर्श देणार ? आपल्या या वारशाची पुढील पिढीला ओळख करून देण्यासाठी आज प्रबोधनाची आवश्यकता आहे. भविष्यात गडांची हानी होऊ नये; म्हणून ते मूळ रूपात पुनरुज्जीवित करणे, तेथील अतिक्रमण हटवणे, गडांचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करणे आणि त्यांचे काटेकोर संरक्षण करणे अशा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
– सौ. अपर्णा जगताप, पुणे