गोव्यात दिवसभरात १ सहस्र २ कोरोनाबाधित : वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात गेल्या आठवड्याभरात कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. राज्यातील बहुतांश नागरिकांनी कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या असल्या, तरी हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. गेल्या २४ घंट्यांत राज्यात १ सहस्र २ कोरोनाबाधित आढळले. कोरोनाविषयक चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे हे प्रमाण १७.७२ टक्के आहे. दिवसभरात १ मृत्य झाला आहे, तर कोरोनाबाधितांपैकी ११ जणांना कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. या परिस्थितीमुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बंदिस्त सभागृहामध्ये राजकीय मेळावे किंवा समारंभ आयोजित करणे टाळायला हवे ! – डॉ. शेखर साळकर

पणजी – सरकारच्या कोरोनातज्ञ समितीचे डॉ. शेखर साळकर यांनी बंदिस्त सभागृहामध्ये राजकीय मेळावे किंवा समारंभ आयोजित करणे टाळायलाच हवे, असे प्रतिपादन केले आहे. लग्न समारंभ, वाढदिवसाच्या पार्ट्या यांच्यावर सभागृहामध्ये निर्बंध घालायला हवेत. खुल्या जागेत राजकीय सभा घेण्यास हरकत नाही. निवडणूक आयोगाने तज्ञ समितीकडे विचारणा केल्यास आम्ही आमच्या सूचना देऊ. राजकीय सभांविषयी शेवटी निवडणूक आयोगाने निर्णय घ्यायचा आहे, असे ते पुढे म्हणाले.

राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असताना राजकीय मेळा, सभा, कृषी मेळावे प्रचंड गर्दीत चालू आहेत. या मेळाव्यांना लोक मोठ्या संख्येने उपस्थित रहात असल्याने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नवे नेते पक्षप्रवेश करतांना शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने माणसे जमवत आहेत.