‘२२.८.२०२१ या दिवशी नवे पारगाव (कोल्हापूर) येथील पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू सनातनच्या १०९ व्या समष्टी संतपदावर विराजमान झाल्या. ही आनंदवार्ता समजल्यावर मला (विश्रामबाग, सांगली येथील साधिका सौ. विद्या पाटील यांना) पुष्कळ आनंद झाला. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू यांच्या सहवासात असतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे दिली आहेत.
१. पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू यांच्याशी झालेली भेट
पू. डॉ. (श्रीमती) शरदिनी कोरेकाकू यांच्या मिरज येथील ‘कोरे हॉस्पिटल’च्या इमारतीमध्ये येथे वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा’ या आवृत्तीचा शुभारंभ झाला. ‘कोरे हॉस्पिटल’च्या ३ मजली इमारतीमध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्यालय, दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात सेवा करणार्या साधकांची निवासव्यवस्था आणि पू. कोरेकाकू यांचे निवासस्थान होते. मी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करतांना प्रतिदिन माझी पू. कोरेकाकूंशी भेट होत असे.
२. हसतमुख आणि उत्साही
पू. काकू नेहमी हसतमुख आणि उत्साही असतात.
३. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा
पू. काकूंना स्वच्छतेची पुष्कळ आवड आहे. त्यांच्या घरातील प्रत्येक वस्तू नेहमी नीटनेटकी आणि स्वच्छ असायची.
४. नम्रता
पू. कोरेकाकू एक प्रथितयश स्त्रीरोग तज्ञ आहेत. त्यांनी ७ वर्षे इंग्लडमध्येही वैद्यकीय व्यवसाय केला; परंतु ‘पू. काकूंच्या वागण्या-बोलण्यात कधीही त्या इतक्या मोठ्या आहेत’, हे जाणवत नव्हते. त्या नेहमी सर्वांशी सहजतेने, नम्रपणे आणि प्रेमाने बोलायच्या.
५. जेवणाविषयी आवड-नावड नसणे
पू. काकू दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने घेण्यासाठी गेल्यावर अनेक वेळा त्यांना सेवाकेंद्रात यायला उशीर होत असे. त्यामुळे त्यांना दुपारी जेवायला उशीर होत असे. त्या प्रसंगी पू. काकू स्वतः जेवण गरम करून घेत असत किंवा जे असेल, ते आनंदाने खात असत. त्यांची जेवणाविषयी कसलीही आवड-नावड नाही.
६. प्रेमभाव
६ अ. साधकांची आपुलकीने विचारपूस करणे : पू. काकू प्रतिदिन सेवाकेंद्रातील सर्व साधकांची प्रेमाने विचारपूस करायच्या. आम्ही अनेक साधक पू. काकूंपेक्षा वयाने आणि सर्वच दृष्टीने पुष्कळ लहान असूनही आम्ही सेवा करत असल्यास पू. काकू आमच्या जवळ येऊन आमची अतिशय प्रेमाने विचारपूस करत असत. त्या आम्हाला हवे-नको ते विचारत असत. त्या नेहमी माझ्या घरातील व्यक्तींचीही आपुलकीने विचारपूस करत असत.
६ आ. साधकांना त्रास होत असल्यास त्यांना आधुनिक वैद्यांकडे घेऊन जाणे : सेवाकेंद्रात असतांना मला २ – ३ वेळा पुष्कळ शारीरिक त्रास झाला होता. त्या वेळी पू. कोरेकाकू स्वतः मला मिरज येथील आधुनिक वैद्यांकडे घेऊन गेल्या होत्या. सेवाकेंद्रातील साधक रुग्णाईत असल्यास पू. काकू स्वतः त्या साधकाला आधुनिक वैद्यांकडे घेऊन जात असत.
७. भाव
७ अ. सत्संगाची भावपूर्ण सिद्धता करणे : पू. काकूंच्या घरातील बैठकीची खोली प्रशस्त होती. परात्पर गुरु डॉ. आठवले मिरज येथे आल्यावर त्यांचा सत्संग आणि उत्तरदायी साधकांचा सत्संग पू. काकूंच्या घरातील बैठकीच्या खोलीतच होत असे. पू. काकू या सर्व सत्संगांची सिद्धता अतिशय भावपूर्णरितीने करत असत.
७ आ. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याप्रती अपार श्रद्धा आणि भाव असणे : पू. काकू मला परात्पर गुरुदेवांच्या संदर्भात त्यांना आलेल्या अनुभूती आणि प्रसंग सांगत असत, उदा. पू. काकूंची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रथम भेट, परात्पर गुरुदेवांच्या संदर्भातील आठवणी इत्यादी. त्यामुळे माझीही भावजागृती होत असे. पू. काकूंच्या मनात परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रती अपार श्रद्धा आणि भाव आहे.
८. कृतज्ञता आणि प्रार्थना
मला पू. कोरेकाकूंच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली आणि परात्पर गुरुदेवांच्या कृपाशीर्वादामुळेच मला त्यांच्याविषयी लिहिता आले. यासाठी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता आणि पू. काकूंच्या चरणी साष्टांग नमस्कार !
‘पू. काकूंमधील गुण माझ्यातही यावेत’, हीच परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी प्रार्थना !’
– सौ. विद्या सुनील पाटील, विश्रामबाग, सांगली. (२१.९.२०२१)