भुसावळ येथील सौ. राजश्री नेवे यांची जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रार !
|
जळगाव, ८ जानेवारी (वार्ता.) – सार्वजनिक कार्यक्रमात प्रात्यक्षिके दाखवतांना महिलेच्या डोक्यावर थुंकून तिची मानहानी करणारे केशरचनाकार जावेद हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा, अशी मागणी भुसावळ येथील ‘सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थे’च्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे यांनी जळगाव पोलीस अधीक्षकांकडे केली. सौ. राजश्री नेवे यांच्या वतीने अधिवक्ता सुनीता खंडाळे-साळशिंगीकर यांनी ८ जानेवारी या दिवशी ही तक्रार प्रविष्ट केली. जावेद हबीब यांनी ३ जानेवारीला उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे केशरचनेविषयीच्या एका कार्यशाळेत सर्वांसमक्ष एका महिलेच्या डोक्यावर थुंकण्याचा विकृत प्रकार केला. या प्रकारामुळे समाजातील विविध स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे.
सौ. राजश्री नेवे या ‘श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थे’च्या माध्यमातून निराधार, अपंग महिला आणि बालक यांच्यासाठी विविध उपक्रम राबवतात. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात विविध उपक्रमांद्वारे त्या जागृती करतात.
अधिवक्ता सुनीता खंडाळे साळशिंगीकर यांनी सौ. राजश्री नेवे यांच्या वतीने केलेली तक्रार –
(तक्रार वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा)
हबीब यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले आहे की,
१. हबीब यांनी महिलेच्या डोक्यावर थुंकून तिची मानहानी केली आहे. त्यांची ही कृती अत्यंत किळसवाणी असून त्यांनी समस्त महिलावर्गाचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे.
२. सर्वत्र कोरोनाचे संकट असतांना अशा प्रकारे सार्वजनिक कार्यक्रमांत थुंकून जावेद यांनी अनेकांचा जीव धोक्यात घालण्याचा गुन्हा केला आहे.
३. जळगाव येथेही जावेद हबीब हे ‘जावेद हबीब हेअर अँड ब्युटी स्टुडिओ प्रा. लि.’ या नावाचे आस्थापन चालवतात. या कंपनीचे केशकर्तनालय जळगाव येथेही आहे. येथेही महिलांचा अपमान आणि मानहानी होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे केशकर्तनालय बंद करून जावेद हबीब यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा.