३ जणांना अटक
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील १४७ शेतकर्यांना गंडा घालणार्या १६ कृषी अधिकार्यांवर पोलिसांनी कारवाईची प्रक्रिया चालू केली आहे. गेल्या ६ वर्षांत कृषी अधिकार्यांनी अनुमाने ५० कोटी ७२ लाख ७२ सहस्र ६४ रुपयांची शेतकर्यांची फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्याची चौकशी चालू करण्याचे आदेश स्वतः न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात येथील पोलिसांनी ३ संशयितांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीत इतरांची नावे आणि पुष्कळ धागेदोरे समोर येऊ शकतात. विशेषतः या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरीही पुढे येऊन तक्रार देऊ शकतात.
शेतकरी योगेश सपाटे यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष !
या प्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे म्हणतात की, या प्रकरणी वर्ष २०१८ मध्ये तक्रारदाराने लोकशाहीदिनाला तक्रार प्रविष्ट केली होती. चौकशीनंतर वर्ष २०१९ मध्ये ‘अपसमजातून तक्रार प्रविष्ट केल्याचे तक्रारदाराने लेखी लिहून दिले आहे. त्याची छायाचित्रेही आमच्याकडे आहेत’, असे चुकीचे कारण सांगून ते निकाली काढण्यात आले; मात्र तक्रारदार योगेश सापटे म्हणाले की, मी स्वतः तक्रार केली होती; मात्र कोरोना असल्यामुळे मला कृषी कार्यालयातच येऊ दिले नाही. ६ मास गेल्यावर मला अर्ज निकाली काढल्याचे कळले.
(सौजन्य : Nashik News)
या संदर्भात मी कृषी विभागाकडे लेखी पत्र मागितले; मात्र विभागाने काहीही दिले नाही.
काय आहे प्रकरण ?नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे गावाचे शेतकरी योगेंद्र उपाख्य योगेश सापटे यांनी शासनाच्या विविध योजनांना संमती मिळाल्याचे पाहिले. तशा निविदा निघाल्या. त्यांनी वर्ष २०११ मध्ये अशा योजनेत कामे मिळण्यासाठी अर्ज केला. त्यासाठी सापटे यांच्याकडून निविदा भरून घेण्यात आली. त्यासाठी १०० रुपयांच्या कोर्या स्टँपपेपरवर तिकीट लावलेल्या कोर्या ५० पावत्या आणि कोरे धनादेश (चेक) यांवर स्वाक्षरी घेण्यात आली. नंतर या सर्वांचा अपवापर करण्यात आला. सापटे यांना शेतीची कामे दिली; मात्र त्यांच्या खात्यावरून वर्ष २०११-२०१७ या काळात परस्पर ३ कोटी १७ लाख ४ सहस्र ५०४ रुपये काढून घेण्यात आले. अशाच प्रकारे इतर १४७ शेतकर्यांना गंडवण्यात आले आहे. कृषी अधिकार्यांनी एकीकडे शेतकर्यांना फसवून दुसरीकडे शासनाच्या विविध योजनांचा निधी फस्त केला. या प्रकरणी शेतकरी सापटे यांनी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयात दाद मागितली, तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण गंभीर आहे, असे सांगून पोलिसांना अन्वेषण करण्याचे आदेश दिले आहेत. |