राहुल गांधी ‘अपघाती’ हिंदू असून त्यांना मंदिरात कसे बसतात, हेही ठाऊक नाही ! – योगी आदित्यनाथ यांची टीका

अमेठी (उत्तरप्रदेश) – निवडणूक आल्यानंतर राहुल गांधी यांच्यासारखे लोक ‘हिंदू’ बनून बाहेर पडतात. यांचे पूर्वजच सांगायचे ‘आम्ही ‘अ‍ॅक्सिडेंटल’ (अपघाती) हिंदू आहोत.’ त्यामुळे हे लोक स्वत:ला ‘हिंदू’ म्हणू शकत नाहीत, अशा शब्दांत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी ‘म. गांधी हिंदू होते आणि गोडसे हिंदुत्वनिष्ठ होते’, असे विधान केले होते. त्यावरून योगी आदित्यनाथ यांनी ही टीका केली. ते भाजपने आयोजित केलेल्या ‘जन विश्‍वास यात्रे’त बोलत होते.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, मंदिरात कसे बसतात, हे देखील अमेठीच्या माजी खासदारांना (राहुल गांधी यांना) ठाऊक नाही. त्यांनी ज्या मंदिराला भेट दिली, तिथल्या पुजार्‍यांनी त्यांना कसे बसतात हे शिकवले. हिंदुत्व किंवा हिंदुत्वनिष्ठ काय आहे, हे त्यांना ठाऊक नाही. तरीही ते चुकीचा प्रचार करत आहेत. आम्ही काहीही लपवलेले नाही. आम्हाला कसलीच भीती वाटत नाही. जेव्हा मुख्यमंत्री नव्हतो, तेव्हाही म्हणायचो, आजही म्हणतो आणि पुढेही म्हणत राहू ‘गर्व से कहो हम हिन्दू है !’