मुंबई – मुंबई शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये आता वैद्यकीय सेवेतील कर्मचार्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. ५ जानेवारी या दिवशी जे.जे. रुग्णालयातील ६१ आधुनिक वैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
याविषयी मार्डचे (महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांची संघटना) अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी म्हटले की, निवासी डॉक्टरांची संख्या आधीच अल्प आहे. कोरोनामुळे अनेक जण कर्तव्यावर नसतात. यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची भीती आहे. मागील ४८ घंट्यामध्ये १२० डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालक मंडळाने वैद्यकीय रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिल्याने निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला होता. डॉक्टरांची घटती संख्या लक्षात घेऊन हे आश्वासन त्वरित पूर्ण करावे.